Indian Coast Guard and ATS seize Pakistani boat with drugs : गुजरातमध्ये भारताच्या तटरक्षक दलाने एक बोट पकडली. या बोटीतून 6 पिस्तुल, 120 राउंड गोळ्या आणि 40 किलो ड्रग्स जप्त करण्यात आले. बोटीत असलेल्या पाकिस्तानच्या 10 नागरिकांना अटक करण्यात आली. जप्त केलेल्या ड्रग्सची आंतरराष्ट्रीय बाजारातील किंमत सुमारे 300 कोटी रुपये आहे.
बोट भारतात घुसखोरी करत होती. पण गुजरात एटीएसने दिलेल्या माहितीआधारे कारवाई करुन तटरक्षक दलाने बोट पकडली आणि कारवाई केली. कारवाई 25 आणि 26 डिसेंबर दरम्यान मध्यरात्री करण्यात आली. आयसीजीएस अरिंजयवरील तटरक्षक दलाच्या टीमने कारवाई केली.
मध्यरात्री केलेल्या कारवाई नंतर भारताच्या तटरक्षक दलाने सोमवारी पहाटे एक मासेमारी करणारी बोट पकडली. या बोटीतील पाकिस्तानच्या नागरिकांनाही पकडण्यात आले.
पाकिस्तान आणि बांगलादेशमधून भारतात मोठ्या प्रमाणात ड्रग तस्करी होते. या तस्करीला आळा घालण्यासाठी भारत सरकारने कठोर पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. सीमा भागाचे रक्षण करणाऱ्या जवानांना आधुनिक शस्त्रे, नाईट व्हिजन डिव्हाईस, हँड हेल्ड थर्मल इमेजर, ट्विन टेलिस्कोप, ड्रोन असे साहित्य पुरवून त्यांच्या सामर्थ्यात वाढ करण्यात आली आहे. यामुळे मागील काही महिन्यांपासून ड्रग तस्करांविरुद्धच्या कारवायांची संख्या वाढली आहे.