जगात सर्वाधिक कोरोना रिकव्हरी भारतात

India Has Highest Global Covid Recoveries कोरोनाबाधितांच्या बाबतीत जगात दुसऱ्या स्थानावर असलेल्या भारताने कोरोना रिकव्हरीच्या बाबतीत जगात पहिले स्थान पटकावले.

India Has Highest Global Covid Recoveries
जगात सर्वाधिक कोरोना रिकव्हरी भारतात 

थोडं पण कामाचं

  • जगात सर्वाधिक कोरोना रिकव्हरी भारतात
  • भारताचा कोरोना रिकव्हरी रेट ७९.२८ टक्के
  • भारतात ४२ लाखांपेक्षा जास्त कोरोनाबाधीत उपचारानंतर पूर्णपणे कोरोनामुक्त

नवी दिल्ली: कोरोनाबाधितांच्या बाबतीत जगात दुसऱ्या स्थानावर असलेल्या भारताने कोरोना रिकव्हरीच्या बाबतीत जगात पहिले स्थान पटकावले. आतापर्यंत भारतात ४२ लाखांपेक्षा जास्त कोरोनाबाधीत उपचारानंतर पूर्णपणे कोरोनामुक्त झाल्याचे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने सांगितले. अमेरिकेत ४१ लाखांपेक्षा जास्त कोरोनाबाधीत उपचारानंतर पूर्णपणे कोरोनामुक्त झाले आहेत. अमेरिकेपेक्षा भारताचा रिकव्हरी रेट जास्त आहे. भारताचा कोरोना रिकव्हरी रेट ७९.२८ टक्के आहे. (India Has Highest Global Covid Recoveries)

भारतात आतापर्यंत ५३ लाख १२ हजार ५३७ जणांना कोरोनाची बाधा झाली आहे. यापैकी ४२ लाख ८ हजार ४३१ जण पूर्णपणे कोरोनामुक्त झाले आहेत. देशात कोरोनामुळे ८५ हजार ६५० मृत्यू झाले आहेत. कोरोनाबाधितांपैकी १० लाख १८ हजार ४५६ कोरोना अॅक्टिव्ह असलेल्या रुग्णांचे उपचार सुरू आहेत. 

देशात काल एका दिवसात ९३ हजार रुग्ण सापडले आहेत. त्यामुळे कोरोना रुग्णांची एकूण संख्या आता ५३ लाखांच्या पुढे गेलेली आहे.  यापैकी १० लाखाहून जास्त अॅक्टिव्ह रुग्ण (Active Patients)आहेत. गेल्या २४ तासात तब्बल ९३,३३७ जणांना कोरोनाची लागण झाल्याचं समोर आलं आहे. गेल्या काही दिवसांपासून कोरोना रुग्णांचा आकडा सतत वाढत आहे.

जगात आढळलेल्या एकूण कोरोनाबाधितांपैकी सुमारे १७ टक्के भारतात आढळले आहेत. मात्र कोरोना रिकव्हरी रेट जगात सर्वाधिक असल्यामुळे देशात कोरोना संकट हळू हळू नियंत्रणात येत आहे. आतापर्यंत जगात ३ कोटी ७ लाखांपेक्षा जास्त कोरोनाबाधीत आढळले आहेत. यापैकी २ कोटी २३ लाखांपेक्षा जास्त कोरोनामुक्त झाले आहेत. जगात अद्याप ७४ लाख १४ हजार ५५९ कोरोना अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. अमेरिकेत सर्वाधिक २५ लाख ३० हजार ८७६ कोरोना अॅक्टिव्ह रुग्ण आहेत.

या वातावरणात दिलासा देणारी अजून एक बाब आहे. संपूर्ण जग कोरोनाला (corona virus) प्रतिबंध करू शकेल अशा सक्षम लशीच्या (vaccine) आगमनाकडे डोळे लावून बसले आहे. सुदैवाने भारत बायोटेक कंपनीच्या कोव्हॅक्सिन या लशीचे प्रयोग यशस्वी होत आहेत. 

भारत बायोटेक इंटरनॅशनल लिमिटेड (Bharat Biotech International Limited - BBIL), आयसीएमआर (Indian Council of Medical Research - ICMR), एनआयव्ही (National Institute of Virology - NIV) आणि केंद्रीय आरोग्य मंत्रालय संयुक्तपणे कोव्हॅक्सिन विकसित करत आहेत. या लशीच्या प्रयोगासाठी केंद्रीय सशस्त्र बल मेडिकल कॉलेजमध्ये २० माकडांवर प्रयोग करण्यात आला. हा प्रयोग यशस्वी झाला. माकडांच्या शरीरात कोरोनावर मात करण्यासाठी अँटीबॉडीज तयार झाल्या. 

ऑक्सफर्ड विद्यापीठाची प्रयोगशाळा (Oxford University Lab), पुण्याची सीरम कंपनी (Serum Institute of India) आणि अॅस्ट्राझेंका (Astrazeneca) संयुक्तपणे कोरोनावर मात करण्यासाठी लशीची निर्मिती करत आहेत. 

भारत बायोटेक आणि सीरमसह देशातील सात कंपन्या कोरोनावर मात करण्यासाठी लस करण्याकरिता संशोधन करत आहेत. प्रत्येक संस्थेचे संशोधन वेगवेगळ्या टप्प्यावर असले तरी प्रगतीपथावर आहे. भारतात कोरोना रिकव्हरी रेट वाढत असताना लस आल्यास संकटावर मात करणे आणखी सोपे होईल, अशी आशा आहे. ताज्या अहवालानुसार सीरम आणि भारत बायोटेक या दोन कंपन्यांचे प्रयोग यशस्वी झाल्यास या दोन्ही कंपन्या २०२१च्या पहिल्या तिमाहीत लस बाजारात आणण्याची शक्यता आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी