Arpita Mukharjee : कोण आहेत अर्पिता मुखर्जी? यांच्या घरी टाकलेल्या धाडीत ED ला मिळाले 20 कोटी

पश्चिम बंगालमध्ये सध्या शिक्षक भरती घोटाळा जोरदार गाजत आहे. अर्पिता मुखर्जी यांच्या घरावर ईडीने टाकलेल्या धाडीत 20 कोटी रुपये जप्त कऱण्यात आले आहेत.

Arpita Mukharjee :
कोट्यवधी रुपये सापडलेल्या अर्पिता मुखर्जी कोण आहेत?  |  फोटो सौजन्य: Times Now
थोडं पण कामाचं
  • अर्पिता मुखर्जी यांच्या घरी पडली होती ईडीची धाड
  • ईडीने जप्त केले 20 कोटी रुपये
  • मंत्री पार्थ चटर्जी आणि अर्पिता मुखर्जी यांचा काय आहे संबंध?

Arpita Mukharjee : पश्चिम बंगालमधील बहुचर्चित शिक्षक भरती घोटाळ्याचे धागेदोरे आता राज्य सरकारपर्यंत जाऊन पोहोचू लागल्याचे संकेत मिळत आहेत. मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या सरकारमध्ये मंत्री असणाऱ्या पार्थ चटर्जी यांच्या निकटवर्तीय अर्पिता मुखर्जी यांच्या घरावर ईडीने छापा टाकला. या छाप्यात त्यांना 20 कोटी रुपयांची कॅश सापडली आहे. पार्थ चटर्जी यांच्या घरावरदेखील ईडीकडून छापेमारी सुरू आहे. हे प्रकऱण समोर आल्यानंतर अर्पिता मुखर्जी कोण आहेत आणि पार्थ चॅटर्जी यांच्याशी त्यांचा नेमका काय संबंध आहे, असे प्रश्न निर्माण झाले आहेत.

फिल्म इंडस्ट्रीपासून करिअरला सुरुवात

अर्पिता मुखर्जी यांनी करिअरच्या सुरुवातीला बंगाली सिनेसृष्टीत काम केलं. काही चित्रपटांमध्ये त्यांनी भूमिका केल्या. मात्र त्यांचं चित्रपटातील करिअर फार मोठं होऊ शकलं नाही. काही सिनेमांमध्ये साईड रोल करण्यापर्यंतच त्या मजल मारू शकल्या. ओडिया आणि तमीळ सिनेमांतही त्यांनी काही भूमिका केल्या. 

पार्थ चटर्जींच्या निकटवर्तीय

पश्चिम बंगालमधील महत्त्वाचे नेते आणि ममता बॅनर्जी सरकारमधील मंत्री पार्थ चटर्जी हे एक दुर्गापूजा मंडळ चालवतात. त्यांच्या मंडळाकडून दरवर्षी मोठ्या थाटामाटात दूर्गापूजा सोहळ्याचं आयोजन कऱण्यात येतं. कोलकात्यातील नामांकित दूर्गापूजा मंडळांपैकी हे मंडळ आहे. 2019 आणि 2020 अशी दोन वर्षं अर्पिता मुखर्जी या पार्थ चटर्जींच्या दूर्गापूजा सोहळ्याचा चेहरा बनल्या होत्या. विविध पोस्टरवर त्यांचा फोटो झळकला होता आणि त्या माध्यमातून चटर्जी यांच्याशी त्यांची ओळख झाली. चटर्जी हे या मंडळाचे अध्यक्ष होते आणि मुखर्जी या मंडळाच्या एक प्रकारे ब्रँड अम्बेसेडर म्हणून कार्यरत होत्या. 

अधिक वाचा - Maharashtra Politics: शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे गटाला निवडणूक आयोगाची नोटीस, बहुमत सिद्ध करण्याचे आदेश

भाजप आक्रमक

अर्पिता मुखर्जी यांच्या घरी पडलेल्या ईडीच्या छाप्यात 20 कोटी कॅश आढळून आल्यानंतर भाजपने तृणमूल काँग्रेसवर हल्लाबालो केला आहे. भाजप नेते आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते शुभेंदू अधिकारी यांनी एक फोटो सोशल मीडियावर रिलिज केला आहे. या फोटोत एका दूर्गापूजा समारंभात मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, पार्थ चटर्जी आणि त्यांच्या शेजारी अर्पिता मुखर्जी बसल्याचं दिसतं. या घोटाळ्याचा संबंध कसा मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्याशीदेखील आहे, हे दाखवण्याचा प्रयत्न भाजपनं केला आहे. 

अधिक वाचा - Har Ghar Tiranga : 'हर घर तिरंगा' मोहीम, PM मोदींचे ट्वीट

तृणमूलची प्रतिक्रिया

तृणमूल काँग्रेसनं या घोटाळ्याबाबत हात वर केले आहेत. ज्यांच्या घरावर ईडीची धाड पडली आणि पैसै सापडले, त्यांनी आणि त्यांच्या वकिलांनी याचं उत्तर द्यावं, अशी भूमिका टीएमसीने घेतली आहे. या प्रकऱणाशी पक्षाचा काहीही संबंध नसून घडणाऱ्या घडामोडींवर पक्ष लक्ष ठेऊन असल्याचं पत्रक जाहीर कऱण्यात आलं आहे. मुखर्जी यांच्या घरावर पडलेली धाड आणि त्यानंतर सुरू झालेली आरोपांची राजकीय धुळवड सध्या बंगालमध्ये चर्चेचा विषय ठरली आहे. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी