भारताचे बिमल पटेल झाले आंतरराष्ट्रीय विधी आयोगाचे सदस्य

India's Bimal Patel elected to UN's International Law Commission भारताच्या रक्षा विद्यापीठाचे कुलगुरु आणि राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार समितीचे सदस्य प्राध्यापक बिमल पटेल (५१) यांची पाच वर्षांसाठी आंतरराष्ट्रीय विधी आयोगाच्या सदस्यपदी निवड झाली.

India's Bimal Patel elected to UN's International Law Commission
भारताचे बिमल पटेल झाले आंतरराष्ट्रीय विधी आयोगाचे सदस्य 
थोडं पण कामाचं
  • भारताचे बिमल पटेल झाले आंतरराष्ट्रीय विधी आयोगाचे सदस्य
  • संयुक्त राष्ट्रांच्या १९२ सदस्य दैशांपैकी १६३ देशांचा पाठिंबा बिमल पटेल यांना मिळाला
  • बिमल पटेल यांचा कार्यकाळ १ जानेवारी २०२३ पासून पुढील पाच वर्षांसाठी

India's Bimal Patel elected to UN's International Law Commission । नवी दिल्ली: भारताच्या रक्षा विद्यापीठाचे कुलगुरु आणि राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार समितीचे सदस्य प्राध्यापक बिमल पटेल (५१) यांची पाच वर्षांसाठी आंतरराष्ट्रीय विधी आयोगाच्या सदस्यपदी निवड झाली. संयुक्त राष्ट्रांच्या १९२ सदस्य दैशांपैकी १६३ देशांचा पाठिंबा बिमल पटेल यांना मिळाला. बिमल पटेल यांचा कार्यकाळ १ जानेवारी २०२३ पासून पुढील पाच वर्षांसाठी असेल.

आंतरराष्ट्रीय विधी आयोगातील आशिया-प्रशांत समुहाच्या (Asia-Pacific group) आठ जागांसाठी मतदान झाले. यावेळी ११ उमेदवारांमधून १६३ देशांच्या पाठिंब्याच्या जोरावर बिमल पटेल यांची निवड झाली. प्रतिस्पर्धी उमेदवारांमध्ये चीन, जपान, दक्षिण कोरिया या देशांचे उमेदवार होते. 

आंतरराष्ट्रीय विधी आयोग आंतरराष्ट्रीय नियम आणि कायद्यांच्या चौकटीत राहून काम करतो. जगभरात आंतरराष्ट्रीय नियम आणि कायद्यांचे पालन होते की नाही यावर लक्ष ठेवतो. आयोगाच्या सदस्यांसाठी झालेल्या निवडणुकीत भारताच्या बिमल पटेल यांना १६३ मते मिळाली. थायलंडच्या उमेदवाराला १६२, जपानच्या उमेदवाराला १५४, व्हिएतनामच्या उमेदवाराला १४५, चीनच्या उमेदवाराला १४२, दक्षिण कोरियाच्या उमेदवाराला १४०, सायप्रसच्या उमेदवाराला १३९, मंगोलियाच्या उमेदवाराला १२३ मते मिळाली. 

मागील काही वर्षांपासून चीन शेजारी देशांना आर्थिक आणि लष्करी ताकदीच्या जोरावर दहशतीत ठेवण्याचा प्रयत्न करत आहे. यामुळे अनेक देश भारताकडे आशेने बघत आहे. चिनी दादागिरीला उत्तर देण्याची ताकद इतर शेजारी देशांच्या तुलनेत भारताकडे जास्त आहे. यामुळे चीनच्या दहशतीला वैतागलेल्या देशांचा भारताला वारंवार पाठिंबा मिळू लागला आहे. या देशांना भारताच्या आंतरराष्ट्रीय वर्तनाविषयी खात्री वाटते. याचा फायदा आंतरराष्ट्रीय पातळीवर निवड प्रक्रियेत भारताला मोठ्या प्रमाणावर होत आहे.

बिमल पटेल यांनी आधी संयुक्त राष्ट्रांच्या युवा संघटनेसाठी तसेच रासायनिक शस्त्रांना प्रतिबंध करण्यासाठी स्थापन केलेल्या संघटनेसाठी आंतरराष्ट्रीय पातळीवर काम केले आहे. या कामांच्या निमित्ताने बिमल पटेल १५ वर्ष नेदरलंडमधील (Netherlands) हेग (Hague) येथे कार्यरत होते.

आंतरराष्ट्रीय विधी आयोग

आंतरराष्ट्रीय विधी आयोगाची स्थापना १९४७ मध्ये झाली. संयुक्त राष्ट्रांनी हा आयोग स्थापन केला. या आयोगात ३४ सदस्य असतात. यापैकी आठ सदस्यांची निवड करण्यासाठी झालेल्या निवडणुकीत बिमल पटेल विजयी झाले. भारताचे संयुक्त राष्ट्रांमधील कायम प्रतिनिधी टी. एस. तिरुमूर्ती यांनी ट्वीट करुन बिमल पटेल यांची आंतरराष्ट्रीय विधी आयोगावर निवड झाल्याचे सांगितले. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी