हाडं गोठवणाऱ्या थंडीत चिनी सैन्याची त्रेधातिरपीट

Ladakh: Chinese Are Forced To Rotate Troops Daily, Indians Staying Longer हाडं गोठवणाऱ्या थंडीत चिनी सैन्याची त्रेधातिरपीट उडाल्याचे वृत्त येत आहे. उंचावर मुक्काम करणे चिनी सैनिकांना अशक्य आणि असह्य झाले आहे.

Ladakh: Chinese Are Forced To Rotate Troops Daily, Indians Staying Longer
थंडीत चिनी सैन्याची त्रेधातिरपीट 

थोडं पण कामाचं

  • हाडं गोठवणाऱ्या थंडीत चिनी सैन्याची त्रेधातिरपीट
  • उंचावर मुक्काम करणे चिनी सैनिकांना झाले अशक्य आणि असह्य
  • दररोज मोठ्या संख्येने हॉस्पिटलमध्ये दाखल होत आहेत चिनी सैनिक

नवी दिल्ली: भारताच्या हद्दीत घुसखोरीचा प्रयत्न करणाऱ्या चीनला टक्कर देण्यासाठी भारतीय सैनिक सरसावले. यातून गलवानमध्ये प्राणघातक संघर्ष झाला. भारताने सर्वोच्च बलिदान देत मातृभूमीचे रक्षण केले. इथून भारत आणि चीन यांच्यातील तणाव वाढला. चिनी सैन्याला थोपवण्यासाठी भारताने लडाखमध्ये मोठी कुमक सज्ज केली. लडाखमध्ये पँगाँग लेक जवळ उंच डोंगरांवर भारतीय सैनिक नियुक्त झाले. भारतातील उंच भूभाग बळकावण्यात अपयशी ठरलेल्या चीनने स्वतःच्या ताब्यातील उंच भागात सैनिक नियुक्त करुन समाधान मानले. पण आता हाडं गोठवणाऱ्या थंडीत चिनी सैन्याची त्रेधातिरपीट उडाल्याचे वृत्त येत आहे. (Ladakh: Chinese Are Forced To Rotate Troops Daily, Indians Staying Longer)

अती उंच अती थंड प्रदेशात भारताचा दिवसरात्र मुक्काम

साधारणपणे हिमवृष्टी सुरू झाल्यावर डोंगरांवर एकाचवेळी २ किंवा ३ पाळ्यांमध्ये काम करणाऱ्या सैनिकांना एकत्रितपणे पाठवले जाते. ज्यांची ड्युटी आहे ते सैनिक उंच जागेचे रक्षण करतात आणि उर्वरित सैनिक उंचावरील तंबूमध्ये विश्रांती घेतात. या पद्धतीने ड्युटी बदलत राहते. ठराविक दिवस सगळे सैनिक उंचावरच मुक्काम करतात. यानंतर सैनिकांची नवी तुकडी हजर होते आणि आधीच्या सैनिकांना उंचावरुन खाली बोलावले जाते. ही पद्धत वापरुन सैनिक काम करतात. दीर्घकाळ सैनिकांना अती उंच भूभागात कार्यरत ठेवणे कठीण असल्यामुळे ही पद्धत वापरली जाते. भारताला सियाचीन आणि कारगिलच्या उंच आणि अती थंड भूभागांमध्ये काम करण्याची सवय आहे. यामुळे भारताचे सैनिक सलग काही दिवस उंच डोंगरावंर मुक्काम करुन नेमून दिलेली बंदोबस्ताचे काम चोखपणे पार पाडतात. यानंतर सैनिकांची तुकडी बदलली जाते. पण चीनची नेमकी उलट परिस्थिती आहे.

उंचावर मुक्काम करणे चिनी सैनिकांना झाले अशक्य आणि असह्य

चिनी सैनिकांना उंच आणि अती थंड भूभागांमध्ये हिमवृष्टी सुरू असताना मुक्काम करण्याची सवय नाही. याच कारणामुळे स्वतःच्या ताब्यातील उंच भागात नियुक्त केलेल्या सैनिकांच्या तुकड्या दररोज बदलण्याची वेळ चिनी सैन्यावर आली आहे. चिनी सैनिक वारंवार विश्रांतीसाठी कमी उंचीवर असलेल्या बेस कँपमध्ये विश्रांती घेणे पसंत करत आहेत. भारताप्रमाणे सलग काही दिवस उंचावर मुक्काम करणे चिनी सैनिकांना अशक्य आणि असह्य झाले आहे.

दररोज मोठ्या संख्येने हॉस्पिटलमध्ये दाखल होत आहेत चिनी सैनिक

हाडं गोठवणाऱ्या थंडीचा चिनी सैनिकांना प्रचंड त्रास होत आहे. हिमदंश होणे, रक्तदाब अनियंत्रित होणे, ब्रेन स्ट्रोक अथवा स्ट्रोक सारख्या तब्येतीच्या वेगवेगळ्या कारणांमुळे मोठ्या संख्येने चिनी सैनिकांना वारंवार हॉस्पिटलमध्ये दाखल करण्याची वेळ येत आहे. दररोज चीनच्या बेस कँपवरुन सैन्याच्या हॉस्पिटलमध्ये ये-जा करणाऱ्या अँब्युलन्स दिसत आहेत. काही वेळा तर परिस्थिती बिकट असल्यामुळे चिनी सैन्याने एअर अँब्युलन्सची मदत घेऊनही सैनिकांना हॉस्पिटलमध्ये दाखल केले आहे. थंडीमुळे चिनी सैन्याची बिकट अवस्था झाली आहे. 

कोणत्याही परिस्थितीत रात्रंदिवस उंच भूभागांवर सैनिक सज्ज ठेवणार भारत

भारताने कोणत्याही परिस्थितीत रात्रंदिवस उंच भूभागांवर सैनिक सज्ज ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. हा निर्णय ज्या चीनमुळे भारताने घेतला त्या चीनला उंचावर सैनिक नियुक्त करणे कठीण झाले आहे. लडाखमध्ये उंचावर काम करण्यास अनेक चिनी सैनिकांनी नकार दिल्याचेही वृत्त आहे. चीनमधील चित्र काहीही असले तरी जिनपिंग सरकारवर विश्वास उरलेला नाही त्यामुळे भारताने सियाचीन आणि कारगिल प्रमाणे लडाखमध्ये उंच डोंगरांवर २४ तास भारतीय सैन्याचा चोख बंदोबस्त ठेवण्याची कायमस्वरुपी व्यवस्था केली आहे. चिनी सैनिक मात्र थंडीनेच कुडकुडत असल्याचे चित्र आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी