स्फूर्तीदायक कहाणी: सासू अशी हवी... सुनेला शिकून-सवरुन बनवलं थेट सरपंच!

ठाणे जिल्ह्यातील सर्वात मोठ्या आणि महसूल उत्पन्नाप्रमाणे क्रमांक. 1ची ग्रामपंचायत पदी आगरी समाजातील एक महिला थेट सरपंच पदी पोहचली आहे. जाणून घ्या त्यांची स्फूर्तीदायक कहाणी.

inspirational story mother in law should be like this Daughter in law nilima mhatre is made a direct sarpanch
स्फूर्तीदायक कहाणी: सासू अशी हवी... सुनेला शिकून-सवरुन बनवलं थेट सरपंच!  
थोडं पण कामाचं
  • ठाणे जिल्ह्यातील सर्वात मोठ्या ग्रामपंचायत सरपंचपदी निलिमा म्हात्रे
  • आगरी समाजातील पुरोगामी कुटुंब
  • मेहनत आणि शिक्षणाच्या जोरावर निलिमा म्हात्रेंनी मिळवलं सरपंच पद

कल्याण: ठाणे जिल्ह्यातील सर्वात मोठ्या आणि महसूल उत्पन्नाप्रमाणे क्रमांक. 1ची ग्रामपंचायत, तसेच राजकीयदृष्ट्या अत्यंत चुरशीची आणि प्रतिष्ठेच्या मानल्या जाणाऱ्या म्हारळगाव (ता. कल्याण) ग्रामपंचायतच्या सरपंच पदी सौ. निलिमा नंदू म्हात्रे ह्यांची बिनविरोध निवड झाली. (inspirational story mother in law should be like this Daughter in law nilima mhatre is made a direct sarpanch)

एकीकडे आजही आगरी समाजात महिला घरातील पुरुष मंडळीसमोर वर खुर्ची किंवा सोफ्यावर बसत नाहीत, खाली बसतात. हा स्वत: त्यांनी पाडून घेतलेला पायंडा म्हणा किंवा घरातील पुरुष मंडळीचा धाक किंवा त्यांना मान देण्याची पद्धत म्हणा. एखादी नवविवाहिता जर चुकून सगळ्यांसमोर वर बसलीच तर घरातील बायका तिची कान उघाडणी करतात. ती हिरमुसते, तिचं मन दुखावलं जातं आणि आपलं स्थान तिथे खालीच आहे असं तिच्या मनात एकाप्रकारे बिंबवलं जातं. एकदा लग्न झालं की त्या मुलीने घरातली जबाबदारी सांभाळावी आणि मुलं झाली की त्यांचं पालनपोषण करावं त्यातचं आपलं सुख शोधावं, मानावं. 

आजही अनेक घरात हेच समीकरण आहे. जर घरातली सून कामाला गेली तर मग घर कोण सांभाळणार? घरातली कामं कोण करणार? या गोष्टीला प्रमाणापेक्षा जास्त महत्त्व देऊन तिला घराबाहेर पडायला परवानगी दिली जात नाही. किंवा नोकरी करणाऱ्या किंवा स्वत:च्या पायावर उभं राहू पाहणाऱ्या, कर्तृत्व गाजवू पाहणाऱ्या, स्वत:ची ओळख निर्माण करणाऱ्या महिलेला घरातून तसा फारसा पाठिंबा मिळतोच असं नाही. 

अनेक गावागावात ही परिस्थिती आहे, हे कटू असलं तरी हे वास्तव आहे. मात्र, ठाणे जिल्ह्यातील कल्याण तालुक्यातील म्हारळ या छोट्याशा गावात हे चित्र बदलेलं आपल्याला पाहायला मिळालं. निलीमा नंदू म्हात्रे यांची कहाणी वेगळी आहे, समाजातील प्रत्येक स्त्रीला प्रेरणा देणारी अशीच आहे.

म्हारळ येथील म्हात्रे कुटूंबात निलीमा लग्न होऊन आल्या तेव्हा त्या १२ वी पास होत्या. वयाने लहान होत्या मात्र त्यांची स्वप्न मोठी होती, जिद्द होती आणखी शिकण्याची आवड होती. मात्र एवढ्या मोठ्या घरांचा डोलारा सांभाळताना शिक्षण सुरु ठेवणं तसं कठीण होतं. घरातील पै पाहुणे, सणवार, दुखणी खुपणी, सगळ्यांची काळजी वाहणं हे सगळं ओघाने त्या करत होत्याच मात्र, त्यांच्या सासूबाईंची इच्छा होती की निलीमा यांनी पुढील शिक्षण पूर्ण करावं. त्यासाठी सासूबाईंनी त्यांना मदत केली, प्रोत्साहन दिलं, शिक्षण पूर्ण करण्यासाठी मोकळीक दिली. 

जिद्दीने निलिमा यांनी बी ए. बीएडचं शिक्षण पूर्ण केलं आणि त्यांच्या सासूबाईंच्या कष्टचं चीझ झालं. सासूबाई अशिक्षित होत्या मात्र आधुनिक विचारांच्या होत्या. त्यांनी सुनांना लेकीप्रमाणे वागवलं. त्यांची मोठी सून सोनाली संतोष म्हात्रे कॉम्पुटर इंजिनियर असून ती न्यूयॉर्क, अमेरिकेमध्ये ऑटोमेशन इंजिनियर पदावर आहे. 

सुनांनी नवनवीन गोष्टी शिकाव्या यासाठी त्या कायम प्रयत्नशील असतात. घरातल्या या वातावरणामुळे निलिमा यांचा आत्मविश्वास वाढला. त्याच्यातली वक्तृत्व कला वाढीस लागली. ताईंच्या अभ्यासू व्यक्तिमत्त्वामुळे त्यांना टाइम्स वृत्तसमूहाने सन्मानितही केले होते.

आपलं शिक्षण पूर्ण केलं तसेच त्यावरच न थांबता त्यांनी राज्यशास्त्र विषयात विशेष प्राविण्य मिळवून पदवीत्तर शिक्षण पूर्ण केले. सुरुवातीपासून समाजकारणाची आवड असल्यामुळे त्यांनी स्थानिक पातळीवर अनेक उपक्रम हाती घेतले. त्यांचे पती एका राजकीय पक्षाचे विभागप्रमुख असल्यामुळे आपोआपच त्यांनी राजकारणाचे धडे गिरवायला सुरुवात केली, मात्र समाजात बदल घडवायचा असेल आणि विकास करायचा असेल तर केवळ राजकारण नाही तर आधी समाजकारण आणि जनसेवा करायला हवी असं बाळकडू त्यांनी त्यांचे दीर संतोष कुंडलिक म्हात्रे जे अमेरिकेतील न्यूयॉर्क येथे कॉर्पोरेट वाईस प्रेसिडेंट अश्या मोठ्या हुद्द्यावर आहेत त्यांच्याकडून घेतलं. 

निलीमा ह्या 2015 मध्ये सदस्य म्हणून निवडून आल्या आणि अल्प अवधीत त्यांनी ग्रामपंचायत कारभाराचे बारकावे समजून घेतले. विविधनागरी समस्या समजून घेण्यासाठी नागरिकांसोबत वेळ दिला, नागरी समस्यांचा अभाव असल्यामुळे सर्वात आधी त्याकडे लक्ष देऊन पाणी पुरवठा, सिमेंट काँक्रिटीकरण तसेच पेव्हर ब्लॉकचे रस्ते, बंदिस्त गटारे, हाय-मास विजेचे दिवे इत्यादी सुविधा लवकरात लवकर उपलब्ध करून देण्यावर भर दिला. 

एक ग्रामपंचायत सदस्य म्हणून आपल्या कामाची व्याप्ती केवळ नागरी समस्यांवर केंद्रित न करता त्यांनी राज्य शासन तसेच केंद्र सरकारच्या विविध योजना समजून घेतल्या ना त्याचा लाभ आपल्या नागरिकांना कसा मिळेल ह्यावर भर दिला आणि त्यांच्या प्रयत्नांना यश म्हणून कि काय त्यांनी इतर ग्रामपंचायत सदस्य ह्यांच्या सहकार्याने अनेक योजना जशा की-अत्यंत गरीब आणि विधवांसाठी संजय गांधी निराधार योजना, आदिवासींसाठी खावटी योजना, अपंगांसाठी पेन्शन मिळवून देण्यासाठी योग्य तो पाठपुरावा केला आणि लाभ मिळवून दिला. त्याचप्रमाणे गावातलं इतर मागण्यांसाठी जसे कि नागरिकांची सुरक्षा, स्थानिक खासदारांकडे पाठपुरावा केला. 

तसं पाहिलं तर कदाचित ही कामं एखाद्या साधारण सदस्याने त्याचे कर्तव्य म्हणून करावीच अशी आहेत, परंतु निलीमा म्हात्रे ह्यांनी आपली कौटुंबिक जबाबदारी उत्कृष्टरित्या पार पाडूनच नाही तर स्थानिक पातळीवरील राजकीय समीकरणे, पुरुषप्रधान संस्कृती आणि इतर विरोधाला न जुमानता अत्यंत कौशल्याने पार पाडली. निलीमा ह्यांनी आपल्या वक्तृत्व आणि भाषेच्या प्रभुत्वामुळे अल्पावधीमध्ये स्थानिक राजकारणात मोठी छाप पाडली आहे आणि अनेक इतर स्त्रियांना सक्रिय राजकारणात येण्यास उस्फूर्त केलं आहे. 

त्यांच्या ह्या कामाची पोच पावती म्हणूनच की काय येणाऱ्या निवडणुकीत त्यांना मतदारांकडून पुन्हा निवडणूक लढण्याची गळ घालण्यात येत आहे. वरील उदाहरण देण्याचे प्रयोजन म्हणजे ग्रामपंचायत पद्धतीत योग्य अश्या सुशिक्षित उमेदवाराला निवडून दिले, पोषक वातावरण उपलब्ध करून दिला तर फक्त जनतेची अपेक्षित कामेच होणार नाहीत तर पंचायत राज व्यवस्थेला अपेक्षित यश आलं आहे असंच मानावं लागेल.

एकीकडे आपल्या देशात महिला सक्षमीकरण आणि महिलांना राजकारणात आरक्षण देण्याचा घाट घातला जातो, परंतु प्रत्यक्षात मात्र महिलांना दुय्यम स्थान किंवा फक्त सहीपुरतं मर्यादित ठेवलं जातं, परंतु निलीमा आणि अशा अजून कितीतरी उदाहरणं आहेत कि जेव्हा महिलांना योग्य संधी आणि प्रोत्साहन दिलं जातं तेव्हा त्या समाजकारण आणि राजकारण अश्या दोन्ही आघाड्यांवर खऱ्या उतरतात.

टीप: लेखात आपल्या समाजाचा किंवा चालीरितींचा अवमान करण्याचा हेतू नाहीये, आपल्या समाजात कितीतरी चांगली उदाहरणे सुद्धा आहेत, परंतु आपण आपल्या मुलींना आणि सुनांना चांगला पाठिंबा दिला तर त्या काय करू शकतात ह्याचे एक उदाहरण आहे. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी