भारतात आणखी ३ राफेल, देशातील राफेलची संख्या ११

India welcomes 3 more Rafales प्रजासत्ताक दिनाच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे बुधवारी २७ जानेवारी रोजी भारतात आणखी तीन राफेल विमानं दाखल झाली.

India welcomes 3 more Rafales
भारतात आणखी ३ राफेल, देशातील राफेलची संख्या ११ 

थोडं पण कामाचं

  • भारतात आणखी ३ राफेल, देशातील राफेलची संख्या ११
  • बुधवारी २७ जानेवारी रोजी भारतात आणखी तीन राफेल विमानं दाखल
  • केले सात हजार किलोमीटरचे उड्डाण

नवी दिल्ली: प्रजासत्ताक दिनाच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे बुधवारी २७ जानेवारी रोजी भारतात आणखी तीन राफेल विमानं दाखल झाली. यामुळे देशातील राफेल विमानांची संख्या ११ झाली. फ्रान्सच्या दसॉल्ट कंपनीने या विमानांची निर्मिती केली आहे. या विमानांच्या पाठोपाठ मार्च महिन्यात आणखी तीन तर एप्रिल महिन्यात आणखी सात राफेल विमानं भारतात दाखल होणार आहेत. भारताने फ्रान्ससोबत ३६ राफेल विमानांच्या खरेदीचा करार केला आहे. या करारांतर्गत टप्प्याटप्प्याने फ्रान्सकडून राफेल विमानांचा पुरवठा सुरू आहे. (India welcomes 3 more Rafales)

देशातील राफेल विमानांची संख्या झाली ११

भारत-चीन तणाव वाढला असताना पाच राफेल विमानांची पहिली तुकडी २८ जुलै रोजी भारतात पोहोचली. या विमानांना औपचारिकरित्या १० सप्टेंबर २०२० रोजी भारताच्या हवाई दलात दाखल करण्यात आले. याप्रसंगी भारताचे संरक्षणमंत्री राजनाथ सिंह, फ्रान्सच्या संरक्षणमंत्री फ्लोरेन्स पार्ली, चीफ ऑफ डीफेन्स स्टाफ जनरल बिपिन रावत, भारतीय हवाई दलाचे प्रमुख एअर चीफ मार्शल आरकेएस भदुरिया उपस्थित होते. यानंतर ४ नोव्हेंबर रोजी आणखी तीन राफेल विमानांचा ताफा भारतीय हवाई दलात दाखल झाला. राफेल विमानांची तिसरी तुकडी २७ जानेवारी २०२१ रोजी भारतात दाखल झाली. या तुकडीत तीन विमानांचा ताफा होता. यामुळे भारतात दाखल झालेल्या राफेल विमानांची संख्या ११ झाली. 

केले सात हजार किलोमीटरचे उड्डाण

देशात २७ जानेवारी रोजी दाखल झालेल्या तीन राफेल विमानांनी सात हजार किलोमीटरचा प्रवास केला. संयुक्त अरब आमिराती येथे इंधन भरण्यासाठी थोडा वेळ थांबून राफेल विमानांचा ताफा भारतात दाखल झाला. करारानुसार २०२३ पर्यंत फ्रान्सकडून भारताला ३६ राफेल विमानांचा पुरवठा होणार आहे. या विमानांच्या खरेदीसाठी भारताने ५९ हजार कोटी रुपयांचा करार केला आहे.

प्रजासत्ताक दिनी दिसले राफेलचे सामर्थ्य

प्रजासत्ताक दिनानिमित्त चित्तथरारक हवाई कसरती करण्यात आल्या. या कसरतींमध्ये दोन राफेल विमानांचा समावेश करण्यात आला होता. हवाई कसरतीच्या निमित्ताने पहिल्यांदाच नागरिकांना राफेल विमान बघण्याची संधी मिळाली. दोन जॅग्वार आणि दोन मिग २९ विमानांसह एका राफेल विमानाने एकलव्य ही आकृती हवेत साकारली. तसेच अन्य एका राफेल विमानाने एकट्यानेच थरारक कसरत केली. यासाठी हे विमान आधी कमी उंचीवरुन आडव्या सरळ रेषेत एका जागेवर पोहोचले नंतर क्षणार्धात विमानाने रॉकेट उडावे तशा पद्धतीने उभ्या सरळ रेषेत आकाशात उंच भरारी मारली. या पद्धतीने एका राफेल विमानाने हवेत ब्रह्मास्त्र ही आकृती निर्माण केली. राफेल विमानांच्या चित्तथरारक हवाई कसरतीने उपस्थितांच्या डोळ्यांचे पारणे फिटले.

फ्रान्ससोबत जयपूरमध्ये युद्धाभ्यास

प्रजासत्ताक दिनाच्या हवाई कसरतीआधी भारताच्या राफेलने फ्रान्सच्या राफेल सोबत जयपूरच्या आकाशात युद्धाभ्यास केला. युद्धाभ्यासासाठी फ्रान्समधून त्यांच्या हवाई दलाचे १५० जणांचे पथक भारतात आले होते. युद्धाभ्यासाच्या निमित्ताने पहिल्यांदाच भारत आणि फ्रान्सच्या राफेलने संयुक्तपणे सराव केला. दोन्ही देशांच्या इतर विमानांनीही युद्धाभ्यास केला.

लढाऊ विमानांचा मोठा ताफा आणि उच्च क्षमतेची रडार हे भारतीय हवाई दलाचे सामर्थ्य

भारतीय हवाई दलात राफेल, सुखोई, एलसीए तेजस, मिराज २०००, मिग या लढाऊ विमानांचा मोठा ताफा आहे. या व्यतिरिक्त हवाई दलात अॅपाचे, चिनूक हेलिकॉप्टर आहेत. मालवाहतूक तसेच सैन्याच्या तुकड्यांची वाहतूक करण्यासाठी हवाई दलाकडे सी १३० आणि सी १७ ग्लोबमास्टर ही विमानं आहेत. एएलएच रुद्र, एमआय ३५ ही हेलिकॉप्टर तसेच आयएल ७६ गजराज हे मालवाहक विमान आहे. आक्रमक लढाऊ विमानांचा मोठा ताफा तसेच उच्च क्षमतेची रडार हे भारतीय हवाई दलाचे सर्वात मोठे सामर्थ्य आहे.

हॅमर करणार शत्रूवर जोरदार प्रहार

राफेल विमान मीटियोर, स्कल्प आणि हॅमर या शस्त्रसामुग्रीमुळे खूप घातक होणार आहे. हॅमरची मारा करण्याची क्षमता २० ते ७० किमी इतकी आहे. हिमालयातील तसेच अन्यत्र पर्वतांमध्ये असलेले शत्रूचे बंकर, लपण्याची ठिकाणी नष्ट करणे हॅमरमुळे सोपे होणार आहे. भारताने फ्रान्ससोबत हॅमरसाठी करार केला आहे. हॅमरची पुरवठ्याची प्रक्रिया सुरू आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी