जमिनीच्या वादातून गोळीबार, ९ जणांचा मृत्यू तर २० गंभीर जखमी

लोकल ते ग्लोबल
Updated Jul 17, 2019 | 21:32 IST | टाइम्स नाऊ हिंदी

Firing over Land dispute: उत्तरप्रदेशातील सोनभद्र जिल्ह्यातील एका गावात दोन गटांत जमिनीच्या वादातून मोठा संघर्ष झाला. यानंतर झालेल्या गोळीबारात ९ जणांचा मृत्यू झाला आहे तर २० जण जखमी झाले आहेत.

land dispute firing
जमिनीच्या वादातून गोळीबार  |  फोटो सौजन्य: ANI

थोडं पण कामाचं

  • जमिनीच्या वादातून मोठा वाद
  • वादानंतर गोळीबार, ९ जणांचा मृत्यू
  • उत्तरप्रदेशातील सोनभद्र जिल्ह्यातील घटना

नवी दिल्ली: पूर्व उत्तरप्रदेशातील सोनभद्र जिल्ह्यात जमिनीचा वाद इतका वाढला की त्यानंतर दोन गटांत गोळीबार झाला. बुधवारी ही घटना घडली असून या गोळीबारात ९ जणांचा मृत्यू झाला तर २० जण जखमी झाले आहेत. मृतकांमध्ये तीन महिलांचा समावेश आहे. दोन गटांत झालेल्या वादाचं रूपांतर गोळीबारात झालं आणि त्यानंतर हा भयानक प्रकार घडला. सोनभद्र जिल्ह्यातील उभा गावात झालेला हा गोळीबार जवळपास एक तास सुरू होता.

या घटनेप्रकरणी पोलीस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, जमिनीच्या वादानंतर दोन गटांत वाद निर्माण झाला. याच दरम्यान दोन्ही गटातील व्यक्तींनी पिस्तुल काढून गोळीबार करण्यासा सुरूवात केली. तसेच धारदार शस्त्रांच्या सहाय्याने एकमेकांवर हल्ला करण्यात आला. अवघ्या काही क्षणातच या वादाने भीषण स्वरुप धारण केलं. या घटनेत ९ जणांचा मृत्यू झालाय तर २० जण गंभीर जखमी झाले आहेत.

पोलिसांनी सांगितले की, ग्रामसेवक यज्ञ दत्त आणि त्याच्या समर्थकांनी जमिनीच्या वादानंतर दुसऱ्या गटातील व्यक्तींवर अंदाधुंद गोळीबार केला. या प्रकरणाचा तपास सुरू आहे. जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून त्यांची प्रकृती गंभीर आहे.

योगी आदित्यनाथ यांनी दिले चौकशीचे आदेश

उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी सोनभद्र येथे झालेल्या या घटनेवर दु:ख व्यक्त केलं आहे. तसेच शोक व्यक्त केला आहे. या घटनेत जखमी झालेल्या नागरिकांवर योग्य उपचारासाठी जिल्हाधिकाऱ्यांना निर्देश दिले आहेत. तसेच या प्रकरणात पोलीस महानिरीक्षकांना लक्ष देण्यास सांगितलं आहे.

उत्तरप्रदेशचे पोलीस महानिरीक्षक ओपी सिंह यांनी सांगितले की, या गोळीबारात ९ जणांचा मृत्यू झाला आहे. ग्रामसेवकाने दोन वर्षांपूर्वी ही जमिन खरेदी केली होती आणि या जमिनीचा मालकी हक्क घेण्यासाठी तो आला असता ग्रामस्थांनी त्याचा विरोध करण्यास सुरूवात केली. या दरम्यान मोठा वाद झाला आणि या वादानंतर गोळीबार झाला. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून ५ जणांना अटक करण्यात आली आहे.

लखनऊ सरकारच्या प्रवक्त्यांनी सांगितले की, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी जखमींवर तात्काळ आणि योग्य उपाय करण्याचे निर्देश सोनभद्रच्या अधिकाऱ्यांना दिले आहेत. तसेच पोलीस महानिरीक्षकांना या प्रकरणावर लक्ष ठेवण्याच्या सूचना दिल्या आहेत.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी
जमिनीच्या वादातून गोळीबार, ९ जणांचा मृत्यू तर २० गंभीर जखमी Description: Firing over Land dispute: उत्तरप्रदेशातील सोनभद्र जिल्ह्यातील एका गावात दोन गटांत जमिनीच्या वादातून मोठा संघर्ष झाला. यानंतर झालेल्या गोळीबारात ९ जणांचा मृत्यू झाला आहे तर २० जण जखमी झाले आहेत.
loadingLoading...
loadingLoading...
loadingLoading...