जम्मू-काश्मीर: दहशतावद्यांशी होत असलेल्या चकमकीत 5 जवान शहीद, अजूनही ऑपरेशन सुरूच

जम्मू-काश्मीरच्या राजौरी जिल्ह्यात आज दहशतवाद्यांशी चकमक होत आहे. या चकमकीत 5 जवान शहीद झाले आहेत.

Jammu and Kashmir 5 jawans martyred in clashes with terrorists,
जम्मू-काश्मीर: दहशतावद्यांशी होत असलेल्या चकमकीत 5 जवान शहीद  |  फोटो सौजन्य: Times Now
थोडं पण कामाचं
  • जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवाद्याविरोधात भारतीय लष्कर सतत कारवाई करत आहेत.
  • अतिरेकी शस्त्रास्त्रांसह नियंत्रण रेषा ओलांडून जंगलात लपले आहेत.
  • राजौरी जिल्ह्याच्या पीर-पंजाल भागात दहशतावाद्यांच्या विरोधात कारवाई सुरू

श्रीनगर: जम्मू-काश्मीरच्या राजौरी जिल्ह्यात आज दहशतवाद्यांशी चकमक होत आहे. या चकमकीत 5 जवान शहीद झाले आहेत. सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार राजौरी जिल्ह्याच्या पीर-पंजाल भागात दहशतावाद्यांच्या विरोधात चालू असलेल्या कारवाईत 4 जवान आणि जेसीओ (ज्युनिअर कमीशन्ड ऑफिसर) शहीद झाले आहेत. 

दहशतवाद्यांविरोधात सतत चालू आहे कारवाई 

जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवाद्याविरोधात भारतीय लष्कर सतत कारवाई करत असून दहशतवाद्यांचा खात्मा करण्याची मोहीम राबवली जात आहे. काही दहशतवाद्यांच्या लपल्याच्या बातमीनंतर भारतीय लष्कराने कारवाई सुरू केल्याचे सांगितले जात आहे. त्यानंतर दहशतवाद्यांनी गोळीबार सुरू केला आणि त्यानंतर चकमक सुरू झाली. सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक अजूनही सुरू आहे.

घटनास्थळी अतिरिक्त फौज पाठवण्यात आली

अधिका-यांनी सांगितले की, अतिरेकी शस्त्रास्त्रांसह नियंत्रण रेषा ओलांडून जंगलात लपल्याच्या बातमी मिळाली आहे. घटनास्थळी अतिरिक्त दल पाठविण्यात आले आहे, जेणेकरून दहशतवाद्यांचे बाहेर पडण्याचे सर्व मार्ग बंद करता येतील. संरक्षण विभागाच्या प्रवक्त्याने सांगितले की, दहशतवाद्यांच्या उपस्थितीची माहिती मिळाल्यानंतर पहाटेच्या सुमारास ऑपरेशन सुरू करण्यात आले.

अनंतनागमध्ये 1 दहशतवादी ठार, एक जवान जखमी

जम्मू -काश्मीरच्या अनंतनागमध्ये सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये रात्री उशिरा चकमक सुरू झाली, यात लष्कराच्या जवानांनी 1 दहशतवाद्याला ठार केले. काश्मीर झोनच्या पोलिसांनी सांगितले की, चकमकीत एक पोलीस कर्मचारीही जखमी झाला आहे, ज्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, एका विशिष्ट माहितीवर पोलीस अनंतनागच्या खगुंड वेरीनाग परिसरात OGW (ओव्हर ग्राउंड वर्कर) घेण्यासाठी गेले होते.

पोलिसांचे पथक संशयित घटनास्थळाच्या दिशेने पोहचताच लपून बसलेल्या दहशतवाद्याने पोलीस पक्षावर गोळीबार केला आणि चकमकीला सुरुवात केली. पोलीस अधिकारी पुढे म्हणाले की, गोळीबारादरम्यान एक अज्ञात दहशतवादी ठार झाला, तर एका कॉन्स्टेबललाही गोळी लागली. त्याला उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात नेण्यात आले. दरम्यान, ठार झालेल्या दहशतवाद्याकडून एक पिस्तूल आणि ग्रेनेड जप्त करण्यात आले आहे.

सुरक्षा दलांनी बांदीपोरा येथे एका दहशतवाद्याला ठार केलं

याशिवाय जम्मू -काश्मीरमधील बांदीपोराच्या हाजीन भागातील गुंडजहागीरमध्येही सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरू असून लष्कराच्या जवानांनी एका दहशतवाद्याला ठार केले आहे. पोलीस सुत्रांनी सांगितले की, परिसरात दोन ते तीन दहशतवादी लपल्याचा संशय आहे, ऑपरेशन संपल्यानंतर प्रत्यक्ष संख्या सांगता येईल. परिसरात अजूनही शोधमोहीम सुरू आहे.


 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी