जम्मू काश्मीरमध्ये पर्यटकांचा ओघ वाढला, यंदा पर्यटक संख्येचा विक्रम

Kashmir sees record tourist arrivals this year, highest in a decade : ट्युलिप गार्डन (पंधरा लाख ट्युलिप फुलांच्या रोपांची बाग) बघण्याच्या निमित्ताने जम्मू काश्मीरमध्ये मोठ्या संख्येने पर्यटक दाखल होत आहेत. मागील दहा वर्षांच्या तुलनेत यंदाच्या उन्हाळ्यात जम्मू काश्मीरमध्ये सर्वाधिक पर्यटक दाखल झाले आहेत.

Kashmir sees record tourist arrivals this year, highest in a decade
जम्मू काश्मीरमध्ये पर्यटकांचा ओघ वाढला, यंदा पर्यटक संख्येचा विक्रम 
थोडं पण कामाचं
  • जम्मू काश्मीरमध्ये पर्यटकांचा ओघ वाढला, यंदा पर्यटक संख्येचा विक्रम
  • ट्युलिप गार्डन बघण्याच्या निमित्ताने जम्मू काश्मीरमध्ये मोठ्या संख्येने पर्यटक
  • नव्या वर्षाच्या पहिल्या तीन महिन्यात जम्मू काश्मीरमध्ये ३ लाख ४० हजार पर्यटक

Kashmir sees record tourist arrivals this year, highest in a decade : श्रीनगर : जम्मू काश्मीरमधील दहशतवादाचे संकट कमी होऊ लागताच राज्यातील पर्यटकांचा ओघ वाढू लागला आहे. यंदा ट्युलिप गार्डन (पंधरा लाख ट्युलिप फुलांच्या रोपांची बाग) बघण्याच्या निमित्ताने जम्मू काश्मीरमध्ये मोठ्या संख्येने पर्यटक दाखल होत आहेत. मागील दहा वर्षांच्या तुलनेत यंदाच्या उन्हाळ्यात जम्मू काश्मीरमध्ये सर्वाधिक पर्यटक दाखल झाले आहेत. हा एक विक्रम आहे, असे जम्मू काश्मीर पर्यटन विभागाने सांगितले. 

नव्या वर्षाच्या पहिल्या तीन महिन्यात (१ जानेवारी २०२२ ते ३१ मार्च २०२२) जम्मू काश्मीरमध्ये ३ लाख ४० हजार पर्यटक आले होते. यापैकी १ लाख ८० हजार पर्यटक फक्त मार्च महिन्यात आले होते. एप्रिल महिन्यातही जम्मू काश्मीरमधील पर्यटकांचा ओघ वाढत असल्याचे चित्र आहे.

श्रीनगर विमानतळावर येणाऱ्या तसेच श्रीनगरहून उड्डाण करणाऱ्या विमानांच्या संख्येत लक्षणीय वाढ झाली आहे. काही दिवसांपूर्वी श्रीनगर विमानातळाने एका दिवसात ९२ विमानांचे नियंत्रण करून नवा विक्रम केला. ट्युलिप गार्डन मार्चच्या शेवटच्या आठवड्यात पर्यटकांसाठी खुले झाले. हे गार्डन २ एप्रिल २०२२ पर्यंत ५० हजारांपेक्षा जास्त पर्यटकांनी बघितले होते. 

जानेवारीत ६० हजार, फेब्रुवारीत १ लाख आणि मार्चमध्ये १ लाख ८० हजार पर्यटकांनी जम्मू काश्मीरला भेट दिली. आता एप्रिल महिन्याच्या पहिल्या सात दिवसांत जम्मू काश्मीरमध्ये ५८ हजार पर्यटक दाखल झाले आहेत. दररोज सुमारे आठ हजार पर्यटक जम्मू काश्मीरला भेट देत आहेत. 

एप्रिल आणि मे महिन्यासाठी जम्मू काश्मीरमधील सर्व हॉटेलांचे बुकिंग झाले आहे. काही हॉटेलांमध्ये तर जूनसाठीही अॅडव्हान्स बुकिंग झाले आहे. हाऊस बोटींचे एप्रिल आणि मे महिन्याचे बुकिंग झाले आहे. 

नियंत्रणात असलेले कोरोना संकट आणि कमी झालेले दहशतवादाचे संकट यामुळे जम्मू काश्मीरमधील पर्यटकांच्या संख्येत विक्रमी वाढ झाली आहे. पर्यटक वाढल्यामुळे पर्यटनावर अवलंबून असलेल्या जम्मू काश्मीरच्या अर्थचक्राला गती मिळाली आहे. नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. 

रमझान सुरू असल्यामुळे स्थानिक पर्यटकांची संख्या कमी आहे. पण देशाच्या वेगवेगळ्या भागांतून जम्मू काश्मीरमध्ये मोठ्या संख्येने पर्यटक दाखल होत आहेत. रमझान संपल्यानंतर स्थानिक पर्यटकांचाही ओघ वाढेल; असे जम्मू काश्मीर पर्यटन विभागाने सांगितले.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी