India-US 2+2 dialogue: भारत-अमेरिका यांच्यात BECA करारावर शिक्कामोर्तब

India-US 2+2 dialogue: भारत आणि अमेरिका यांच्यातील २+२ ही मंत्रीस्तरिय बैठक यशस्वी झाली. BECA वर शिक्कामोर्तब झाले.

India-US 2+2 Dialogue
भारत-अमेरिका यांच्यात BECA करारावर शिक्कामोर्तब 

थोडं पण कामाचं

  • भारत-अमेरिका यांच्यात BECA करारावर शिक्कामोर्तब
  • अमेरिका भारतासोबत कायम उभी राहणार - परराष्ट्रमंत्री पॉम्पिओ
  • अमेरिकेच्या परराष्ट्रमंत्री आणि संरक्षणमंत्र्यांनी अजित डोव्हल यांच्यासोबतही केली चर्चा

नवी दिल्ली: भारत (India) आणि अमेरिका (United States of America - USA) यांच्यातील २+२ ही मंत्रीस्तरिय बैठक यशस्वी झाली. विशेष म्हणजे भारत आणि अमेरिका यांच्यात बेसिक एक्सचेंज अँड कोऑपरेशन अॅग्रीमेंटवर (Basic Exchange and Cooperation Agreement for Geo-Spatial Cooperation - BECA) शिक्कामोर्तब झाले. भारताचे सामर्थ्य वाढवण्याच्या दृष्टीने हा करार महत्त्वाची भूमिका बजावणार आहे. मंत्रीस्तरिय बैठकीत भारत आणि अमेरिका यांनी परस्परांमधील सहकार्य, सामंजस्य आणि विश्वास आणखी वाढवण्यासाठी अनेक मुद्यांवर सकारात्मक चर्चा केली. 'बेका'वर (BECA) शिक्कामोर्तब झाल्याबाबत दोन्ही देशांच्या संरक्षणमंत्र्यांनी आनंद व्यक्त केला. भारताकडून मंत्रीस्तरिय बैठकीत संरक्षणमंत्री राजनाथ सिंह (Rajnath Singh, Minister of Defence of India / Raksha Mantri) आणि परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर (S Jaishankar, External Affairs Minister) सहभागी झाले. (India-US 2+2 Dialogue: BECA inked; Pompeo assures India of support against China)

मंत्रीस्तरिय बैठक यशस्वी झाल्यानंतर अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री माइक पॉम्पिओ (Mike Pompeo, Secretary of State) आणि संरक्षणमंत्री मार्क एस्पर (Mark Esper, Defense Secretary) यांनी साऊथ ब्लॉक येथे भारताचे संरक्षण सल्लागार अजित डोव्हल (Ajit Doval, National Security Advisor) यांच्याशी तब्बल अर्धा तास स्वतंत्रपणे चर्चा केली. डोव्हल भारत-चीन तणावाची परिस्थिती हाताळण्यासाठी चिनी प्रतिनिधींच्या संपर्कात आहेत तसेच देशाच्या संरक्षणाशी संबंधित सर्व महत्त्वाचे विषय त्यांच्या देखरेखीत हाताळले जातात. त्यामुळे डोव्हल आणि अमेरिकेच्या मंत्र्यांनी चर्चा केली. ही चर्चा यशस्वी झाल्याचे सांगण्यात आले.

मंत्रीस्तरिय बैठक झाल्यानंतर पॉम्पिओ, एस्पर, राजनाथ सिंह आणि जयशंकर यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत मंत्रीस्तरिय बैठक यशस्वी झाल्याचे सांगण्यात आले. 'बेका'वर शिक्कामोर्तब झाल्याची माहिती देण्यात आली. अमेरिका भारताला सार्वभौमत्वाचे रक्षण करण्यासाठी आवश्यक असलेली सर्व प्रकारची मदत देण्यास तयार आहे, असे अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री पॉम्पिओ यांनी स्पष्ट केले. त्यांनी भारतासोबतची मैत्री अमेरिकेसाठी महत्त्वाची असल्याचे सांगितले. अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री आणि संरक्षणमंत्री यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. या भेटीत अनेक मुद्यांवर सकारात्मक चर्चा झाल्याचे पॉम्पिओ म्हणाले.

भारताने अमेरिकेसोबत २००२ मध्ये जनरल सिक्युरिटी ऑफ मिलिट्री अॅग्रीमेंट (General Security of Military Information Agreement - GSOMIA), २०१६ मध्ये लॉजिस्टिक्स एक्सचेंज मेमोरँडम ऑफ अॅग्रीमेंट (Logistics Exchange Memorandum of Agreement - LEMOA) तसेच २०१८ मध्ये कम्युनिकेशन्स, कम्पॅटिबिलिटी अँड सिक्युरिटी अॅग्रीमेंट (Communications, Compatibility and Security Arrangement - COMCASA) केले आहे. दोन्ही देशांमध्ये २०१९ पासून बेसिक एक्सचेंज अँड कोऑपरेशन अॅग्रीमेंट (Basic Exchange and Cooperation Agreement for Geo-Spatial Cooperation - BECA) संदर्भात चर्चा सुरू होती. अखेर 'बेका'वर (BECA) शिक्कामोर्तब झाले. भारत आणि अमेरिकेच्या संरक्षणमंत्र्यांनी करारावर स्वाक्षऱ्या केल्या. 

'बेका'वर शिक्कामोर्तब झाल्यामुळे भारताला अमेरिकेकडून लाँग रेंज नेव्हिगेशन आणि मिसाइल टारगेटिंग यासाठी अॅडव्हान्स सॅटेलाइट अँड टोपोग्राफिकल डेटा (advanced satellite and topographical data for long-range navigation and missile-targeting) मिळणार आहे. क्षेपणास्त्र हल्ले आणि लढाऊ विमानांद्वारे अचूक हल्ले करण्यासाठी ही माहिती महत्त्वाची आहे. देशाला हवाई संरक्षण देण्यासाठी योजना आखून अंमलात आणणे तसेच शत्रूवर जमीन, आकाश आणि पाणी येथून अचूक हल्ले करण्यासाठी ही माहिती लाभदायी आहे. भारताचे संरक्षण सामर्थ्य या माहितीमुळे वाढणार आहे. 

भारत आणि अमेरिका यांनी 'बेका'वर शिक्कामोर्तब केल्यामुळे पाकिस्तानला सर्वात मोठा फटका बसणार आहे. पाकिस्तानच्या संरक्षण सिद्धतेची माहिती अमेरिकेकडे आहे. ही माहिती भारताच्या हाती येणार आहे. अमेरिका भविष्याचा विचार करुन भारतासोबतचे सहकार्य वाढवण्यासाठी ही सर्व माहिती भारताला देणार आहे. चीनविषयी अमेरिकेच्या उपग्रहांनी संकलित केलेली माहितीही भारताला मिळेल. मात्र चीनविषयी अमेरिकेकडे जेवढी माहिती आहे त्यापेक्षा कैकपट जास्त अचूक माहिती पाकिस्तानविषयी आहे. पाकिस्तानच्या संरक्षण व्यवस्थेच्या प्रत्येक घडामोडीवर रिअल टाइम लक्ष ठेवणारी यंत्रणा अमेरिकेकडे आहे. अफगाणिस्तानवरील लष्करी कारवाईच्या निमित्ताने अमेरिकेला हे शक्य झाले आहे. या माहितीचा सर्वाधिक फायदा भारताला एका समस्येवर मात करण्यासाठी होईल तर चीनविरोधातल्या माहितीमुळे भारताच्या सामर्थ्यात वाढ होईल.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी