नवी दिल्ली : राज्यात गेल्या काही दिवसांपासून भाजप विरुद्ध शिवसेना वाद पाहायला मिळत आहे. शनिवारी राणा दाम्पत्यांची पोलीस ठाण्यात भेट घेण्यासाठी गेलेल्या भाजप नेते किरीट सोमय्या यांच्यावर शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी दगडफेक केली. त्यात त्यांच्या चेहऱ्याला दुखापत झाली होती. त्यानंतर भाजप आक्रमक झाली आहे. राज्यातील सत्ताधारी आणि विरोधकांवर सुरू असलेला वाद आता थेट दिल्ली दरबारी पोहोचला आहे.
किरीट सोमय्या यांच्यावरील हल्ल्याप्रकरणी भाजपचे एक शिष्टमंडळ दिल्लीत पोहोचून केंद्रीय गृहसचिव अजय कुमार भल्ला यांची भेट घेणार आहे. किरीट सोमय्या यांच्यासह भाजपचे शिष्टमंडळ दिल्लीत पोहोचून मुंबईच्या रस्त्यावर घडलेल्या प्रकाराबाबत गृहमंत्रालयाकडे तक्रार करणार आहे. नॉर्थ ब्लॉकमध्ये सकाळी 10 वाजेपासून ही बैठक होऊ लागली आहे. देशाचे गृहमंत्री अमित शहा यांचीही भेट होण्याची शक्यता आहे.
या प्रकरणात मुंबई पोलिसांनी शिवसैनिकांना मोकळीक दिल्याचा आरोप भाजप नेते किरीट सोमय्या करत आहेत. किरीट सोमय्या यांनीही आपला खून झाला असता अशी शक्यता व्यक्त केली आहे. उद्धव ठाकरे सरकारचे पोलिस गुंडगिरी करत असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. केंद्रातील नरेंद्र मोदी सरकार आणि देवामुळे मी आज जिवंत असल्याचं सोमय्या म्हणाले. किरीट मुंबई पोलिसांना लक्ष्य करत आहे, तर मुंबई पोलीस त्याच्या वाहनावर हल्ला करणाऱ्यांची ओळख पटवण्याचा प्रयत्न करत आहेत. सोमय्या यांनी वांद्रे पोलीस ठाण्यात त्यांच्या वाहनावर हल्ला झाल्याची तक्रार दाखल केली होती.
खार पोलीस स्टेशनमध्ये शिवसेनेच्या 70 ते 80 गुंडांनी घुसून माझ्यावर हल्ला केला. पोलिस स्टेशनमध्ये गुंड घुसूच कसे शकतात, असा सवाल किरीट सोमय्या यांनी केला. तसेच, केंद्र सरकारने मला 'Y' सुरक्षा दिल्यामुळे या हल्ल्यापासून मी बचावलो. मनसुख हिरेनप्रमाणे माझीदेखील हत्या करण्याच्या प्रयत्नात शिवसेना आहे. यासाठी पोलिसांची मदत घेतली जात आहे.
खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांची खार पोलिस ठाण्यात भेट घेऊन परतताना भाजप नेते किरीट सोमय्या यांच्या गाडीवर जमावाने हल्ला केला. यात गाडीची काच फुटून सोमय्या किरकोळ जखमी झाले. सोमय्या ठाण्यातून बाहेर पडल्यानंतर गाडीत बसल्यानंतर त्यांच्या गाडीवर जमावाने दगड, पाण्याच्या बाटल्या आणि चपला फेकल्या. यात गाडीची काच फुटून सोमय्या किरकोळ जखमी झाले. मुंबई पोलिस आयुक्त भेटायला येत नाहीत, तोपर्यंत जागेवरून हलणार नाही, अशी भूमिका सोमय्यांनी घेतली आहे. खारहून सोमय्या वांद्रे पोलिस ठाण्याकडे गेले. तिथे रात्री उशिरापर्यंत भाजप कार्यकर्त्यांनी हल्लेखोरांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी करीत वांद्रे पोलिस ठाण्याबाहेर ठिय्या देत जोरदार घोषणाबाजी सुरू केली होती.