Indian Railway to Open Pod Hotel : रेल्वे प्रवाशांसाठी मोठी खूशखबर, बातमी ऐकूनच व्हाल रिफ्रेश, आनंदाने माराल उड्या

प्रवासाने थकून भागून मुंबईत आल्यावर आता हॉटेल शोधण्यासाठी पायपीट करण्याची गरज नाही. मुंबईतील सीएसएमटी स्थानकावर जून महिन्याच्या अखेरीस 'पॉड हॉटेल' सुरू होणार आहे.

Indian Railway to Open Pod Hotel
मुंबईत सुरू होतंय 'पॉड हॉटेल'  |  फोटो सौजन्य: Times of India
थोडं पण कामाचं
  • CSMT वर सुरू होतंय 'पॉड हॉटेल'
  • प्रवाशांच्या राहण्याची, अंघोळीची स्वस्तात सोय
  • प्रवाशांचा वेळही वाचणार आणि पैसाही

Indian Railway to Open Pod Hotel | रेल्वेनं प्रवास (Travel) करून इच्छित स्थळी (Destination) पोहोचल्यानंतर मोठा प्रश्न असतो तो राहण्याच्या (Accommodation) सोयीचा. एखाद्या शहरात आपलं घर किंवा नातेवाईक नसतील, तर सुरू होते हॉटेलची (Hotel) शोधाशोध. पण महानगरांमध्ये हॉटेलचे दरही परवडणारे नसतात. अशा प्रवाशांसाठी आता रेल्वेनं एक ‘गुड न्यूज’ दिली आहे. जर तुम्ही रेल्वेचा प्रवास करून मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवर उतरणार असाल, तर तुम्हाला हॉटेलची चिंता करण्याची गरज नाही. दक्षिण मुंबईत असणाऱ्या CSMT रेल्वे स्टेशनवर एक ‘पॉड हॉटेल’ उभारलं जातंय. याचं काम जवळपास पूर्ण झालं असून जून महिन्याच्या अखेरीस ते प्रवाशांसाठी खुलं करण्यात येणार असल्याची माहिती रेल्वे अधिकाऱ्यांनी दिली आहे. 

वेटिंग रूमच्या जवळ होतंय पॉड हॉटेल

सीएसएमटी रेल्वे स्टेशनवर सध्या जी वेटिंग रूम आहे, तिच्या शेजारीच हे हॉटेल उभं राहतंय. यापूर्वी पश्चिम रेल्वे मार्गावर असणाऱ्या मुंबई सेंट्रल या रेल्वे स्थानकावर ही सोय करण्यात आली होती. 17 नोव्हेंबर 2021 या दिवशी मुंबई सेंट्रल स्टेशनवरील पॉड हॉटेल नागरिकांसाठी खुलं करण्यात आलं होतं. त्यानंतर आता मुंबईतील हे दुसरं पॉड हॉटेल सुरू होत आहे. 

Pod Hotel

प्रत्येकासाठी स्वतंत्र वॉशरूम

सीएसएमटी स्टेशनवर तयार होणाऱ्या या हॉटेलमध्ये एकाच वेळी 50 लोकांच्या राहण्याची सोय होऊ शकते. या हॉेटेलमध्ये फॅमिलीसाठी 4 पॉड तयार करण्यात आले आहेत, तर 30 सिंगल पॉड आहेत. पुरुष आणि महिलांसाठी वेगवेगळ्या स्वच्छतागृहांची सोय करण्यात आली आहे. वेगवेगळे टॉयलेट्स, अंघोळीसाठी बाथरूम्स आणि साहित्य ठेवण्यासाठीही वेगळ्या खोल्या तयार करण्यात आल्या आहेत. 

नाममात्र दरात मिळणार सुविधा

रेल्वेला या सेवेतून 55.68 लाख रुपयांचा महसूल मिळेल, अशी माहिती मध्य रेल्वेचे जनसंपर्क अधिकारी शिवाजी सुतार यांनी माध्यमांना दिली आहे. या हॉटेलचं काम जवळपास पूर्ण झालं आहे आणि या महिन्याच्या अखेरीस प्रवाशांसाठी ते खुलं केलं जाण्याची शक्यता आहे. शहरात हॉटेलसाठी जे दर आकारले जातात, त्या तुलनेत पॉड हॉटेलचे दर खूपच कमी असतील, अशी माहिती त्यांनी दिली आहे. या हॉटेलमुळे नागरिकांचा वेळ आणि पैसा या दोन्हीची बचत होणार आहे. 

पॉड हॉटेल म्हणजे काय?

एक बेड बसेल, एवढ्या आकाराच्या छोट्या छोट्या खोल्यांनी पॉड हॉटेल तयार होतं. या हॉटेलला ‘कॅप्सूल हॉटेल’ असंही म्हटलं जातं. काहीजण याला ‘सिंगल प्रायव्हेट रूम’ असंही म्हणतात. नागरिकांना या हॉटेलमध्ये त्यांच्या गरजेच्या मूलभूत सुविधा पुरवल्या जातात. शौचालय, स्नानगृह आणि आराम करण्यासाठी बेड अशा गोष्टी पॉड हॉटेलमध्ये असतात.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी