‘राहुल गांधींनी काश्मीरमध्ये पर्यटनाला जावे, त्यांची सगळी व्यवस्था करू’; कोण म्हणाले?

लोकल ते ग्लोबल
Updated Aug 25, 2019 | 19:16 IST | टाइम्स नाऊ हिंदी

राहुल गांधी आणि त्यांच्या इतर पक्षांच्या शिष्टमंडळाला श्रीनगरमधून माघारी पाठवण्याच्या निर्णयाचे लोकशाही आघाडीतील घटक पक्षांनी समर्थन करण्यास सुरुवात केली आहे. शिवसेनेचे संजय राऊत यांनी सरकारची पाठराखण केली आहे.

Congress leader Rahul Gandhi
राहुल गांधींनी काश्मीरमध्ये पर्यटनाला जावे : संजय राऊत   |  फोटो सौजन्य: PTI

थोडं पण कामाचं

  • काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यासह विरोधी पक्ष नेत्यांना श्रीनगर विमानतळावर अडविले
  • सुरक्षेच्या कारणास्तव सर्वपक्षीय नेत्यांना विमानतळावरून दिल्लीला माघारी पाठविले
  • संजय राऊत यांचा राहुल गांधींना अजब सल्ला; 'काश्मीरमध्ये पर्यटनाला जा, सगळी व्यवस्था करू'

नवी दिल्ली : जम्मू-काश्मीरला विशेष दर्जा देणारे कलम ३७० रद्द केल्यानंतर काश्मीरमधील जनजीवन अद्याप पूर्वपदावर आलेले नाही. सरकार कितीही दावा करत असले तरी, अजूनही काश्मीरमध्ये जनजीवन विस्कळीत आहे. काश्मीरमध्ये ही परिस्थिती असली तरी, दिल्लीत काश्मीरमधून आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. सत्ताधारी पक्ष आणि त्यांचे सहकारी मित्रपक्ष या निर्णयाचं स्वागत करत आहेत तर, विरोधी पक्षांनी ही सरकारची एकाधिकारीशाही असल्याची टीका केली आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी इतर नेत्यांसह काश्मीर दौरा करण्याचा प्रयत्न केला. परंतु, त्यांना श्रीनगर विमानतळावरूनच पुन्हा दिल्लीला पाठवण्यात आले. आता या प्रकारावरून पुन्हा आरोप-प्रत्यारोपांची मालिका सुरू झाली आहे. राहुल आणि त्यांच्या इतर पक्षांच्या शिष्टमंडळाला श्रीनगरमधून माघारी पाठवण्याच्या निर्णयाचे राष्ट्रीय लोकशाही आघाडीतील घटक पक्षांनी समर्थन करण्यास सुरुवात केली आहे. शिवसेनेचे प्रवक्ते संजय राऊत यांनी सरकारची पाठराखण केली आहे.

‘राहुल गांधींची सगळी व्यवस्था करू’

या संदर्भात संजय राऊत यांनी माध्यमांशी संवाद साधला. त्यात राऊत म्हणाले, ‘जर, राहुल गांधी पर्यटनासाठी जम्मू-काश्मीरला जाणार असतील तर, आम्ही तेथील पर्यटन विभागाला याची माहिती देऊ आणि त्यांची सगळी व्यवस्था करू. त्यांना आणि त्यांच्या शिष्टमंडळाला माघारी पाठवण्यात आले. याचेही एक कारण आहे. त्यांच्या उपस्थितीत तेथील परिस्थिती आणखी भयंकर होण्याचा धोका आहे.’ राहुल गांधी यांच्यासमवेत भाकप, डीएमके, आरजेडी, एनसीपी आणि जेडीएस या सगळ्या विरोधी पक्षांच्या नेत्यांचे शिष्टमंडळ जम्मू-काश्मीर दौऱ्यावर गेले होते. तेथील स्थानिक पातळीवरची परिस्थिती जाणून घेण्यासाठी या नेत्यांनी काश्मीर दौऱ्याची आखणी केली होती. यात राज्यसभा सदस्य गुलाम नबी आझाद, आनंद शर्मा, सीताराम येचुरी, शरद यादव, मनोज झा, मजीद मेमन, तिरुची शिवा आणि डी राजा यांचा समावेश होता. शनिवारी हे नेते श्रीनगरला रवाना झाल होते. दिल्ली विमानतळावर त्यांनी माध्यमांशी संवाद साधताना, कोणताही गोंधळ करण्यासाठी नाही तर, तेथील वास्तव परिस्थिती जाणून घेण्यासाठी जात असल्याचे स्पष्ट केले होते.

संसद सदस्यांचा आभारी : राऊत

दरम्यान, केंद्र सरकारने जम्मू-काश्मीरसाठीचे कलम ३७० रद्द करण्याचा निर्णय घेतला. त्यावरही राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले, ‘मी एवढेच सांगेन की, कलम ३७० हटविण्याच्या निर्णयानंतर आमचे स्वप्न पूर्ण झाले. मला खात्री आहे की, संपूर्ण देशाला या निर्णयाची प्रतीक्षा होती. हा निर्णय घेतल्याबद्दल मी संसद सदस्य आणि मंत्र्यांचा आभारी आहे.’ कलम ३७० हटविण्याच्या निर्णयाआधी सरकारने काश्मीरमधील सर्व यात्रा रद्द केल्या होत्या. तसेच तेथे गेलेल्या पर्यटकांनाही बाहेर काढण्यात आले होते. त्यानंतर कलम रद्द करण्याच्या निर्णयाबरोबरच जम्मू-काश्मीर आणि लडाख दोन स्वतंत्र केंद्र शासित प्रदेश करण्याच्या निर्णयाची घोषणा केंद्र सरकारने केली.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी
loadingLoading...
loadingLoading...
loadingLoading...