Ind vs Pak मासेमारीसाठी गेलेल्या पालघरच्या माणसाची पाकिस्तानने केली हत्या

India to approach Pakistan after killing of Indian fisherman मासेमारीसाठी समुद्रात खोलवर गेलेल्या एका भारतीय बोटीतील कोळी बांधवांना (fishermen) लक्ष्य करुन पाकिस्तानच्या सागरी सुरक्षा यंत्रणेने (पीएमएसए) गोळीबार केला. या गोळीबारात पालघर जिल्ह्यातील श्रीधर चमारे (३२) यांचा मृत्यू झाला.

India to approach Pakistan after killing of Indian fisherman
मासेमारीसाठी गेलेल्या पालघरच्या माणसाची पाकिस्तानने केली हत्या  |  फोटो सौजन्य: Representative Image
थोडं पण कामाचं
  • मासेमारीसाठी गेलेल्या पालघरच्या माणसाची पाकिस्तानने केली हत्या
  • पाकिस्तानच्या सागरी सुरक्षा यंत्रणेने (पीएमएसए) गोळीबार केला
  • गोळीबारात पालघर जिल्ह्यातील श्रीधर चमारे (३२) यांचा मृत्यू

India to approach Pakistan after killing of Indian fisherman । डहाणू: मासेमारीसाठी समुद्रात खोलवर गेलेल्या एका भारतीय बोटीतील कोळी बांधवांना (fishermen) लक्ष्य करुन पाकिस्तानच्या सागरी सुरक्षा यंत्रणेने (पीएमएसए) गोळीबार केला. या गोळीबारात पालघर जिल्ह्यातील श्रीधर चमारे (३२) यांचा मृत्यू झाला. ही घटना पोरबंदरच्या किनाऱ्यापासून १२ सागरी मैलांपेक्षा जास्त अंतरावर खोल समुद्रात घडली. या प्रकरणी देवभूमी द्वारका पोलिसांनी आयपीसी ३०३ अंतर्गत हत्येचा गुन्हा दाखल केला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार जलपरी नावाची बोट गुजरातच्या ओखा जिल्ह्यातून २५ ऑक्टोबर २०२१ रोजी समुद्रात उतरली. याच बोटीला लक्ष्य करुन शनिवारी संध्याकाळी चारच्या सुमारास पाकिस्तानने गोळीबार केला. या गोळीबारात बोटीतील दोन सदस्य गंभीर जखमी झाले. जखमी झालेल्यांपैकी श्रीधर चमारे (३२) यांचा किनाऱ्यावर येण्याआधीच मृत्यू झाला. श्रीधर चमारे पालघर जिल्ह्यातील वदराई गावाचे रहिवासी होते. जखमी झालेल्या दिलीप तांडेल यांच्यावर ओखा जिल्ह्यातील हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत.

गोळीबार प्रकरणाची माहिती परराष्ट्र मंत्रालयाला देण्यात आली आहे. श्रीधर यांच्या हत्येचा निषेध करण्यासाठी भारताचे परराष्ट्र मंत्रालय राजनैतिक (मुत्सद्देगिरीचे) संकेत पाळून पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाशी चर्चा करणार आहे. पोलीस गोळीबार प्रकरणी तपास करत आहेत. या तपासाचा अहवाल आल्यानंतर दोषी व्यक्तींवर कारवाई व्हावी यासाठी भारत सरकार आग्रही असेल, असे सूतोवाच केंद्र सरकारने केले.

बोटीवर जीपीएस ट्रॅकिंग सिस्टिम आहे. या सिस्टिमने संकलित केलेल्या डेटाचे फॉरेन्सिक तज्ज्ञांच्या मदतीने विश्लेषण सुरू आहे. समुद्रात काय घडले हे समजून घेण्यासाठी तपास सुरू आहे. जीपीएसचा डेटा, श्रीधर यांच्या पोस्टमॉर्टेमचा अहवाल, बोटीच्या फॉरेन्सिक तपासणीचा अहवाल आणि जखमी असलेल्या दिलीप तांडेल यांच्याकडून माहिती घेऊन तपासाचे निष्कर्ष निश्चित केले जाणार असल्याचे वृत्त आहे. याआधी एप्रिल २०२० मध्ये पाकिस्तानच्या सागरी सुरक्षा यंत्रणेने (पीएमएसए) मासेमारीसाठी समुद्रात खोलवर गेलेल्या एका भारतीय बोटीला लक्ष्य करुन गोळीबार केला होता. 

काही दिवसांपूर्वी श्रीनगर-शारजा विमान सेवा सुरू झाली. पण पाकिस्तानने अचानक श्रीनगर-शारजा सेवेच्या विमानांना पाकिस्तानच्या हवाई हद्दीतून उड्डाण करण्यास मनाई केली आहे. या मुद्यावर तोडगा निघण्याआधीच भारतीय बोटीवर पाकिस्तानने गोळीबार केल्याची घटना घडली आहे. याचे भारत-पाकिस्तान संबंधांवर काय परिणाम होतात हे पुढील काही दिवसांत स्पष्ट होईल.

श्रीधर यांचे पार्थिव सोमवारी कुटुंबाच्या ताब्यात देणार

श्रीधर यांंचे पार्थिव सोमवारी कुटुंबाच्या ताब्यात देणार असल्याचे समजते. श्रीधर जलपरी बोटीवर खलाशी म्हणून नोकरी करत होते. पाकिस्तानने केलेल्या गोळीबारात श्रीधर यांच्या छातीवर एकपेक्षा जास्त गोळ्या लागल्या आहेत, असे त्यांच्या वडिलांनी मीडियाला सांगितले.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी