India's GSAT-24 satellite launched, entire capacity leased to Tata Play : बंगळुरू : इस्रोने भारत सरकारच्या विविध उपक्रमांव्यतिरिक्त खासगी कंपन्यांच्या गरजा पूर्ण करण्यासाठीही उपग्रह अंतराळात पाठविण्याचा कार्यक्रम सुरू केला आहे. न्यूस्पेस इंडिया लिमिटेड (एनएसआयएल) या कंपनीच्या माध्यमातून इस्रो खासगी कंपन्यांसाठी उपग्रह प्रक्षेपित करते. इस्रोच्या न्यूस्पेस इंडिया लिमिटेड कंपनीने 'टाटा प्ले'साठी जीसॅट-२४ अंतराळात प्रक्षेपित केला.
जीसॅट-२४ अंतराळात स्थिरावला आहे. हा एक २४ केयू बँड उपग्रह आहे. या उपग्रहाचे वजन ४१८० किलो एवढे आहे. 'टाटा प्ले'च्या सर्व सेवा या जीसॅट-२४ च्या माध्यमातून हाताळल्या जातील.
भारत सरकारने अंतराळ क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर संशोधन व्हावे तसेच भारताच्या अंतराळ मोहिमांना जास्तीत जास्त निधी उपलब्ध व्हावा यासाठी इस्रोच्या माध्यमातून खासगी अंतराळ मोहिमा सुरू करण्याचा निर्णय घेतला. यानंतर इस्रोने खासगी अंतराळ मोहिमांसाठी मार्च २०१९ मध्ये न्यूस्पेस इंडिया लिमिटेड (एनएसआयएल) या कंपनीची स्थापना केली. ही भारत सरकारची सार्वजनिक क्षेत्रातील कंपनी आहे. याच कंपनीने 'टाटा प्ले'साठी जीसॅट-२४ मोहीम हाती घेतली.
नियोजनानुसार जीसॅट-२४ हा भारतीय उपग्रह आणि मलेशियाचा मीसॅट-३ डी हे दोन उपग्रह एरियन ५ रॉकेटद्वारे (उड्डाणसंख्या ५ ए २७५) प्रक्षेपित करण्यात आले. फ्रेंच गुयाना येथील कोरूतील अंतराळ प्रक्षेपण केंद्र येथून हे प्रक्षेपण करण्यात आले. भारतीय वेळेनुसार गुरुवार २३ जून २०२२ रोजी पहाटे ३.२० वाजता हे प्रक्षेपण झाले. दोन्ही उपग्रह निश्चित केलेल्या जागेवर अंतराळात स्थिरावले आहेत.
जीसॅट-२४ हा भारतीय उपग्रह सरकारी मालकीचा आहे. 'टाटा प्ले' या उपग्रहाचा वापर करण्यासाठी भाडे देणार आहे. यासाठी मेसर्स टाटा प्ले कंपनीने करार केला आहे.