ब्रह्मपुत्रेचे पाणी पेटणार, भारत-चीनच्या बांधांवरुन वाद होणार?

चीन ब्रह्मपुत्रा नदीच्या पाण्याचा वापर शस्त्रासारखा करण्याच्या प्रयत्नात आहे. चीनचा हा डाव ओळखून भारताने बचावाची तयारी सुरू केली आहे.

India plans dam on Brahmaputra to offset Chinese condtruction upstream
ब्रह्मपुत्रेचे पाणी पेटणार, भारत-चीनच्या बांधांवरुन वाद होणार? 

थोडं पण कामाचं

  • ब्रह्मपुत्रेचे पाणी पेटणार, भारत-चीनच्या बांधांवरुन वाद होणार?
  • भौगोलिकदृष्ट्या चीन उंचीचा फायदा घेऊन ब्रह्मपुत्रेचे जास्त पाणी अडवू शकतो
  • चीनचा डाव ओळखून भारताची बचावाची तयारी सुरू

नवी दिल्ली: चीन ब्रह्मपुत्रा नदीच्या पाण्याचा वापर शस्त्रासारखा करण्याच्या प्रयत्नात आहे. चीनचा हा डाव ओळखून भारताने बचावाची तयारी सुरू केली आहे. जिनपिंग सरकार ६० गिगावॅट जलविद्युत निर्मिती प्रकल्पासाठी ब्रह्मपुत्रा नदीवर बांध घालणार आहे. चीनच्या हद्दीत या बांधाचे बांधकाम होईल. तर भारत स्वतःच्या हद्दीत अरुणाचल प्रदेशमध्ये ब्रह्मपुत्रा नदीवर बांध घालणार आहे. या बांधाच्या मदतीने साठवलेल्या पाण्याद्वारे १० गिगावॅट जलविद्युत निर्मिती केली जाणार आहे. बांधाच्या निमित्ताने भारत महामार्गही बांधून काढणार आहे. यामुळे अरुणाचल प्रदेशच्या दुर्गम भागांतील वाहतुकीचा वेग वाढेल. राज्याच्या विकास योजनांना गती मिळेल तसेच संरक्षण दलांनाही हालचालींसाठी एक उत्तम रस्ता उपलब्ध होईल. (India plans dam on Brahmaputra to offset Chinese condtruction upstream)

भौगोलिकदृष्ट्या चीन उंचीचा फायदा घेऊन ब्रह्मपुत्रेचे जास्त पाणी अडवू शकतो. या नैसर्गिक रचनेचा गैरफायदा घेत चीन ब्रह्मपुत्रा नदीवर बांध घालत आहेत. बांधाचे दरवाजे उघडून अथवा बंद ठेवून जिनपिंग सरकार भारत आणि बांगलादेशच्या काही भागांमध्ये ओला आणि कोरडा दुष्काळ आणू शकेल. 

ब्रह्मपुत्रा नदी चीनच्या ताब्यातील भूभागातून तिबेटमार्गे अरुणाचल प्रदेशमध्ये येते आणि तिथून पुढे बांगलादेशच्या दिशेने वाहते. चिनी बांधाने मोठ्या प्रमाणावर पाणी अडवले तर अरुणाचल प्रदेशमध्ये तसेच बांगलादेशच्या काही भागांमध्ये कोरडा दुष्काळ पडेल. या उलट चीनने बांधाद्वारे अडवलेले पाणी मुसळधार पाऊस सुरू असताना एकदम सोडले तर अरुणाचल प्रदेशमध्ये तसेच बांगलादेशच्या काही भागांमध्ये ओला दुष्काळ पडेल. चीन पाण्याचा शस्त्रासारखा वापर करण्याची दाट शक्यता आहे. हा धोका ओळखून भारताने ब्रह्मपुत्रेवर स्वतःच्या हद्दीत बांध तयार करण्याचा निर्णय घेतला आहे. हा बांध २०२६ पर्यंत बांधून पूर्ण होईल. चीनने कोरड्या दुष्काळाची स्थिती निर्माण केली तर टप्प्याटप्प्याने भारताच्या बांधातून पाणी सोडून दुष्काळावर मात केली जाईल. तसेच चीनने एकदम पाणी सोडले तर जास्तीत जास्त पाणी बांधाच्या मदतीने रोखून संकटाची तीव्रता कमी करण्यासाठी भारत प्रयत्न करणार आहे.

चीनच्या योजनेला ओळखून भारत वेगाने तयारी करत आहे. भविष्यात या बांधांवरुन भारत आणि चीन यांच्यात वाद पेटण्याची शक्यता आहे. मात्र केंद्र सरकारने देशहिताला सर्वोच्च प्राधान्य देत बांधाचे काम करण्याची तयारी केली आहे.

याआधी चीनमध्ये वुहान जवळच्या प्रयोगशळेत कोरोना विषाणू विकसित झाल्याचा आरोप अमेरिका, जपानसह काही देशांनी केला. चीनने अनेक दिवस गुप्तता बाळगून विषाणू जगभर पसरू दिला, असा आरोप अमेरिकेने केला. या प्रकरणी वुहानमध्ये तपासणी करणे आवश्यक आहे, अशी मागणी अमेरिकेन केली. या मागणीचा दबाव वाढू लागला असताना वुहान शहरात मोठा पूर आला. वुहान जवळच्या धरणातील पाण्यामुळे हा पूर आला. या पुरामुळे कोरोनाशी संबंधित अनेक पुरावे नष्ट झाले आणि तपासणी लांबणीवर पडली. या निमित्ताने याच वर्षी चीनने पाण्याचा स्वतःच्या शहरात शस्त्रासारखा वापर केला. चीन भविष्यात भारत आणि बांगलादेश विरोधात ब्रह्मपुत्रेच्या पाण्याचा शस्त्रासारखा वापर करण्याची शक्यता आहे. पाणी मुद्दा हा एवढ्यापुरता मर्यादीत राहील की आणखी काही ठिकाणी पाण्याचा शस्त्रासारखा वापर होऊ शकतो, यावरुन आंतरराष्ट्रीय पातळीवर चर्चेला उधाण आले आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी