चीनमुळे आर्थिक संकटात सापडलेल्या श्रीलंकेला भारताचा आधार

India extends Credit fuel food to bail Sri Lanka out of economic crisis : चीनमुळे आर्थिक संकटात सापडलेल्या श्रीलंकेला भारताचा आधार वाटू लागला आहे.

India extends Credit  fuel food to bail Sri Lanka out of economic crisis
चीनमुळे आर्थिक संकटात सापडलेल्या श्रीलंकेला भारताचा आधार 
थोडं पण कामाचं
  • चीनमुळे आर्थिक संकटात सापडलेल्या श्रीलंकेला भारताचा आधार
  • श्रीलंकेला क्रेडिट लाइन अर्थात उधारीवर अत्यावश्यक वस्तूंचा पुरवठा केला
  • भारताने श्रीलंकेला धान्य, डाळी, औषधे यांचा पुरवठा केला

India extends Credit  fuel food to bail Sri Lanka out of economic crisis : नवी दिल्ली : चीनमुळे आर्थिक संकटात सापडलेल्या श्रीलंकेला भारताचा आधार वाटू लागला आहे. चीन तसेच वेगवेगळ्या आंतरराष्ट्रीय वित्तसंस्थांच्या कर्जाच्या ओझ्याखाली दबलेल्या श्रीलंकेकडे परकीय चलन उरलेले नाही. देशाचा दैनंदिन कारभार चालविण्यासाठी आवश्यक असलेल्या उत्पादनांच्या आणि सेवांच्या आयातीसाठी श्रीलंकेकडे पैसे नाहीत. या बिकट परिस्थिती श्रीलंकेला भारताने मदतीचा भक्कम आधार दिला आहे. 

श्रीलंकेला क्रेडिट लाइन अर्थात उधारीवर (नंतर पैसे देण्याच्या बोलीवर) भारताने विमानांसाठीचे जेट फ्युएल, पेट्रोल आणि डिझेल या इंधनांचा मोठा साठा, धान्य, डाळी, औषधे यांचा पुरवठा केला आहे. याआधी भारताने कोरोना संकटात श्रीलंकेला कोरोना प्रतिबंधक लसचे डोस पुरवले होते. भारताने जानेवारी २०२२ पासून आतापर्यंत श्रीलंकेला अडीच अब्ज डॉलरची वेगवेगळ्या प्रकारची मदत दिली आहे. 

फेब्रुवारी महिन्यात भारताने क्रेडिट लाइन अर्थात उधारीवर श्रीलंकेला पाचशे दशलक्ष डॉलरची मदत देऊ केली. मार्च महिन्यात भारताने श्रीलंकेला दीड लाख टन पेक्षा जास्त विमानांसाठीचे जेट फ्युएल तसेच पेट्रोल आणि डिझेल या इंधनांचा मोठा साठा पुरवला. भारतातून मार्च महिन्यात चार टप्प्यात श्रीलंकेला इंधनाचा पुरवठा झाला. या व्यतिरिक्त एक अब्ज डॉलरच्या क्रेडिट लाइन अर्थात उधारीवर भारताने श्रीलंकेला धान्य, डाळी, औषधे यांचा पुरवठा केला.

भारताची रिझर्व्ह बँक आणि श्रीलंकेची सेंट्रल बँक यांच्यात एशियन क्लीअरन्स युनियन अंतर्गत झालेल्या करारानंतर चारशे दशलक्ष डॉलरचे व्यवहार थेट दोन मध्यवर्ती बँकांच्या माध्यमातून वेगाने झाले. यामुळे श्रीलंकेला आर्थिक व्यवहार करणे सोपे झाले. भारतातून शनिवार २ एप्रिल २०२२ रोजी श्रीलंकेत ४० हजार मेट्रिक टन डिझेलचा साठा पोहोचला. 

भारतातून श्रीलंकेला मोठ्या प्रमाणावर मदत सुरू असली तरी अद्याप श्रीलंकेतील आर्थिक संकटाची तीव्रता कमी झालेली नाही. वाढत्या आर्थिक संकटामुळे श्रीलंकेने पैसे वाचवण्यासाठी अनेक कठोर निर्णय घेण्यास सुरुवात केली आहे. देशातील सर्व शाळा कॉलेजांच्या परीक्षा अनिश्चित काळासाठी पुढे ढकलण्यात आल्या आहेत. विजेच्या बचतीसाठी देशातील सर्व रस्त्यांवरचे दिवे अर्थात स्ट्रीटलाइट बंद ठेण्याचा निर्णय झाला आहे. श्रीलंकेत अनेक ठिकाणी किमान तेरा तासांचे भारनियमन (लोडशेडिंग) सुरू आहे. देशात रविवार ३ एप्रिल २०२२ पासून ३६ तासांची संचारबंदी लागू झाली आहे. श्रीलंकेत सर्व प्रकारच्या सोशल मीडियावर अनिश्चित काळासाठी बंदी लागू झाली आहे.

वेगाने वाढणारी बेरोजगारांची संख्या तसेच वाढती महागाई आणि कोसळणारी अर्थव्यवस्था यामुळे श्रीलंकेत दररोज अत्यावश्यक वस्तूंच्या खरेदीच्या निमित्ताने तसेच सरकार विरोधात आंदोलनं सुरू आहेत. काही ठिकाणी आंदोलनांना हिंसक वळण लागल्याच्या घटना घडल्या आहेत. हिंसेचे लोण देशभर पसरले तर कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न गंभीर होईल. यामुळेच श्रीलंकेने देशात ३६ तासांची संचारबंदी आणि अनिश्चित काळासाठी सोशल मीडियावर बंदी लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. 

याआधी श्रीलंकेत आणीबाणी लागू झाली. आणीबाणी जाहीर झाल्यामुळे श्रीलंकेत सैन्याला विशेषाधिकार मिळाले आहेत. कोणतेही कारण न देता तसेच कोर्टात केस दाखल न करता कोणालाही दीर्घकाळ जेलमध्ये ठेवण्याचा अधिकार श्रीलंकेच्या सैन्याला मिळाला आहे. 

श्रीलंकेवरी कर्जभार

यंदाच्या वर्षी श्रीलंकेला कर्जाचे हप्ते देण्यासाठी म्हणून ४ अब्ज डॉलरची गरज आहे. आधीच कोरोना संकट आणि आर्थिक संकटामुळे श्रीलंकेचा पर्यटन व्यवसाय कोलमडला आहे. परकीय चलनाचा ओघ आटला असताना खर्च सतत वाढत आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी