आसारामच्या जामीन अर्जावर जानेवारीत सुनावणी

jodhpur Court Accepted Asaram Plea Hearing On Bail मागील सात वर्षांपासून राजस्थानमधील जोधपूरच्या जेलमध्ये असलेल्या आसारामच्या जामीन अर्जावर जानेवारी २०२१ मध्ये सुनावणी होणार

Asaram
आसारामच्या जामीन अर्जावर जानेवारीत सुनावणी 
थोडं पण कामाचं
  • आसारामच्या जामीन अर्जावर जानेवारीत सुनावणी
  • राजस्थान हायकोर्टात जानेवारी २०२१च्या तिसऱ्या आठवड्यात जामीन अर्जावर होणार सुनावणी
  • वय आणि तब्येतीचे कारण देत जामीन मिळवण्याचा आसारामचा प्रयत्न

जोधपूर: मागील सात वर्षांपासून राजस्थानमधील जोधपूरच्या जेलमध्ये असलेल्या आसारामच्या जामीन अर्जावर जानेवारी २०२१ मध्ये सुनावणी होणार आहे. जन्मठेपीची शिक्षा भोगत असलेल्या आसारामने जामीन मिळावा यासाठी अर्ज केला होता. या अर्जावर जानेवारीच्या तिसऱ्या आठवड्यात सुनावणी होणार आहे. (jodhpur Court Accepted Asaram Plea Hearing On Bail)

महिला शोषण प्रकरणी आसारामला त्याच्या मध्य प्रदेशमधील छिंदवाडाच्या आश्रमातून अटक करण्यात आली होती. अटकेनंतर आसारामची रवानगी राजस्थानमध्ये जोधपूरच्या जेलमध्ये झाली होती. आसाराम १ सप्टेंबर २०१३ पासून जोधपूरच्या सेंट्रल जेलमध्ये आहे. या जेलमध्ये असतानाच आसाराम विरोधात महिला शोषण प्रकरणी खटला चालवण्यात आला. तब्बल पाच वर्षांनंतर २५ एप्रिल २०१८ रोजी या प्रकरणात एससी-एसटी कोर्टाने आसारामला दोषी ठरवले. कोर्टाने जन्मठेपेची शिक्षा दिली. या शिक्षेमुळे आसाराम मरेपर्यंत जेलमध्येच राहणार हे निश्चित झाले. जन्मठेपेच्या शिक्षेचा निर्णय एससी-एसटी कोर्टाच्या मधुसूदन शर्मा यांनी दिला होता. 

वय आणि तब्येतीचे कारण देत जामीन मिळवण्याचा आसारामचा प्रयत्न

अटक झाल्यापासून आसारामने अनेकदा न्यायदंडाधिकाऱ्यांपासून ते सर्वोच्च न्यायालयापर्यंत ठिकठिकाणी जामीन मिळवण्यासाठी अर्ज करुन बघितले. पण कोणत्याही कोर्टातून जामीन मिळाला नाही. अखेर आसारामने ८० वर्षांचा झालो आहे, शरीराने थकलो आहे अशा स्वरुपाची कारणे देत राजस्थान हायकोर्ट येथे एक जामीन अर्ज सादर केला. जगमाल चौधरी आणि प्रदीप चौधरी या दोन ज्येष्ठ वकिलांनी आसारामच्यावतीने जामीन मिळवण्यासाठी कोर्टात अर्ज केला. कोर्टाने या प्रकरणात जानेवारी २०२१च्या तिसऱ्या आठवड्यात सुनावणी घेऊ असे जाहीर केले. सुनावणीनंतर जामीन अर्जावर निर्णय देऊ असेही कोर्टाने स्पष्ट केले. या निर्णयामुळे सात वर्षांनंतर पहिल्यांदा आसाराम जेलमधून बाहेर पडण्याची शक्यता आहे. 

आसाराम बापू नावाने ओळखला जात होता आसाराम

अटक होण्याआधी आसाराम याला आसाराम बापू या नावाने ओळखत होते. त्याचे देशात ४५० लहान-मोठे आश्रम होते. स्वतःला अध्यात्मिक गुरू म्हणवणाऱ्या आसारामच्या शिष्यांची संख्या कोट्यवधींच्या घरात होती. शिष्यांमध्ये लहान-मोठे, महिला-पुरुष असे सर्वजण होते. समाजाच्या वेगवेगळ्या स्तरांतील अनेक गरीब आणि श्रीमंत आसारामला स्वतःचा गुरु मानत होते. पण आसाराम आणि त्याचा मुलगा नारायण साई या दोघांवर महिला शोषणाचा आरोप झाला आणि दोघांच्या अडचणी वाढल्या. यथावकाश कोर्टाने दोषी ठरवून आसारामला जन्मठेपेची शिक्षा दिली. आसारामचा मुलगा नारायण साई अद्याप सुरतच्या जेलमध्ये आहे.

सिंध प्रांतात जन्मला आहे आसाराम

आसारामचा जन्म १७ एप्रिल १९४१ रोजी सिंध प्रांतातील नवाबशहा जिल्ह्यात झाला. त्यावेळी सिंध प्रांत हा इंग्रजांच्या ताब्यातील भारतात होता. इंग्राजांनी देश सोडताना फाळणी केली आणि सिंध प्रांत पाकिस्तानमध्ये गेला. आसाराम घरच्यांसोबत गुजरातमध्ये येऊन स्थिरावला. गुजरातमध्ये पोटापाण्याचे उद्योग करताना अध्यात्माची ओढ लागली असे आसाराम सांगतो. पण महिला शोषणाचा आरोप झाल्यानंतर आसारामचे आयुष्य पूर्णपणे बदलले. राजस्थान हायकोर्ट आसारामच्या जामीन अर्जावर पुढच्या वर्षी जानेवारीच्या तिसऱ्या आठवड्यात सुनावणी घेणार आहे. पण या सुनावणीत काय होऊ शकते यावर आतापासूनच तर्कवितर्कांना उधाण आले आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी