Indian Govt has directed NCDC and ICMR asking to keep a close watch on Monkeypox situation abroad : नवी दिल्ली : भारत सरकारने एनसीडीसी आणि आयसीएमआर या दोन्ही संस्थांना परदेशातील मंकीपॉक्स स्थितीवर लक्ष ठेवण्याचे निर्देश दिले. ज्या देशांमध्ये मंकीपॉक्सचे रुग्ण आढळत आहेत त्या देशांमधून येणाऱ्या आणि विशिष्ट लक्षणे आढळलेल्या व्यक्तींचे नमुने पुण्याच्या एनआयव्हीकडे तपासणीसाठी पाठवा असेही निर्देश एनसीडीसी आणि आयसीएमआर या दोन्ही संस्थांना भारत सरकारने दिले आहेत.
तब्येत पाणी । वेबस्टोरी : आरोग्य
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने विमानतळ आणि बंदर या ठिकाणी असलेल्या आरोग्य अधिकाऱ्यांना दक्षतेचे आदेश दिले आहेत. ज्या देशांमध्ये मंकीपॉक्सचे रुग्ण आढळत आहेत त्या देशांमधून येणाऱ्या आणि विशिष्ट लक्षणे आढळलेल्या व्यक्तींचे नमुने पुण्याच्या एनआयव्हीकडे तपासणीसाठी पाठवा असे निर्देश विमानतळ आणि बंदर या ठिकाणी असलेल्या आरोग्य अधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत.
इंग्लंड, अमेरिका, पोर्तुगाल, स्पेन आणि निवडक युरोपच्या देशांमध्ये मंकीपॉक्सचे रुग्ण आढळले आहेत. मंकीपॉक्स आजाराची लक्षणे कांजिण्या (कांजण्या) या आजारासारखी पण सौम्य स्वरुपाची असतात. मंकीपॉक्स झाल्यावर त्वचेवर लालसर रंगाचे फोड येतात. हे फोड आल्यावर खाजवले तर फोड फुटून त्यातून बाहेर पडणारा द्राव संसर्ग पसरवू शकतो. यामुळे मंकीपॉक्स झालेल्या व्यक्तीला वैद्यकीय सल्ल्याने स्वतंत्र खोलीत राहून उपचार घेण्याचा सल्ला डॉक्टर देतात. मंकीपॉक्स हा दोन ते चार आठवड्यात बरा होणारा आजार आहे. पण सध्या या आजारावर ठोस उपचार पद्धती अस्तित्वात आलेली नाही. अनेक डॉक्टर कांजिण्या (कांजण्या) या आजारावर करतात तशा स्वरुपाचे उपचार करून आणि विशिष्ट औषधे लागू पडली नाही तर रुग्णाच्या तब्येतीचा अंदाज घेऊन अनुभवाने औषधे बदलून उपचार करत आहेत. यामुळे सध्या मंकीपॉक्सचा मृत्यूदर ३-६ टक्के आहे.
मंकीपॉक्स हा आजार १९५८ मध्ये पहिल्यांदा माकडांमध्ये आढळला आणि १९७० मध्ये तो माणसाला झाल्याचे पहिले उदाहरण सापडले. हा आजार प्रामुख्याने आफ्रिका खंडातील मध्य आणि पश्चिम भागातील देशांमध्ये मोठ्या प्रमाणावर आढळतो. इतर देशांमध्ये मंकीपॉक्सचे रुग्ण अधूनमधूनच आढळले आहेत.
जागतिक आरोग्य संघटनेने दिलेल्या माहितीनुसार, मंकीपॉक्स झाल्यास ताप येणे, त्वचा लालसर दिसणे, त्वचेवर लालसर रंगाचे फोड येणे, अंगदुखी अशा स्वरुपाची लक्षणे आढळतात.
मंकीपॉक्स झालेल्या व्यक्तीने आदर्श स्थिती स्वतंत्र खोलीत राहून स्वच्छतेचे नियम पाळून वैद्यकीय उपचार घ्यावे. वैद्यकीय सल्ल्याने पथ्ये आणि औषधोपचार यांचे पालन करावे. मंकीपॉक्स झालेल्या व्यक्तीच्या वस्तू वापरणे संबंधित व्यक्ती बरी होईपर्यंत टाळावे. मंकीपॉक्स झाल्यावर त्वचेवर लालसर रंगाचे फोड येतात. हे फोड आल्यावर खाजवले तर फोड फुटून त्यातून बाहेर पडणारा द्राव संसर्ग पसरवू शकतो. सर्वांनी ही बाब लक्षात घ्यावी आणि मंकीपॉक्स झालेल्या व्यक्तीच्या शरीरावर आलेले लालसर फोड खाजवून फोडू नये.