केरळ, गोवा, चंदिगड सुशासीत राज्य आणि केंद्रशासीत प्रदेश

Kerala, Goa and Chandigarh best governed states पब्लिक अफेअर सेंटर या संस्थेने देशातील सुशासीत राज्य आणि केंद्रशासीत प्रदेश यांची क्रमवारी निश्चित करुन जाहीर केली.

Kerala, Goa and Chandigarh best governed states
केरळ, गोवा, चंदिगड सुशासीत राज्य आणि केंद्रशासीत प्रदेश 

थोडं पण कामाचं

  • केरळ, गोवा, चंदिगड सुशासीत राज्य आणि केंद्रशासीत प्रदेश
  • उत्तर प्रदेश हे सुशासीत राज्यांच्या यादीत शेवटच्या राज्यांपैकी एक
  • शाश्वत विकास, प्रगतीचा वेग, सामाजिक संतुलन, विकासकामातील सातत्य, योजना राबबवण्याचा वेग या आधारे निश्चित केले रँकिंग

नवी दिल्ली: पब्लिक अफेअर सेंटर (Public Affairs Centre India - PAC India) या संस्थेने देशातील सुशासीत राज्य आणि केंद्रशासीत प्रदेश यांची क्रमवारी निश्चित करुन जाहीर केली. संस्थेच्या अहवालानुसार केरळ आणि गोवा ही राज्य तसेच चंदिगड हा केंद्रशासीत प्रदेश या ठिकाणी सुशासन आहे. पीएसीच्या अहवालानुसार केरळ हे देशातील सर्वाधिक सुशासीत राज्य आहे तर उत्तर प्रदेश हे सुशासीत राज्यांच्या यादीत शेवटच्या राज्यांपैकी एक आहे. (Kerala, Goa and Chandigarh best governed states and union territory, says PAC ranking)

बंगळुरू येथील पब्लिक अफेअर सेंटर ही एक स्वयंसेवी संस्था आहे. वेगवेगळ्या निकषांच्या आधारे पाहणी करुन ही संस्था देशातील राज्य आणि केंद्रशासीत प्रदेश यांची सुशासनाच्या बाबतीत क्रमवारी निश्चित करुन अहवालाच्या माध्यमातून जाहीर करते. भारताची अंतराळ संशोधन संस्था 'इस्रो'चे माजी प्रमुख के. कस्तुरीरंगन पब्लिक अफेअर सेंटरचे अध्यक्ष आहेत. पब्लिक अफेअर सेंटरने ताजे रँकिंग राज्यांतील आणि केंद्रशासीत प्रदेशांतील शाश्वत विकासाच्या आधारे निश्चित केले आहे.  

दक्षिणेतील चार राज्य पीएसीच्या रँकिंगमध्ये वरच्या क्रमांकांवर आहेत. केरळ (१.३८८ पीएआय इंडेक्स पॉइंट), तामीळनाडू (०.९१२ पीएआय इंडेक्स पॉइंट), आंध्र प्रदेश (०.५३१ पीएआय इंडेक्स पॉइंट) आणि कर्नाटक (०.४६८ पीएआय इंडेक्स पॉइंट) अनुक्रमे पहिल्या चार स्थानांवर आहेत. पीएसीच्या रँकिंगमध्ये ओडिशा (-१.२०१ पीएआय इंडेक्स पॉइंट), उत्तर प्रदेश (-१.४६१ पीएआय इंडेक्स पॉइंट), आणि बिहार (-१.१५८ पीएआय इंडेक्स पॉइंट) हे अनुक्रमे शेवटच्या तीन स्थानांवर आहेत.

छोट्या राज्यांच्या गटात गोवा या राज्याने १.७४५ पीएआय इंडेक्स पॉइंट मिळवत सुशासीत राज्यांच्या यादीत पहिले स्थान पटकावले आहे. या यादीत दुसऱ्या स्थानावर असलेल्या मेघालयने ०.७९७ पीएआय इंडेक्स पॉइंट मिळवले. तिसऱ्या स्थानावरील हिमाचल प्रदेशने ०.७२५ पीएआय इंडेक्स पॉइंट मिळवले.

छोट्या राज्यांच्या गटात शेवटच्या स्थानावर मणिपूर आहे. मणिपूरने -०.३६३ पीएआय इंडेक्स पॉइंट मिळवले. या यादीत शेवटून दुसऱ्या स्थानावर दिल्ली आहे. दिल्लीने -०.२८९ पीएआय इंडेक्स पॉइंट मिळवले. तसेच यादीत शेवटून तिसऱ्या स्थानावरती उत्तराखंड आहे. उत्तराखंडने -०.२७७ पीएआय इंडेक्स पॉइंट मिळवले आहेत. 

पीएसीच्या मते १.०५ पीएआय इंडेक्स पॉइंट मिळवणारा चंदिगड हा सर्वोत्तम केंद्रशासीत प्रदेश आहे. दुसऱ्या स्थानावरील पुदुचेरीने ०.५२ पीएआय इंडेक्स पॉइंट मिळवले. तिसऱ्या स्थानावरील लक्षद्विपने ०.००३ पीएआय इंडेक्स पॉइंट मिळवले. दादरा आणि नगर हवेली -०.६९ पीएआय इंडेक्स पॉइंटसह चौथ्या स्थानावर आहे. अंदमान आणि जम्मू काश्मीर हे केंद्रशासीत प्रदेश संयुक्तपणे -०.५० पीएआय इंडेक्स पॉइंटसह पाचव्या स्थानावर आहेत. निकोबार -०.३० पीएआय इंडेक्स पॉइंटसह सहाव्या स्थानावर आहे. 

शाश्वत विकास, विकासामुळे वाढलेला प्रगतीचा वेग आणि निर्माण झालेले सामाजिक संतुलन यांच्या आधारे पीएआय इंडेक्स पॉइंट देण्यात आले आहेत. विकासकामातील सातत्य तसेच योजना राबबवण्याचा वेग यांचाही विचार करण्यात आला आहे. या अहवालामुळे देशाच्या आर्थिक आणि सामाजिक प्रगतीचा अंदाज येतो, असे पब्लिक अफेअर सेंटरचे अध्यक्ष के. कस्तुरीरंगन म्हणाले.

रँकिंग एका स्वयंसेवी संस्थेने तयार केले असले तरी संस्थेच्या अध्यक्षपदी असलेल्या व्यक्तीमुळे या रँकिंगचे महत्त्व वाढले आहे. राजकीय पातळीवरुन अद्याप या रँकिंगबाबत अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी