रशिया विजय दिन: भारतीय सैन्याचे पथसंचलन पाहून राजनाथ सिंह म्हणाले...

Indian Armed forces at Victory Day Parade in Moscow: रशियाच्या विजय दिनाच्या परेडमध्ये भारतीय सैन्य दलाने सहभागी होत पथसंचलन केलं. मॉस्को येथे झालेल्या विजय दिन कार्यक्रमात संरक्षणमंत्री राजनाथ सिंह सहभागी झाले

Rajnath Singh
संरक्षण मंत्री राजनाथ सिंह  |  फोटो सौजन्य: ANI

थोडं पण कामाचं

  • रशियाच्या विजय दिन समारंभात सहभागी होण्यासाठी संरक्षणमंत्री राजनाथ सिंह मॉस्कोमध्ये 
  • दुसऱ्या महायुद्धाच्या ७५व्या विजय दिनानिमित्त मॉस्को येथे कार्यक्रमाचे आयोजन 
  • या विजय दिन सोहळ्यात भारतीय सैन्याच्या तिन्ही दलाच्या तुकड्यांनी सहभागी होत केलं पथसंचलन 

मॉस्को: दुसऱ्या महायुद्धाच्या ७५व्या विजय दिना निमित्त रशियात (Russia) कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी भारताचे संरक्षणमंत्री राजनाथ सिंह (Rajnath Singh) हे मॉस्को येथे दाखल झाले होते. या विजय दिन कार्यक्रमात सहभागी होत राजनाथ सिंह यांनी या सोहळ्यातील काही छायाचित्रे पोस्ट केली आहेत. मॉस्कोतील (Moscow) रेड स्केअर चौक येथे झालेल्या भव्य परेड सोहळ्यात रशियासह इतरही अनेक देशांतील सैन्य दलाने (Indian Army) सहभाग घेतला. भारताच्या तिन्ही दलाच्या सैन्यानेही या पथसंचलना कार्यक्रमात सहभाग घेतला. या सोहळ्याचे काही फोटोज संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी ट्वीट केले आहेत. हे ट्वीट करताना राजनाथ सिंह म्हणाले, "भारतीय सशस्त्र दलाच्या तिन्ही तुकड्यांना एकत्र पथसंचलन करताना पाहून मला खूपच अभिमान वाटत आहे". संरक्षणमंत्री राजनाथ सिंह हे रशियाच्या तीन दिवसीय दौऱ्यावर आहेत. आपल्या या दौऱ्यात राजनाथ सिंह यांनी संरक्षण कराराच्या संदर्भात रशियासोबत चर्चा केली आहे.

राजनाथ सिंह यांनी घेतली उपपंतप्रधान बोरिसोव यांची भेट 

मंगळवारी संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी रशियाचे उप पंतप्रधान युरी इवानोविच बोरिसोव यांची भेट घेतली. या भेटीत त्यांनी रशियासोबत भारताच्या संरक्षण करारावर चर्चा केली. यावेळी रशियाने भारताला आश्वासन दिले की, त्यांच्याकडून संरक्षण कराराची योग्य अंमलबजावणी होईल. बोरिसोव्ह यांची भेट घेतल्यानंतर पत्रकार परिषदेत राजनाथ सिंह म्हणाले, "भारताने सादर केलेल्या नवीन संरक्षण कराराच्या प्रस्तावाला रशियाकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाला आहे".

भारत - रशिया संबंध 

संरक्षणमंत्री राजनाथ सिंह पुढे म्हणाले, "रशिया आणि भारत यांच्यातील संबंध खूपच चांगले आहेत. या नात्यामध्ये संरक्षणाच्या बाबतीतील संबंधांना विशे। महत्व आहे. उप पंतप्रधान बोरिसोव यांच्यासोबत दोन्ही देशांच्या संरक्षण संबंधांवर बोलणी करण्याची संधी मिळाली. कोविड-१९ (Covid-19) मुळे असलेल्या प्रतिबंधातही ते माझी भेट घेण्यासाठी हॉटेलमध्ये आले, मी त्यांचा आभारी आहे. त्यांच्यासोबत माझी चर्चा खूपच सकारात्मक झाली".

चीनसोबत तणाव असताना राजनाथ सिंह यांचा दौरा 

भारत (India) आणि चीन (China) यांच्यात प्रत्यक्ष नियंत्रण रेषेजवळ तणावपूर्ण स्थिती आहे. त्याच दरम्यान राजनाथ सिंह यांचा रशिया दौरा आला आहे. गेल्या १५ जूनच्या रात्री गलवान खोऱ्यात भारत-चीनच्या सैनिकांमध्ये जोरदार संघर्ष झाला. या संघर्षात भारताचे २० जवान शहीद झाले. या घटनेनंतर दोन्ही देशांतील तणाव खूपच वाढला आहे.

एस-४०० साठी रशियासोबत करार

संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांचा हा दौरा पूर्वनियोजित होता. हवाई संरक्षण यंत्रणा एस-४०० (S-400 anti missile system) खरेदी करण्यासाठी भारताने रशियासोबत करार केला आहे. मात्र, अद्याप या यंत्रणेचा पुरवठा झालेला नाहीये. रशियाच्या मते, कोविड-१९ मुळे संरक्षण यंत्रणा पाठविण्यास विलंब झाला आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी