LACवर चीनचे हजारो सैनिक - राजनाथ सिंह

लोकल ते ग्लोबल
Updated Jun 03, 2020 | 00:23 IST | टाइम्स नाऊ मराठी

LACवर चीनचे हजारो सैनिक हजर आहेत अशी माहिती देशाचे संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी दिली.

RAJNATH SINGH
राजनाथ सिंह, संरक्षणमंत्री 

थोडं पण कामाचं

  • LACवर चीनचे हजारो सैनिक - राजनाथ सिंह
  • प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर तणाव
  • भारत-चीन दरम्यान चर्चेतून तोडगा काढण्याचे प्रयत्न सुरू

नवी दिल्ली: LACवर चीनचे हजारो सैनिक हजर आहेत अशी माहिती देशाचे संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी दिली. राजनाथ यांच्या या वक्तव्यामुळे पहिल्यांदाच केंद्र सरकारकडून प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवरील (LAC) परिस्थितीची माहिती जाहीर झाली आहे. संरक्षणमंत्र्यांनी LACवर तणाव असला तरी दोन्ही देश चर्चेच्या माध्यमातून तोडगा काढण्याचा प्रयत्न करत असल्याची माहिती दिली. 

चीनच्या सैन्याच्या हालचाली पाहून सावध झालेल्या भारताने प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर आवश्यक त्या प्रमाणात सैन्याची अतिरिक्त कुमक पाठवली आहे. चीनच्या सैनिकांकडून आगळीक होऊ नये यासाठी भारतीय सैनिक कडक पहारा देत आहेत. दोन्ही बाजूच्या सैन्याच्या हालचालींमध्ये वाढ झाल्यामुळे प्रत्यक्ष नियंत्रण रेषेच्या परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. तणाव दूर व्हावा आणि परिस्थिती पूर्ववत व्हावी यासाठी चर्चेच्या माध्यमातून तोडगा काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत, असे संरक्षणमंत्री राजनाथ सिंह म्हणाले. ते एका वृत्तवाहिनीला मुलाखत देत होते. 

लष्करप्रमुख नरवणे नियमितपणे संरक्षणमंत्र्यांना प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवरील परिस्थितीची माहिती देत आहे. भारत आणि चीनच्या लष्करी अधिकाऱ्यांमध्ये शनिवारी ६ जून रोजी काही मुद्द्यांवर चर्चा होणार आहे. या चर्चेचे निष्पन्न काय होते याकडे लक्ष आहे, असे संरक्षणमंत्री म्हणाले. भारताच्या सार्वभौमत्वाला धक्का पोहोचू दिला जाणार नाही, अशी ग्वाही संरक्षणमंत्र्यांनी दिली.

लडाखमध्ये मागील काही दिवसांपासून चिनी सैन्याच्या हालचाली वाढल्या आहेत. चीनने प्रत्यक्ष नियंत्रण रेषेजवळ तोफांसारखी लांबवर मारा करणारी शस्त्र मोठ्या संख्येने नियुक्त करायला सुरुवात केली आहे. पँगाँग लेक परिसरात चीनच्या गस्ती नौकांची संख्या एकदम तिपटीने वाढली आहे. चीनचे सैनिक नव्या बंकर आणि तंबूंची व्यवस्था करण्यात गुंतले आहे. या कामाचे स्वरुप बघता चिनी सैनिक दीर्घ काळ मुक्काम करण्याच्या हेतूने हालचाली करत असल्याची खात्री भारताला झाली आहे. चीनच्या या आक्रमकतेला भारताने रोखठोक उत्तर दिले आहे.

प्रत्येक चिनी सैनिकासमोर एक भारतीय सैनिक या पद्धतीने लडाखमध्ये भारताने सैन्याचा मोठा ताफा उभा केला आहे. भारतानेही प्रत्यक्ष नियंत्रण रेषेजवळ तोफखाना आणायला सुरुवात केली आहे. मागील काही दिवसांत भारत आणि चीनच्या लढाऊ विमानांनी आपापल्या हद्दीत वारंवार घिरट्या घालायला सुरुवात केली आहे. भारताच्या मालवाहक विमानांतून आणि हेलिकॉप्टरमधून थेट प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर कुमक पाठवण्यात आली. 

भारत आणि चीनकडून एकमेकांच्या प्रत्यक्ष नियंत्रण रेषेजवळच्या बांधकामाला विरोध सुरू आहे. प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर भारत आणि चीनचे शक्तीप्रदर्शन सुरू आहे. या घडामोडींमुळे भारत-चीन दरम्यान तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. हा तणाव असतानाच राजनाथ सिंह यांनी ६ जून रोजी दोन्ही देशांचे लष्करी अधिकारी भेटणार असल्याचे सांगितले. 

याआधी आदल्या दिवशी चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्याने चर्चेतून प्रश्न सोडवता येईल, असे संकेत दिले होते. दोन्ही देशांमधील तणाव चर्चेतून दूर होतो की नाही, हे येणाऱ्या काही दिवसांतच स्पष्ट होईल. 

पंतप्रधान मोदी आणि अध्यक्ष ट्रम्प यांच्यात चर्चा

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यात चर्चा झाली आहे. कोरोना संकट आणि काही आंतरराष्ट्रीय मुद्यांवर ही चर्चा झाली. चर्चेची सविस्तर माहिती जाहीर झालेली नाही. मात्र या घटनेचा भारत-चीन तणावावर परिणाम होण्याची शक्यता आहे. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी