Jagadguru Paramahamsa to install idol of Shiva in Taj Mahal : आग्रा : उत्तर प्रदेशमधील आग्रा येथे ताजमहाल आहे. या ताजमहालमध्ये २७ एप्रिल रोजी भगवे कपडे घातले होते म्हणून प्रवेश दिला नाही, असे जगद्गुरु परमहंस म्हणाले. त्यांनी ५ मे रोजी पुन्हा ताजमहाल येथे जाणार असल्याचे तसेच आग्रा येथे एक धर्मसंसद आयोजित करणार असल्याचे जाहीर केले. ताजमहाल येथे शिवप्रतिमेची स्थापना करणार आणि भारताला हिंदू राष्ट्र जाहीर करणार, असेही ते म्हणाले.
जगद्गुरु परमहंस आधी अयोध्येतील तपस्वी (तपस्विनी) छावणीचे महंत परमहंस दास या नावाने ओळखले जात होते. त्यांनी मागच्या वर्षी भारताला हिंदू राष्ट्र घोषित करा नाही तर जलसमाधी घेईन असा निर्वाणीचा इशारा ऑक्टोबर २०२१ मध्ये दिला होता. पण जलसमाधी घेतली नव्हती. आता त्यांनी ताजमहालचा मुद्दा हाती घेतला आहे.
जगद्गुरु परमहंस यांना ताजमहालमध्ये प्रवेश करण्यापासून रोखले नाही उलट ताजमहाल बघायला या असे सांगत जाहीर आमंत्रण दिल्याचे एएसआयच्या (Archaeological Survey of India - ASI) राजकुमार पटेल यांनी सांगितले. तर आधी ताजमहालमध्ये येऊ दिले नाही आणि नंतर आमंत्रण दिल्याचा दावा करत आहेत असे जगद्गुरु परमहंस म्हणाले.
आग्रा येथे तेजो महालय (तेजो महाल) आहे. या ठिकाणी एक शिवमंदिर (शंकराचे मंदिर) आहे. या मंदिराच्या जागेवरच ताजमहाल बांधण्यात आला आहे, असे जगद्गुरु परमहंस म्हणाले. त्यांनी ताजमहालमध्ये नव्याने शिवप्रतिमा स्थापन करणार असल्याचे जाहीर केले.
सध्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. यात एएसआयच्या अधिकाऱ्याला जगद्गुरु परमहंस स्वतःची ओळख सांगत असल्याचे दिसत आहे. हा व्हिडीओ दाखवून ताजमहालमध्ये प्रवेश करू दिला नाही, असे जगद्गुरु परमहंस सांगत आहेत. याआधीही जगद्गुरु परमहंस यांनी अनेकदा मोठे मोठे दावे केले आहेत. याच कारणामुळे ते अनेकदा चर्चेत असतात.