CJI : महाराष्ट्राचे सुपुत्र उदय लळीत आज सरन्यायाधीश पदाची शपथ घेणार

Justice Uday Umesh Lalit will take oath today as 49th Chief Justice of India : महाराष्ट्रातील सिंधुदुर्ग जिल्ह्यात जन्मलेले न्या. उदय उमेश लळीत (Uday Umesh Lalit) हे भारताचे ४९वे सरन्यायाधीश होतील. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू न्या. उदय उमेश लळीत यांना आज (शनिवार २७ ऑगस्ट २०२२) सरन्यायाधीश पदाची शपथ देतील.

Justice Uday Umesh Lalit will take oath today as 49th Chief Justice of India
CJI : महाराष्ट्राचे सुपुत्र उदय लळीत आज सरन्यायाधीश पदाची शपथ घेणार  |  फोटो सौजन्य: Representative Image
थोडं पण कामाचं
  • CJI : महाराष्ट्राचे सुपुत्र उदय लळीत आज सरन्यायाधीश पदाची शपथ घेणार
  • जेमतेम ३ महिन्यांचा कार्यकाळ
  • राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू न्या. उदय उमेश लळीत यांना आज (शनिवार २७ ऑगस्ट २०२२) सरन्यायाधीश पदाची शपथ देतील

Justice Uday Umesh Lalit will take oath today as 49th Chief Justice of India : नवी दिल्ली :  महाराष्ट्रातील सिंधुदुर्ग जिल्ह्यात जन्मलेले न्या. उदय उमेश लळीत (Uday Umesh Lalit) हे भारताचे ४९वे सरन्यायाधीश होतील. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू न्या. उदय उमेश लळीत यांना आज (शनिवार २७ ऑगस्ट २०२२) सरन्यायाधीश पदाची शपथ देतील. शपथ घेतल्यानंतर नवे सरन्यायाधीश लगेच पदभार स्वीकारतील. 

जगातील सर्वाधिक लोकप्रिय नेते
विमान प्रवासादरम्यान चुकूनही करू नका 'या' गोष्टी, अन्यथा...
तुम्हीही डिजिटल पेमेंट करता? मग ही बातमी वाचाच....

भारतातील सर्व उच्च न्यायालयांच्या न्यायाधीशांच्या निवृत्तीचे वय ६२ वर्षे आणि सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांच्या निवृत्तीचे वय ६५ वर्षे आहे. या नियमानुसार भारताचे सध्याचे सरन्यायाधीश (चीफ जस्टिस) एन. व्ही. रमणा निवृत्त होत असल्यामुळे न्या. उदय उमेश लळीत (Uday Umesh Lalit) हे पदभार स्वीकारतील. पण ते अवघे ७४ दिवस ही जबाबदारी सांभाळतील आणि ८ नोव्हेंबर २०२२ रोजी निवृत्त होतील.

न्या. उदय उमेश लळीत हे महाराष्ट्रातल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड तालुक्याचे सुपुत्र आहेत. गिर्ये-कोठारवाडी येथे त्यांचे मूळ घर आहे. नृसिंह लक्ष्मीचे मंदिर लळीत कुटुंबाची कुलदेवता आहे. उदय लळीत यांचे शिक्षण मुंबईत झाले. पण मूळगाव आजही त्यांच्यासाठी विशेष आहे.

उदय लळीत यांचा जन्म ९ नोव्हेंबर १९५७ रोजी झाला. ते ६४ वर्षांचे आहेत. जून १९८३ मध्ये त्यांनी वकिली सुरू केली. दिवंगत ज्येष्ठ वकील एम.ए. राणे यांच्याकडे सुरुवातीची काही वर्षे त्यांनी वकिली केली. नंतर ते दिल्लीत गेले. दिल्लीत सहा वर्षे त्यांनी ज्येष्ठ विधीतज्ज्ञ सोली सोराबजी यांचे निकटचे सहकारी म्हणून काम केले. अनेक वर्षे लळीत सर्वोच्च न्यायालयात स्वतंत्रपणे वकिली करत होते. उदय लळीत १३ ऑगस्ट २०१४ पासून सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश म्हणून काम करत आहेत. मितभाषी, निगर्वी, हसतमुख असलेले  उदय लळीत कायदेशीर बाब थोडक्यात पण सोप्या पद्धतीने आणि मुद्देसूदपणे समजावून सांगण्यासाठी प्रसिद्ध आहेत. उदय लळीत हे सर्वोच्च न्यायालयात थेट पदावर जाणारे सहावे ज्येष्ठ वकील आहेत.

सर्वोच्च न्यायालयात मोठे खटले चालवूनही प्रसिद्धीपासून दूर राहण्यासाठी उदय लळीत यांची ख्याती आहे. माजी केंद्रीय दळणवळण मंत्री ए राजा यांच्यासह अनेक बड्या असामी आरोपी असलेला 2G स्पेक्ट्रम घोटाळ्याचा खटला त्यांनी चालवला. त्यावेळी ८० हजारांपेक्षा जास्त कागदपत्रांवर आधारित असलेला १.७० लाख कोटी रुपयांच्या 2G स्पेक्ट्रम वाटप घोटाळ्याशी संबंधित अभियोग चालवण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने घटनेच्या कलम १४२ आधारे विशेष अधिकार वापरून ज्येष्ठ वकील उदय लळीत यांची विशेष सरकारी वकील अर्थात स्पेशल पब्लिक प्रॉसिक्युटर म्हणून नेमणूक केली होती. सीबीआय, ईडीच्या वतीने युक्तिवाद करण्याची जबाबदारीही त्यांना देण्यात आली होती. श्री पद्मनाभ स्वामी मंदिराचा कारभार पाहण्याचा त्रावणकोर राजघराण्याचा अधिकार कायम ठेवण्याचा निर्णय १३ जुलै २०२० रोजी दोन न्यायाधीशांच्या खंडपीठाने दिला. या खंडपीठातील एक न्यायाधीश उदय लळीत हे होते.

सर्वोच्च न्यायालयाने लळीत यांना ज्येष्ठ वकील म्हणून २००४ मध्ये निर्देशीत केले. अनेक महत्त्वाच्या खटल्यांमध्ये तसेच देशातील बहुतांश उच्च न्यायालयांमध्ये त्यांनी वेगवेगळ्या खटल्यांच्या निमित्ताने युक्तिवाद केला. सात वर्षे ते महाराष्ट्र सरकारचे सर्वोच्च न्यायालयात पॅनलवरील ज्येष्ठ वकील होते. त्यांनी देशातील १४ राज्य सरकारांच्या वतीने सर्वोच्च न्यायालयात प्रकरणे चालवली आहेत.

लळीत कुटुंबात वकिली आजोबा, चार काका आणि उदय लळीत यांचे वडील उमेश लळीत या सर्वांनी केली. उदय लळीत यांचे आजोबा वकिली करण्यासाठी आपटे येथून सोलापूर येथे जाऊन स्थायिक झाले. त्यांची आजी त्याकाळी भारतात डॉक्टर झालेल्या काही मोजक्या स्त्रियांपैकी एक ‘एलसीपीएस’ डॉक्टर होत्या. त्यामुळे बुद्धिमत्ता, व्यवसाय, चातुर्य आणि अभ्यासूवृत्ती रक्तातूनच आलेली. उदय लळीत यांचे वडील अॅड. उमेश लळीत हेही मुंबई उच्च न्यायालयाने नामनिर्देशित केलेले ज्येष्ठ वकील होते. ते १९७४ ते ७६ या काळात उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचे माजी अतिरिक्त न्यायाधीश होते.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी