Jammu Kashmir: जम्मू-काश्मीर पोलिसांनी रविवारी पुलवामा (Pulwama) जिल्ह्यातील त्राल भागात सुमारे 10-12 किलो वजनाचा आयईडी जप्त (IED seized) करून मोठी घटना टळल्याचा दावा केला आहे. काश्मीर झोनच्या पोलिसांनी सांगितले की, पोलिसांच्या एका विशिष्ट इनपुटच्या आधारे, त्रालच्या बेहगुंड भागात सुमारे 10-12 किलो वजनाचा IED जप्त करण्यात आले आहे. पोलिसांनी सांगितले की, लष्कर आणि पोलिसांना आयईडी निष्क्रिय करण्यात यश आले आहे.
याआधी जम्मू-काश्मीरमधील सांबा जिल्ह्यात बुधवारी एका मोकळ्या शेतातून सुमारे 44 किलो वजनाचा मोर्टार शेल जप्त करण्यात आले होते. मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांच्या पथकाने स्वच्छता मोहिमेदरम्यान ते दिसले.
त्यानंतर जवानांच्या बॉम्बशोधक पथकाला पाचारण करून ते निकामी करण्यात आले. दरम्यान देशात वेगवेगळ्या ठिकाणी सुरक्षेच्या दृष्टीनं सध्या हाय अलर्ट देण्यात आला आहे.
दुसरीकडे, जम्मू-काश्मीरच्या राजौरी जिल्ह्यात नियंत्रण रेषेजवळ रविवारी लष्कराच्या जवानांनी एका पाकिस्तानी घुसखोराला अटक केली आहे. राजौरी येथील वरिष्ठ पोलीस अधीक्षक मोहम्मद अस्लम यांनी सांगितले की, नौशेरा सेक्टरमधील सहार माकरी भागात नियंत्रण रेषेचे रक्षण करणाऱ्या लष्कराच्या जवानांना एका घुसखोराची संशयास्पद हालचाल दिसली आणि त्यांनी त्याला आव्हान दिले, त्यानंतर तो पळू लागला त्यानंतर घुसखोरावर गोळीबार करण्यात आला, त्यात तो जखमी झाला आणि त्याला पकडण्यात आले. त्याच्यावर स्थानिक लष्करी रुग्णालयात उपचार करण्यात आले आणि आता त्याला राजौरी येथील लष्करी रुग्णालयात नेण्यात आले आहे. या प्रकरणाची चौकशी करून नंतर घुसखोराची चौकशी केली जाईल, असं अस्लम यांनी सांगितले.
Read Also : Maharashtra Monsoon Session : अधिवेशनाचा तिसरा दिवसही गाजणार
तथापि, अधिकृत सूत्रांनी घुसखोराची ओळख 32 वर्षीय तबरीक हुसैन म्हणून केली आहे, जो पाकव्याप्त काश्मीरचा रहिवासी आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, हुसैनकडून कोणतीही संशयास्पद वस्तू सापडलेली नाही आणि तो नियंत्रण रेषा ओलांडण्याचा प्रयत्न का करत होता, हे चौकशीनंतरच समजेल.