नवी दिल्ली : भारतीय हवाई दलाकडून पाक व्याप्त काश्मीरातील बालाकोट येथे केलेल्या एअर स्ट्राईक केल्याचा Exclusive व्हिडिओ आज केंद्र सरकारने जारी केला आहे. नवे एअर चीफ मार्शल राकेश कुमार सिंह भदौरिया यांनी पदभार स्वीकारल्यानंतर घेतल्या पहिल्या पत्रकार परिषदेत जारी केला आहे.
१४ फेब्रुवारीला पुलवामा येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने पाकव्याप्त काश्मीरात असलेल्या बालाकोट येथे एअर स्ट्राईक केली होती. या एअर स्ट्राईकवर विरोधकांनी प्रश्न चिन्ह उपस्थित केले होते. या एअर स्ट्राईकचे पुरावे केंद्र सरकारकडे मागितले होते. पण केंद्र सरकार आणि हवाई दल आपल्या भूमिकेवर ठाम होते. त्यामुळे आता या एअर स्ट्राईकचा एक्सक्लुझिव्ह व्हिडिओ जारी करून सर्व विरोधकांची तोंड बंद करण्याचे काम केंद्र सरकार आणि हवाई दलाने करण्याचा प्रयत्न केला आहे.
दरम्यान ट्विटरवर बालाकोटच्या या व्हिडिओनंतर दोन्ही बाजूंनी प्रतिक्रिया येत आहे. ज्यांना पुरावे हवे होते त्यांना एअरफोर्सने पुरावे दिले आहेत. आता त्यांची तोंड बंद झाली पाहिजे.
दरम्यान, हा व्हिडिओ महाराष्ट्र आणि हरियाणा येथील निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जारी करण्यात आल्याची टीका सोशल मीडियावर केली जात आहे. अनेकांनी ट्वीटरवर या संदर्भात पोस्ट टाकल्या आहेत.