काँग्रेसला धक्का, समाजवादी पक्षाच्या पाठिंब्यावर राज्यसभेत जाणार कपिल सिब्बल

Kapil Sibbal joins samajwadi party files rajya sabha nomination : दीर्घ काळ काँग्रेस पक्षात राहिलेले कपिल सिब्बल आता काँग्रेसला राम राम करून समाजवादी पक्षाच्या पाठिंब्यावर राज्यसभेत जाणार आहेत.

Kapil Sibbal joins samajwadi party files rajya sabha nomination
काँग्रेसला धक्का, समाजवादी पक्षाच्या पाठिंब्यावर राज्यसभेत जाणार कपिल सिब्बल  |  फोटो सौजन्य: Representative Image
थोडं पण कामाचं
  • काँग्रेसला धक्का, समाजवादी पक्षाच्या पाठिंब्यावर राज्यसभेत जाणार कपिल सिब्बल
  • उत्तर प्रदेशच्या विधानसभेत काँग्रेसचे दोन आमदार
  • कपिल सिब्बल समाजवादी पक्षाच्या पाठिंब्यावर अपक्ष उमेदवार म्हणून राज्यसभेवर जाणार

Kapil Sibbal joins samajwadi party files rajya sabha nomination : नवी दिल्ली : दीर्घ काळ काँग्रेस पक्षात राहिलेले कपिल सिब्बल आता काँग्रेसला राम राम करून समाजवादी पक्षाच्या पाठिंब्यावर राज्यसभेत जाणार आहेत. सिब्बल यांनी राज्यसभेच्या निवडणुकीसाठी समाजवादी पक्षाचा पाठिंबा घेऊन उमेदवारी अर्ज सादर केला आहे. याआधी १६ मे २०२२ रोजी सिब्बल यांनी काँग्रेस पक्षाचा राजीनामा दिला. 

आज (बुधवार २५ मे २०२२) सिब्बल यांनी राज्यसभेसाठी समाजवादी पक्षाचा पाठिंबा घेऊन उमेदवारी अर्ज सादर केला. याआधी सिब्बल यांना समाजवादी पक्षाकडून उमेदवारीसाठी पाठिंबा देत असल्याचे पक्षाध्यक्ष अखिलेश यादव यांनी जाहीर केले. सिब्बल उमेदवारी अर्ज सादर करत होते त्यावेळी समाजवादी पक्षाकडून त्यांच्या समर्थनासाठी  राम गोपाल यादव उपस्थित होते. राज्यसभेवर समाजवादी पक्षाकडून आणखी दोन उमेदवार पाठवले जाणार आहेत. लवकरच त्यांच्या नावाची घोषणा केली जाणार आहे. 

कपिल सिब्बल अपक्ष उमेदवार

राज्यसभेची निवडणूक लढवत असलेले कपिल सिब्बल हे समाजवादी पक्षाचा पाठिंबा घेतलेले अपक्ष उमेदवार आहेत. ते राज्यसभेत स्वतःचे आणि समाजवादी पक्षाचे म्हणणे मांडतील, असा विश्वास अखिलेश यादव यांनी व्यक्त केला. 

सपाचे ५ खासदार निवृत्त होणार पण...

समाजवादी पक्षाचे राज्यसभेवर निवडून गेलेले पाच खासदार ४ जुलै २०२२ रोजी निवृत्त होत आहेत. पण सध्याचे आमदारांचे संख्याबळ बघता समाजवादी पक्षाचे तीन खासदार राज्यसभेवर जातील अशी स्थिती आहे. यापैकी एका जागेसाठी समाजवादी पक्षाने कपिल सिब्बल यांना पाठिंबा दिला आहे आणि उर्वरित दोन जागांवर सपाकडून कोण निवडणूक लढवणार हे लवकरच स्पष्ट होईल. 

राज्यसभेच्या ११ जागांसाठी निवडणूक

उत्तर प्रदेशमध्ये राज्यसभेच्या ११ जागांसाठी निवडणूक होत आहे. यापैकी एका जागेवर समाजवादी पक्षाकडून अपक्ष उमेदवार कपिल सिब्बल यांना पाठिंबा देण्यात आला आहे. 

तिकीट मिळण्याची शक्यता मावळली होती

गांधी परिवाराविरोधात काँग्रेसचे २३ ज्येष्ठ नेते उभे राहिले. या नेत्यांपैकी एक असल्यामुळे कपिल सिब्बल यांना काँग्रेसकडून पुन्हा तिकीट मिळण्याची शक्यता संपली होती. यामुळेच सिब्बल यांनी समाजवादी पक्षाचा पाठिंबा घेऊन अपक्ष उमेदवार म्हणून राज्यसभेची निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला आहे. 

उत्तर प्रदेशची राजकीय स्थिती

एकूण आमदार ४०३ (दोन जागा रिक्त)
राज्यसभेसाठी आवश्यक मतांचा कोटा ३६
सत्ताधारी गट - २७३ आमदार (सात आमदार सहज निवडले जाऊ शकतात)
विरोधक, समाजवादी पार्टी - १२५ आमदार (तीन आमदार सहज निवडले जाऊ शकतात)
११ पैकी १० जागांसाठी स्थिती स्पष्ट आहे पण अकराव्या जागेसाठी दोन्ही गटात रस्सीखेच, घोडेबाजाराची शक्यता

कपिल सिब्बल वकील आणि राजकारणी

कपिल सिब्बल हे वकील आणि राजकारणी आहेत. यामुळे भविष्यात सत्ताधाऱ्यांनी कोंडी करण्यासाठी निर्माण केलेल्या कायदेशीर आव्हानांना तोंड देण्यासाठी समाजवादी पक्ष सिब्बल यांचा उपयोग करून घेण्याची शक्यता आहे. मागच्यावेळी म्हणजेच २०१६ मध्ये सिब्बल काँग्रेसचे उमेदवार म्हणून राज्यसभेत गेले होते. त्यावेळी मतांचा कोटा पूर्ण करण्यासाठी सिब्बल यांना समाजवादी पक्षाने मदत केली होती. यावेळी काँग्रेसचे फक्त दोन आमदार असल्यामुळे सिब्बल काँग्रेस सोडून समाजवादी पक्षाच्या पाठिंब्यावर अपक्ष उमेदवार म्हणून राज्यसभेची निवडणूक लढवित आहेत. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी