राजनाथ सिंह रशिया दौऱ्यावर, S 400 लवकर मिळवण्याचा प्रयत्न

रशियातील लष्करी संचलनाला पाहुणे म्हणून उपस्थित असलेले भारताचे संरक्षणमंत्री राजनाथ सिंह आपल्या दौऱ्यात काही खास हेतू साध्य करण्याचा प्रयत्न करणार आहेत.

India wants to rush delivery of S400 anti missile system
राजनाथ सिंह रशिया दौऱ्यावर, S 400 लवकर मिळवण्याचा प्रयत्न 
थोडं पण कामाचं
  • राजनाथ सिंह रशिया दौऱ्यावर
  • रशियाकडून S 400 लवकर मिळवण्याचा प्रयत्न
  • S 400 लवकर मिळाले नाही तर काय करायचे याची चाचपणी सुरू

नवी दिल्ली: रशियातील (Russia) लष्करी संचलनाला पाहुणे म्हणून उपस्थित असलेले भारताचे (India) संरक्षणमंत्री राजनाथ सिंह (Defence Minister Rajnath Singh) आपल्या दौऱ्यात काही खास हेतू साध्य करण्याचा प्रयत्न करणार आहेत. भारताने रशियाकडून एस ४०० ही क्षेपणास्त्र यंत्रणा (S400 anti missile system) खरेदी केली आहे. ही यंत्रणा भारताला तातडीने उपलब्ध व्हावी यासाठी राजनाथ सिंह प्रयत्न करणार आहेत. 

दुसऱ्या महायुद्धात जर्मनीचा पराभव करणाऱ्या रशियात विजयाचा ७५वा वर्धापन दिन महोत्सव २४ जून रोजी थाटात साजरा होणार आहे. या सोहळ्यासाठी भारताला विशेष आमंत्रण आहे. रशियाच्या आमंत्रणाचा मान राखत भारताचे प्रतिनिधी या नात्याने राजनाथ सिंह सोहळ्याला उपस्थित राहणार आहेत. संचलनात भारताच्या लष्कराचे ७५ सैनिकांचे पथक सहभागी होणार आहे. हे पथक आधीच मॉस्कोत दाखल झाले आहे. या सोहळ्याच्या निमित्ताने राजनाथ सिंह यांना रशिया सरकारच्या प्रतिनिधींशी तसेच रशियन सैन्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी संवाद साधण्याची संधी मिळणार आहे. मिळालेल्या संधीचा फायदा घेत एस ४०० क्षेपणास्त्र यंत्रणा लवकरात लवकर मिळवण्याचा प्रयत्न राजनाथ सिंह करणार आहेत. 

भारत आणि रशिया यांच्यातील करारानुसार एस ४०० क्षेपणास्त्र यंत्रणा भारताला २०२१ मध्ये मिळणार आहे. मात्र भारत-चीन यांच्यात तणाव वाढला आहे. चीनने (China) आधीच रशियाकडून एस ४०० क्षेपणास्त्र यंत्रणा खरेदी केली आहे. अशा परिस्थितीत चीनला टक्कर देण्यासाठी तातडीने एस ४०० क्षेपणास्त्र यंत्रणा मिळवण्याचा प्रयत्न भारत करत आहे. 

काही दिवसांपूर्वी कोरोना संकटामुळे क्षेपणास्त्र यंत्रणेशी संबंधित कारखान्यांमधील काम थांबल्याचे कारण देत रशियाने एस ४०० क्षेपणास्त्र यंत्रणेची संपूर्ण मागणी पूर्ण करण्यासाठी २०२५ उजाडण्याची शक्यता व्यक्त केली होती. या घटनेनंतर काही काळाने भारत-चीन यांच्यात तणाव निर्माण झाला आहे. त्यामुळे भारताने एस ४०० क्षेपणास्त्र यंत्रणा लवकर मिळवण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. 

क्षेपणास्त्र यंत्रणा लवकर मिळवणे शक्य झाले नाही तर कोणत्या देशाकडून तातडीने पर्यायी शस्त्र खरेदी करता येईल याचीही चाचपणी सुरू असल्याचे वृत्त आहे. अमेरिका पॅट्रिऑटिक क्षेपणास्त्र यंत्रणा भारताला विकण्यास उत्सुक आहे. मात्र सध्याच्या तंत्रज्ञानात एस ४०० सर्वोत्तम असल्यामुळे भारताचा कल या क्षेपणास्त्र यंत्रणेकडे आहे.

एस ४०० क्षेपणास्त्र यंत्रणा

  1. एका एस ४०० बटालियनमध्ये ८ लाँचर आणि ३२ क्षेपणास्त्र असतात एक मोबाइल कमांड पोस्ट अशी व्यवस्था असते
  2. एस ४०० हे किमान २ आणि कमाल ४०० किमी. लांब पर्यंत अचूक मारा करणारे क्षेपणास्त्र
  3. दर सेकंदाला ४.८ किमी वेगाने हल्ला करण्याची तसेच हवेतल्या हवेत शत्रूच्या क्षेपणास्त्र अथवा विमानाचा वेध घेण्याची क्षमता 
  4. जमिनीवरील मोबाइल लाँचरच्या मदतीने लागोपाठ एस ४०० क्षेपणास्त्रांद्वारे एक किंवा अनेक लक्ष्यांवर हल्ला करणे शक्य
  5. जमीन आणि आकाश दोन्हीकडे अचूक हल्ला करू शकते
  6. एस ४०० चे रडार ज्या ठिकाणी आहे तिथून ६०० किमी. त्रिज्येच्या वर्तुळात जमीन आणि आकाशातील हालचालींचा वेध घेऊन कारवाई करण्याची क्षमता
  7. क्षेपणास्त्र यंत्रणेचे वाहन ताशी ६० किमी वेगाने रस्त्यावरुन आणि ताशी २५ किमी वेगाने ओबडधोबड भागातून प्रवास करण्यास सक्षम

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी