[Video] इस्रोने तयार केला पहिला मानवी रोबो, माणसाआधी ‘व्योममित्र’ जाणार अंतराळात

लोकल ते ग्लोबल
Updated Jan 22, 2020 | 19:25 IST | टाइम्स नाऊ मराठी

गगनयानच्या उड्डाणाच्या आधी इस्रो त्यांच्या एका खास मित्राला अंतराळात पाठवणार आहे हा मित्र तेथे मानवी शरीराच्या क्रियांचा अभ्यास करणार आहे. त्याचे नाव आहे ‘व्योममित्र’.

ISRO unveils first half humanoid vyommitra that will be sent to space for Gaganyan mission
[Video] इस्रोने तयार केला पहिला मानवी रोबो, माणसाआधी ‘व्योममित्र’ जाणार अंतराळात  |  फोटो सौजन्य: Times Now
थोडं पण कामाचं
  • मानवयुक्त अंतराळ उड्डाणासाठी २०२२च्या सुरूवातीच्या महिन्यांचं उद्दिष्ट समोर ठेवण्यात आले आहे.
  • गगनयानच्या उड्डाणाच्या आधी इस्रो त्यांच्या एका खास मित्राला अंतराळात पाठवणार आहे
  • हा हाफ ह्युमनॉइड म्हणजे मानवी रोबो अंतराळातून इस्रोला रिपोर्ट पाठवणार आहे.

बंगळुरू:  इस्रोने गगनयान प्रकल्पासाठी चांगलीच कंबर कसली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा गगनयान हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे. या मानवयुक्त अंतराळ उड्डाणासाठी २०२२च्या सुरूवातीच्या महिन्यांचं उद्दिष्ट समोर ठेवण्यात आले आहे. गगनयानच्या उड्डाणाच्या आधी इस्रो त्यांच्या एका खास मित्राला अंतराळात पाठवणार आहे हा मित्र तेथे मानवी शरीराच्या क्रियांचा अभ्यास करणार आहे. त्याचे नाव आहे ‘व्योममित्र’. हा हाफ ह्युमनॉइड म्हणजे मानवी रोबो अंतराळातून इस्रोला रिपोर्ट पाठवणार आहे. आज, बुधवारी इस्रोने या खास रोबोला जगासमोर आणले आहे.  

इस्रोचे वैज्ञानिक सॅम दयाल यांनी याबाबत प्रसारमाध्यमांना माहिती दिली. “व्योममित्र अंतराळात मानवी शरीराच्या क्रियांचा अभ्यास करून अहवाल पाठवणार आहे. याकडे आम्ही एक परीक्षण म्हणून पाहणार आहोत”, असे दयाल यांनी सांगितले. व्योममित्र हा एक खास रोबो आहे. तो बोलू शकतो, माणासालाही ओळखू शकतो. हा रोबो अंतराळवीर जे काम करणार त्याची हुबेहूब नक्कल देखील करू शकतो. व्योममित्र संवादही साधू शकतो आणि लोकांच्या प्रश्नांची उत्तरेही देऊ शकतो.

 

 

इस्रोने विकसित केलेला हा रोबो आज बंगळुरू येथे सादर करण्यात आला. या व्योममित्राने लोकांना अभिवादन करताना म्हटले, ”हाय, मी हाफ ह्युमनॉइडचा पहिला प्रोटोटाइप आहे.” या रोबोचे पाय नसल्याने या रोबोला हाफ ह्युमनॉइड असे म्हटले जाते.

 

 

“हा रोबो केवळ पुढे आणि बाजूला वाकू शकतो. अंतराळातून हा रोबो कमांड सेंटरच्या संपर्कात राहील”, असे दयाल यांनी यावेळी सांगितले. दरम्यान, पंतप्रधान मोदींनी केलेल्या घोषणेनुसार इस्रो २०२२च्या नियोजित वेळेच्या आतच भारताचं पहिलं मानवरहित अंतराळ मिशन गगनयान साकारण्यासाठी जोरदार तयारी करत आहे. या अभियानाचा उद्देश भारतीयांना अंतराळ यात्रेला पाठवून सुरक्षित परत आणणे हा आहे.

इस्रोचे अध्यक्ष के. सिवन यांनी दिलेल्या माहितीप्रमाणे, अंतराळ यात्रेसाठी एकूण १२ पैकी पहिले चार उमेदवार निश्चित झाले आहेत. त्यांचं रशियातील प्रशिक्षण या महिन्याच्या शेवटी सुरू होईल. त्यांची ओळख गुप्त ठेवण्यात आली आहे. हे चारही जण भारतीय हवाईदलाचे टेस्ट पायलट्स असल्याची माहिती आहे. १५ महिने त्यांचं प्रशिक्षण सुरू राहणार आहे. तसेच या मिशनसाठी जवळपास १० हजार कोटी रूपये खर्च होणार आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी