भारताला डिसेंबर महिन्यात मिळणार S-400

India will receive first division of S-400 air defence system by the end of 2021 रशियाचे अध्यक्ष व्लादिमिर पुतिन ६ डिसेंबर २०२१ रोजी एक दिवसाच्या भारत दौऱ्यावर  येत आहेत. हा दौरा सुरू होण्याआधीच रशियाने भारताला एस-४०० हवाई सुरक्षा यंत्रणेचा पुरवठा करण्यासाठी वेगाने हालचाली सुरू केल्या आहेत.

India will receive first division of S-400 air defence system by the end of 2021
भारताला डिसेंबर महिन्यात मिळणार S-400  |  फोटो सौजन्य: Representative Image
थोडं पण कामाचं
  • भारताला डिसेंबर महिन्यात मिळणार S-400
  • काय आहे  एस-४०० हवाई सुरक्षा यंत्रणा?
  • संरक्षण क्षेत्रात भारत आणि रशिया संयुक्तपणे अनेक मोठ्या प्रकल्पांवर काम करत आहेत

India will receive first division of S-400 air defence system by the end of 2021 । नवी दिल्ली: रशियाचे अध्यक्ष व्लादिमिर पुतिन ६ डिसेंबर २०२१ रोजी एक दिवसाच्या भारत दौऱ्यावर  येत आहेत. या दौऱ्यात भारत आणि रशिया यांच्यात संरक्षणाशी संबंधित महत्त्वाच्या करारांवर सह्या (स्वाक्षऱ्या) होतील. भारतीय नौदलाच्या सबलीकरणासाठी महत्त्वाचे करार होतील. पुतिन यांचा दौरा सुरू होण्याआधीच रशियाने भारताला एस-४०० हवाई सुरक्षा यंत्रणेचा पुरवठा करण्यासाठी वेगाने हालचाली सुरू केल्या आहेत. डिसेंबर २०२१ मध्ये भारताला एस-४०० हवाई सुरक्षा यंत्रणेची पहिली डिव्हिजन (तुकडी) मिळणार आहे. 

पुतिन यांनी २०१८ मध्ये भारताचा दौरा केला होता. या दौऱ्यावेळी भारत आणि रशिया यांच्यात एस-४०० संदर्भात करार झाला होता. कोरोना संकटामुळे पुरवठ्याच्या नियोजनात अडचणी आल्या. पण या अडचणींवर मात करुन रशिया भारताला डिसेंबर २०२१ मध्ये एस-४०० हवाई सुरक्षा यंत्रणेची पहिली डिव्हिजन (तुकडी) देणार आहे.

काही दिवसांपूर्वी पुतिन जिनीव्हा (Geneva) येथे गेले होते. या दौऱ्यात पुतिन आणि अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन यांच्यात चर्चा झाली होती. या दौऱ्यानंतर पुतिन या वर्षीच्या दुसऱ्या विदेश दौऱ्याच्या निमित्ताने भारत भेटीसाठी येत आहेत.

भारत आणि रशिया संयुक्तपणे भारतासाठी फ्रिगेट निर्मिती प्रकल्पावर काम करत आहेत. या व्यतिरिक्त रशिया भारतामध्ये एके २०३ रायफलच्या निर्मितीच्या प्रकल्पावर काम करत आहे. भारतासाठीच्या सुखोई ३० एमकेआय आणि मिग २९ या लढाऊ विमानांच्या निर्मिती प्रकल्पावर दोन्ही देश संयुक्तपणे काम करत आहेत. भारतीय तोफदलात असलेल्या रणगाड्यांच्या सबलीकरणासाठी भारत आणि रशिया संयुक्तपणे एका प्रकल्पावर काम करत आहेत. तसेच दोन्ही देश संयुक्तपणे लघु पल्ल्याच्या हवाई सुरक्षा यंत्रणेवर काम करत आहेत. 

सुखोई विमानांच्या नव्या आवृत्तीचा विकास करण्यासाठी भारतासोबत संयुक्तपणे प्रकल्प राबवण्यास रशिया उत्सुक आहे. या संदर्भात दोन्ही देशांमध्ये चर्चा प्रगतीपथावर आहे. तसेच विक्रमादित्य या विमानवाहक नौकेवर विशिष्ट आधुनिक तंत्रज्ञान कार्यान्वीत करण्याबाबत भारत आणि रशिया यांच्यात चर्चा सुरू आहे. आधुनिक तंत्रज्ञानाशी संबंधित आवश्यक ती सर्व माहिती आणि प्रशिक्षण मिळणार असेल तरच भारत हे तंत्रज्ञान विक्रमादित्य नौकेवर कार्यान्वीत करण्यास तयार आहे. या संदर्भात दोन्ही देशांमध्ये चर्चा सुरू आहे. 

भारत आणि रशिया यांच्यात २०१९ मध्ये झालेल्या करारानुसार रशियन कंपनी भारताला एके २०३ रायफलच्या निर्मितीसाठी आवश्यक ती सर्व माहिती आणि प्रशिक्षण देणार आहे. यामुळे उत्तर प्रदेशमध्ये अमेठी येथे स्मृती इराणी यांच्या लोकसभा मतदारसंघात एके २०३ कलाश्निकोव रायफलच्या निर्मितीचा प्रकल्प सुरू होणार आहे.

संरक्षण क्षेत्रात भारत आणि रशिया संयुक्तपणे अनेक मोठ्या प्रकल्पांवर काम करत आहेत. या प्रकल्पांशी संबंधित महत्त्वाचे निर्णय किंवा पुढील टप्प्याचे करार याबाबत पुतिन यांच्या दौऱ्याच्या निमित्ताने चर्चा होणार आहे. निवडक करारांवर सह्या होणार आहेत. यामुळे भारत आणि रशियाच्या संरक्षण क्षेत्राच्या दृष्टीने पुतिन यांचा दौरा महत्त्वाचा आहे.

काय आहे  एस-४०० हवाई सुरक्षा यंत्रणा?

एस-४०० हवाई सुरक्षा यंत्रणेत ४०० किमी, २५० किमी, १२० किमी आणि ४० किमी अशा वेगवेगळ्या पल्ल्यावर भेदक मारा करणारी क्षेपणास्त्र आणि आधुनिक रडार आहे. यामुळे ही हवाई सुरक्षा यंत्रणा शत्रूचे विमान, युद्धनौका/पाणबुडी, क्षेपणास्त्र यांचा अचूक वेध घेऊन वेगाने प्रतिहल्ला करू शकते. शत्रूची लढण्याची क्षमता नष्ट करू शकते. शत्रूच्या रडारला जॅम करण्याचे अर्थात निकामी करण्याचे सामर्थ्य एस-४०० हवाई सुरक्षा यंत्रणेत आहे.

भारत रशियाकडून एस-४०० हवाई सुरक्षा यंत्रणेच्या पाच स्क्वाड्रन खरेदी करणार आहे. यासाठी भारत ३५ हजार कोटी रुपये मोजणार आहे. भारताच्या शिष्टमंडळाने प्रदीर्घ चर्चेअंती किंमत एक अब्ज डॉलरने कमी करण्यात यश मिळवले आहे. रशियाने भारतीयांना एस-४०० हाताळण्यासाठी प्रशिक्षित केले आहे. नियोजनानुसार लवकरच रशियातून भारताला एस-४०० हवाई सुरक्षा यंत्रणेचा पुरवठा सुरू होणार आहे.

पश्चिम सीमेवर एस-४०० सज्ज ठेवणार?

भारत-पाकिस्तान सीमेवर म्हणजेच देशाच्या पश्चिम सीमेवर एस-४०० सज्ज ठेवून भारत-चीन या दूरवर पसरलेल्या सीमेवर हवाई दलाची जास्त ताकद केंद्रीत करण्याची योजना केंद्र सरकारने आखली असल्याचे वृत्त आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी