पाकिस्तानला हादरवणाऱ्या सेक्स स्कँडलमागची संपूर्ण स्टोरी 

पाकिस्तानमध्ये सध्या एका सेक्स स्कँडलवरुन बराच वादंग सुरु आहे. सध्या संपूर्ण पाकिस्तानात याबाबतच चर्चा सुरु आहे. जाणून घ्या नेमकं काय सुरु आहे पाकिस्तानात. 

know the full story behind the sex scandal in pakistan cynthia ritchie
पाकिस्तानला हादरवणाऱ्या सेक्स स्कँडलमागची संपूर्ण स्टोरी   |  फोटो सौजन्य: Twitter

थोडं पण कामाचं

  • पाकिस्तानात कोरोनापेक्षा सेक्स स्कँडलची अधिक चर्चा 
  • अमेरिकन ब्लॉगरने केलेल्या आरोपामुळे पाकिस्तानात खळबळ 
  • माजी पंतप्रधानांसह अनेक नेत्यांवर बलात्काराचे आरोप 

इस्लामाबाद: जगभरात कोरोनाचं संकट असून प्रत्येक देश यामुळे चिंतेत आहे. मात्र, या सगळ्या दरम्यान, पाकिस्तानमध्ये मात्र एका भलत्याच विषयावरुन राजकारण रंगलं आहे. ते म्हणजे एका सेक्स स्कँडलवरुन. कारण एका अमेरिकन महिलेने पाकिस्तानच्या एका माजी पंतप्रधानांसह तीन मोठ्या नेत्यांवर आरोप केले आहेत. त्यामुळे संपूर्ण पाकिस्तान यामुळे हादरून गेलं आहे. सध्या तेथील मीडियामध्ये याचविषयी सर्वाधिक चर्चा सुरु आहे.  इस्लामाबाद येथे राहणारी अमेरिकन ब्लॉगर सिंथिया रिचीने (Cynthia Ritchie)असा आरोप केला आहे की,  पाकिस्तान पीपल्स पार्टी (पीपीपी) च्या तीन नेत्यांनी तिच्यावर लैंगिक अत्याचार केले होते.

रिचीने फेसबुक लाईव्हदरम्यान आरोप केले होते की, पाकिस्तानचे तत्कालीन गृहमंत्री रहमान मलिक यांनी 
२०११ मध्ये तिच्यावर बलात्कार केला होता. रिचीने असा आरोप केला आहे की, जेव्हा ती मलिक यांच्या घरी गेली होती. तिच्या ड्रिंकमध्ये गुंगीचे औषध मिसळण्यात आले होते. 

तिने माजी पंतप्रधान युसूफ रझा गिलानी यांच्यावरही आरोप केले आहेत. तसेच माजी केंद्रीय मंत्री मखदूम शहाबुद्दीन यांनाही अशाच प्रकारच्या आरोपांचा सामना करावा लागत आहे. रिची असेही म्हणते की, हे तीन नेतेच तिच्यावर लैंगिक अत्याचार करत नव्हते तर माजी पंतप्रधान नवाज शरीफ यांच्या पक्षातील काही नेत्यांनीही तिचा फायदा उठविण्याचा प्रयत्न केला.

दरम्यान, तब्बल नऊ वर्ष या घटनेवरुन वादंग निर्माण झाला आहे. त्यामुळे एवढ्या वर्षाने हे प्रकरण उजेडात कसं आलं असा प्रश्न विचारला जात आहे. याविरोधात सिंथिया रिचीने आधी आवाज का उठविला नाही, की ती एखाद्या विशिष्ट वेळेची वाट पाहत होती का? असे प्रश्न आता उपस्थित केले जात आहेत.  माजी पंतप्रधान बेनझीर भुत्तो यांनी आपल्या पतीशी संबंध असणाऱ्या महिलांवर बलात्कार करण्याचे आदेश त्यांच्या सुरक्षा रक्षकांना दिले असल्याचा खळबळजनक आरोप रिचीने केला होता. ज्यानंतर पीपीपी पक्षाने रिचीविरुद्ध मोर्चा उघडला होता. ज्याचा एक आठवड्यानंतर रिचीने पीपीपी नेत्यांवर प्राणघातक हल्ला आणि बलात्काराचे आरोप करुन संपूर्ण पाकिस्तानात एकच खळबळ उडवून दिली. 

दुसरीकडे या अमेरिकन ब्लॉगरच्या आरोपांवर पाकिस्तानमधील बर्‍याच लोकांनी काही सवाल उपस्थित केले आहेत. अनेकांनी असाही आरोप केला आहे की, इम्रान खान हे आरोग्य आणि आर्थिक संकट यावरुन देशातील नागरिकांचे लक्ष वळविण्यासाठी तिचा वापर करत आहेत. काही पाकिस्तानी नागरिकांच्या मते ती सीआयएची एक हेर आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी