पश्चिम बंगालमध्ये सज्ज राहणार राफेलचे दुसरे स्क्वाड्रन

India to induct second squadron of Rafale fighter jets says Indian Air Force पश्चिम बंगालमधील हाशिमारा येथे राफेलचे दुसरे स्क्वाड्रन सक्रीय होणार आहे.

India to induct second squadron of Rafale fighter jets says Indian Air Force
पश्चिम बंगालमध्ये सज्ज राहणार राफेलचे दुसरे स्क्वाड्रन 

थोडं पण कामाचं

  • पश्चिम बंगालमध्ये सज्ज राहणार राफेलचे दुसरे स्क्वाड्रन
  • हरयाणातील अंबाला येथे राफेलचे पहिले स्क्वाड्रन सज्ज
  • सध्या भारतात ११ राफेल, यात एप्रिल संपण्याआधी १० विमानांची भर पडणार

नवी दिल्ली: पाकिस्तान आणि चीन या दोन्ही देशांच्या भारतविरोधी हालचालींना लगाम घालण्यासाठी हवाई दल क्षमता वाढवत आहे. हरयाणातील अंबाला येथे भारतीय हवाई दलाने राफेलचे पहिले स्क्वाड्रन सज्ज केले आहे. आता पश्चिम बंगालमधील हाशिमारा येथे राफेलचे दुसरे स्क्वाड्रन सक्रीय होणार आहे. (India to induct second squadron of Rafale fighter jets says Indian Air Force)

अंबालामधून संपूर्ण पाकिस्तान तसेच चीनचा काही भाग सहज राफेलच्या टप्प्यात येतो. लडाखमध्ये चीन करत असलेल्या अतिक्रमणाच्या प्रयत्नांवर अंकुश ठेवणेही राफेलमुळे शक्य आहे. तसेच पश्चिम बंगालमधील हाशिमारा हवाई तळावरुन चीनच्या भारतालगतच्या सर्व प्रांतांवर अंकुश ठेवण्यास मोठी मदत मिळणार आहे. चीनने नेपाळ, म्यानमार, भूतान यापैकी एखाद्या देशामध्ये गडबड करण्याचा प्रयत्न केला आणि त्यांनी मदत मागितली तर तातडीने राफेल विमान पाठवणे हाशिमारा हवाई तळामुळे सोपे होणार आहे. हाशिमारा हवाई तळ भारत, चीन आणि भूतान या तीन देशांच्या ट्रायजंक्शन परिसरात आहे. (IAF to induct 2nd squadron of Rafale fighter jets at West Bengal's Hasimara air base in mid-April)

सध्या भारतात ११ राफेल विमानांचा ताफा आहे. या ताफ्यात लवकरच आणखी दहा विमानांची भर पडणार आहे. यामुळे एप्रिल महिना संपण्याआधीच भारताकडे २१ राफेल विमान असतील. याच कारणामुळे अंबाला पाठोपाठ हाशिमारा हवाई तळ येथे राफेलचे स्क्वाड्रन सक्रीय करण्याची तयारी सुरू आहे. या तयारीसाठी म्हणून राफेलच्या ११ विमानांच्या पथकाचे कमांडिग ऑफिसर (सीओ) ग्रुप कॅप्टन हरकिरत सिंह यांना हवाई दलाच्या पूर्वेकडील मुख्यालयाच्या अंतर्गत शिलाँग येथे बदलीवर पाठवण्यात आले आहे. ते लवकरच राफेलच्या दुसऱ्या स्क्वाड्रनचे नेतृत्व करण्याची शक्यता आहे. अंबाला येथील स्क्वाड्रनचे नेतृत्व आता ग्रुप कॅप्टन रोहित कटारिया करणार आहेत. ते सतराव्या गोल्डन अॅरो (17 Golden Arrows squadron) स्क्वाड्रनचे अर्थात सोनेरी किरणे स्क्वाड्रनचे नेतृत्व करतील.

भारत-चीन तणाव वाढला असताना पाच राफेल विमानांची पहिली तुकडी २८ जुलै रोजी भारतात पोहोचली. या विमानांना औपचारिकरित्या १० सप्टेंबर २०२० रोजी भारताच्या हवाई दलात दाखल करण्यात आले. याप्रसंगी भारताचे संरक्षणमंत्री राजनाथ सिंह, फ्रान्सच्या संरक्षणमंत्री फ्लोरेन्स पार्ली, चीफ ऑफ डीफेन्स स्टाफ जनरल बिपिन रावत, भारतीय हवाई दलाचे प्रमुख एअर चीफ मार्शल आरकेएस भदुरिया उपस्थित होते. यानंतर ४ नोव्हेंबर रोजी आणखी तीन राफेल विमानांचा ताफा भारतीय हवाई दलात दाखल झाला. राफेल विमानांची तिसरी तुकडी २७ जानेवारी २०२१ रोजी भारतात दाखल झाली. या तुकडीत तीन विमानांचा ताफा होता. यामुळे भारतात दाखल झालेल्या राफेल विमानांची संख्या ११ झाली. 

मार्च महिन्याच्या दुसऱ्या पंधरवड्यात आणि एप्रिल महिन्यात अशी दोन टप्प्यात दहा राफेल विमानं भारतात येत आहेत. यामुळे देशातील राफेल विमानांची संख्या २१ होणार आहे. करारानुसार फ्रान्सकडून भारताला ३६ राफेल विमानांचा पुरवठा होणार आहे. या विमानांच्या खरेदीसाठी भारताने ५९ हजार कोटी रुपयांचा करार केला आहे. या ३६ पैकी २१ विमानांचा ताफा भारतात सक्रीय होताच देशाच्या हवाई दलाच्या क्षमतेत मोठी वाढ होणार आहे. भारताच्या हवाई दलात ३६ राफेल दाखल झाल्यानंतर अंबाला आणि हाशिमारा या दोन्ही हवाई तळांवर प्रत्येकी १८ राफेल विमानांचा ताफा ठेवला जाणार आहे.

भारत फ्रान्सकडून खरेदी करत असलेल्या ३६ राफेल विमानांपैकी ३० एक आसनी लढाऊ विमानं आहेत. बाकीची सहा दोन आसनी प्रशिक्षणाची विमानं आहेत. प्रशिक्षणाच्या विमानांमध्येही लढाऊ विमानाप्रमाणेच आवश्यक त्या सर्व क्षमता आहेत. फक्त या विमानांच्या मदतीने प्रशिक्षण दिले जाणार असल्यामुळे त्यांच्यात एक ऐवजी दोन आसनांची सोय आहे. तसेच प्रशिक्षणाच्यादृष्टीने विमानात विशेष व्यवस्था आहे.

राफेल विमान मीटियोर, स्काल्प आणि हॅमर या शस्त्रसामुग्रीमुळे खूप घातक होणार आहे. हॅमरची मारा करण्याची क्षमता २० ते ७० किमी इतकी आहे. हिमालयातील तसेच अन्यत्र पर्वतांमध्ये असलेले शत्रूचे बंकर, लपण्याची ठिकाणी नष्ट करणे हॅमरमुळे सोपे होणार आहे. भारताने फ्रान्ससोबत राफेल विमानांसह त्यांना उपयुक्त अशा शस्त्रसामुग्रीसाठीही करार केला आहे. तसेच भारतीय बॉम्ब आणि क्षेपणास्त्रांचाही या विमानाद्वारे वापर होणार आहे. हवेतील लढाई, हवेतून जमिनीवर तसेच पाण्यात करायचे हल्ले यासाठी राफेल सक्षम आहे. जमिनीवर स्थिर असताना तसेच हवेतल्या हवेत उड्डाण करताना इंधन भरुन घेण्याची क्षमता असल्यामुळे राफेल न थांबता तीन ते चार हजार किमी टप्प्यात कोणत्याही ठिकाणी हल्ला करण्यासाठी सक्षम आहे. लांबवर हल्ला करण्यासाठी उपयुक्त क्षेपणास्त्रांमुळे विमानाच्या हल्ला करण्याच्या क्षमतेत वाढ झाली आहे. 

चीनच्या जे २० चेंगडू या लढाऊ विमानापेक्षा राफेल कैक पटीने सरस आहे. अफगाणिस्तान, लीबिया, माली या देशांमधील मोहिमेत राफेलचा प्रभावी वापर झाला आहे. राफेलची इंधन टाकी चिनी विमानापेक्षा जास्त क्षमतेची आहे. तसेच चिनी विमानापेक्षा जास्त शस्त्रसामुग्री घेऊन सहज उड्डाण करणे राफेलला शक्य आहे. यामुळे युद्धात राफेल प्रभावी आहे. चेंगडू या चिनी विमानाने आतापर्यंत एकाही युद्धात भाग घेतलेला नाही शिवाय चीनच्या  वैमानिकांनी अनेक वर्षात एकही संघर्ष केलेला नाही. याउलट भारताच्या हवाई दलाने एअर स्ट्राइक आणि कारगिल युद्धात उल्लेखनीय कामगिरी केली आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी