Shock for Iphone : ॲपल कंपनीला मोठा झटका बसला आहे. या कंपनीचे Iphone 13 आणि Iphone 12 हे दोन्ही लेटेस्ट प्रॉडक्ट बॅन करण्यात आले आहेत. कोलंबिया देशानं ही कारवाई केली असून ॲपल कंपनीसाठी हा प्रचंड मोठा झटका आहे. या कारवाईमुळे आता कंपनीला हे दोन्ही आयफोन कोलंबियात विकता येणार नाहीत.
कोलंबियातील बोगोटा न्यायालयानं नुकताच याबाबत आदेश दिला आहे. या आदेशानुसार ॲपल कंपनीला कोलंबियात 5G कनेक्टिव्हिटी असणारे कुठलेही मॉडेल विकता येणार नाहीत. यामध्ये Iphone 12, Iphone 13 यांचा समावेश तर आहेच, शिवाय 5G कनेक्टिव्हिटी असणारे Ipad देखील विकण्यास बंदी घालण्यात आली आहे. ॲपल कंपनीचे सध्याचे सर्व लेटेस्ट प्रॉडक्ट्स हे 5G कनेक्टिव्हिटीसाठी तयार करण्यात आले आहेत. त्यामुळे यापैकी कुठलीही उत्पादनं कोलंबियामध्ये विकता येणार नाहीत, हे स्पष्ट झालं आहे.
ॲपल कंपनीनं पेटंटची चोरी केल्याचा आरोप ठेवण्यात आला आहे. बोगोटा कोर्टात ॲपल कंपनीवर 5G हार्डवेअर इसन्शिअल पेटंटच्या चोरीचा आरोप ठेवला होता. कोलंबियामध्ये 5G हार्डवेअरचं पेटंट हे Ericsson या कंपनीला देण्यात आलं होतं. 2019 ते 2037 या कालावधीसाठी कंपनीला हे पेटंट देण्यात आलं आहे. त्यामुळे तोपर्यंत इतर कुणीही याचा वापर करणं हा पेटंटच्या चोरीचा प्रकार असल्याचं कोर्टानं म्हटलं आहे.
अधिक वाचा - Breaking News 13 July 2022 Latest Update: वसईत दरड कोसळली; 4 जणांची सुटका, दोन जण अजूनही दरडीखाली
लायसन्सिंगच्या या पद्धतीला ॲपलनं मान्यता दिली आहे. मात्र ते विकत घेण्याची किंमत फारच जास्त असल्याचा दावा केला आहे. न्यायालयाच्या या निर्णयानंतर आता ॲपल त्यांच्या 5G उत्पादनांचा नवा स्टॉक देशात आणू शकणार नाही. त्याचप्रमाणं सध्या देशात असणारा स्टॉक विकण्यासही न्यायालयानं मनाई केली आहे. या उत्पादनांची जाहीरातदेखील कोलंबियात करण्यास कोर्टानं बंदी घातली आहे.
कोलंबियातील कोर्टाने हा निर्णय देताना अँटिसूट इंजेक्शनदेखील लागू केलं आहे. याचाच अर्थ कोलंबियातील या कोर्टाच्या निर्णयाला जगभरातील इतर कुठल्याही कोर्टात आव्हान देता येणार नाही आणि इतर कुठल्याही कोर्टाच्या आदेशाने हा निर्णय बदलू शकणार नाही, असं या आदेशात म्हणण्यात आलं आहे. तर कोलंबियात अद्याप 5G सेवाच सुरू झालेली नसल्यामुळे त्या घटकाचा वापरच होऊ शकत नसल्याचा दावा ॲपलनं कोर्टात केला आहे. ॲपल जगभरात आता Iphone 14 लॉन्च करण्याच्या तयारीत असतानाच कोलंबिया कोर्टाचा हा निर्णय आला आहे. Iphone 12 पासून ॲपलने आपले सर्व मोबाईल प्रॉडक्ट्स हे 5G कम्पेटिबल असतील, याची काळजी घेतली आहे. आता त्याच उत्पादनांवर कोलंबियात बंदी आल्यामुळे आणि इतर कुठल्याही कोर्टात दाद मागता येणार नसल्यामुळे कंपनीचं मोठं नुकसान होणार आहे. त्यामुळे हा ॲपलसाठी मोठा झटका मानला जात आहे.