CoronaVirus In India: नवी दिल्ली : केंद्र सरकारने (Central Government) सोमवारी कोरोना (Corona) संसर्गाच्या उपचाराबाबत आपल्या क्लिनिकल (Clinical) मार्गदर्शक तत्त्वांमध्ये (Guidelines) सुधारणा करून ते जारी केले आहेत. या नवीन मार्गदर्शक तत्त्वांची सर्वात मोठी गोष्ट म्हणजे यामध्ये सरकारने (Government) डॉक्टरांना कोविड रुग्णांच्या उपचारात स्टेरॉईड्सचा (steroids) वापर टाळण्यास सांगितले आहे. सरकारचा हा निर्णय अशावेळी आला आहे, जेव्हा काही दिवसांपूर्वीच टास्क फोर्सचे प्रमुख व्हीके पॉल यांनी कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत स्टेरॉईड औषधांच्या अतिवापराबद्दल खंत व्यक्त केली होती. हे नवीन मार्गदर्शक तत्त्व अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था (AIIMS), भारतीय वैद्यकीय संशोधन परिषद (ICMR)-कोविड-19 नॅशनल टास्क फोर्स आणि केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या अंतर्गत जॉइंट मॉनिटरिंग ग्रुप (DGHS) यांनी जारी केले आहेत.
जर कोविडची लक्षणे रुग्णाच्या वरच्या श्वसनमार्गामध्ये उद्भवली आणि रुग्णाला श्वासोच्छवास किंवा हायपोक्सिया सारख्या समस्या नसल्यास, त्याला सौम्य लक्षणांमध्ये ठेवण्यात आले आहे आणि त्याला होम आयसोलेशनमध्ये उपचार करण्याचा सल्ला देण्यात आला आहे. सौम्य लक्षणे असलेल्या रूग्णांना पाच दिवसांपेक्षा जास्त काळ श्वास घेण्यास त्रास होत असल्यास किंवा जास्त ताप किंवा तीव्र खोकला असल्यास डॉक्टरांकडे जाण्याचा सल्ला दिला जात आहे.
जर रुग्णाच्या ऑक्सिजनचे प्रमाण 90 ते 93 टक्क्यांच्या दरम्यान चढ-उतार होत असेल आणि त्यांना श्वास घेण्यास त्रास होत असेल, तर त्यांना रुग्णालयात दाखल करावे. ही मध्यम लक्षणे असून अशा रुग्णांना ऑक्सिजनचा आधार दिला पाहिजे.
जर एखाद्या रुग्णाचा श्वासोच्छवास दर मिनिटाला ३० पेक्षा जास्त असेल, श्वास घेण्यात अडचण येत असेल आणि खोलीच्या तापमानाच्या ९० टक्क्यांपेक्षा कमी ऑक्सिजन संपृक्तता असेल तर ते गंभीर लक्षण मानले जाईल आणि रुग्णाला श्वास घेता येत नसल्याने त्याला आयसीयूमध्ये दाखल करावे. नॉन-इनवेसिव्ह व्हेंटिलेशन (NIV)-हेल्मेट आणि फेस मास्क इंटरफेस अशा रूग्णांसाठी फिट केले जातील ज्यांना जास्त ऑक्सिजनची आवश्यकता असेल आणि ज्यांना मंद श्वासोच्छ्वास असेल. दरम्यान रुग्णांमध्ये सौम्य ते गंभीर लक्षणे असतील तर त्यांना रेमडेसिवर देण्यासाठी आपातकाळ म्हणजे इमर्जन्सी किंवा ‘ऑफ लेबल’ परवानगी देण्यात आली आहे. हे फक्त अशा रुग्णांवर वापरले जाऊ शकते ज्यांना कोणतीही लक्षणे दिसल्याच्या 10 दिवसांच्या आत 'रेनल' किंवा 'यकृत बिघडण्याची' तक्रार नाही.
या सुधारित नवीन मार्गदर्शक तत्त्वात असे नमूद केले आहे की स्टिरॉइड्स असलेली औषधे आधी किंवा जास्त डोसमध्ये किंवा जास्त काळ वापरल्यास म्युकोर्मायकोसिस किंवा ब्लॅक फंगस सारख्या दुय्यम संसर्गाचा धोका वाढवतो. नवीन मार्गदर्शक तत्त्वात, कोरोनाच्या सौम्य, मध्यम आणि गंभीर लक्षणांसाठी वेगवेगळ्या औषधांच्या डोसची शिफारस करण्यात आली आहे. त्याच वेळी, असेही म्हटले आहे की जर एखाद्याचा खोकला दोन-तीन आठवड्यांपर्यंत बरा होत नसेल तर त्याने टीबी किंवा तत्सम इतर कोणत्याही आजाराची तपासणी करावी. यासोबतच, जे रुग्ण कृत्रिमरीत्या ऑक्सिजन घेत नाहीत किंवा घरी आहेत त्यांच्यावर हे औषध वापरू नये, असा सल्ला देण्यात आला आहे.