Lebanon Crisis | लेबनॉनमध्ये परिस्थिती गंभीर, जगातील १५० वर्षांमधील सर्वात मोठे आर्थिक संकट, जबरदस्त गरीबी

Lebanon Crisis | लेबनॉनमधील आर्थिक संकट हे १५० वर्षांमधील जगातील सर्वात मोठ्या संकटांपैकी एक संकट असल्याचे म्हटले जाते आहे. या संकटाने काही महिन्यातच अर्ध्या लोकसंख्येला गरीबीत ढकलले आहे. लेबनॉनचे चलन रसातळाला गेले आहे. महागाई वाढली आहे, बेरोजगारी वाढली आहे. पुढील पिढ्यांचे भवितव्य संकटात आहे. डॉक्टर, नर्स, शिक्षक यांनी देश सोडला आहे. इंधनाचे गंभीर संकट निर्माण झाले आहे. शाळा सुरू करण्यासारखी परिस्थिती राहिलेली नाही.

Lebanon Crisis
लेबनॉनचे भयानक संकट 
थोडं पण कामाचं
  • देशातील मोठी लोकसंख्या गरीब झाली आहे, महागाई वाढली आहे, बेरोजगारी वाढली
  • लेबनॉनमध्ये जगातील १५० वर्षांमधील सर्वात मोठे आर्थिक संकट
  • या संकटाने काही महिन्यातच अर्ध्या लोकसंख्येला गरीबीत ढकलले आहे. लेबनॉनचे चलन रसातळाला गेले आहे.

Lebanon Crisis | नवी दिल्ली : संयुक्त राष्ट्रसंघाच्या (United Nations)एक तज्ज्ञाने शुक्रवारी लेबनॉनमधील संकटाबद्दल (Lebanon Crisis) चिंता व्यक्त केली आहे. लेबनॉन (Lebanon)या देशाने आपल्या देशातीलच नागरिकांना गरीबीशी आणि संकटाशी लढण्यासाठी वाऱ्यावर सोडले आहे. यामुळे देशातील मोठी लोकसंख्या गरीब (Poverty)झाली आहे. लोकांचा राज्यव्यवस्था आणि अधिकाऱ्यांवरील विश्वास उडाला आहे. संयुक्त राष्ट्रसंघाचे खास दूत ओलिव्हियर डी शूटर (Olivier De Schutter) यांनी लेबनॉनचा १२ दिवसांचा दौरा केल्यानंतर ही चिंता व्यक्त केली आहे. लेबनॉनच्या राजकारण्यांना याची जाणीव असली पाहिजे की परदेशी मदत आणि माणुसकीच्या आधारे मिळणारी मदत यावर ते खूप काळ अवलंबून राहू शकत नाहीत, असेही शूटर म्हणाले. (Lebanon is facing biggest Financial crisis of 150 years, poverty rises)

लेबनॉनमध्ये १५० वर्षांतील भयंकर संकट

लेबनॉन हा पश्चिम आशियातील इस्त्रायल आणि सीरिया शेजारील एक छोटासा देश आहे. डी शूटर यांनी सांगितले की ६० लाख लोकसंख्या असलेल्या या देशात गरीबांना मदत करण्यासाठीची पावले उचलण्यासंदर्भात अजूनही लेबनॉन सरकारकडे वेळ आहे. यामध्ये १० लाख सीरियन निर्वासितांचाही समावेश आहे. लेबनॉनमधील आर्थिक संकट हे १५० वर्षांमधील जगातील सर्वात मोठ्या संकटांपैकी एक संकट असल्याचे म्हटले जाते आहे. या संकटाने काही महिन्यातच अर्ध्या लोकसंख्येला गरीबीत ढकलले आहे. लेबनॉनचे चलन रसातळाला गेले आहे. महागाई वाढली आहे, बेरोजगारी वाढली आहे. पुढील पिढ्यांचे भवितव्य संकटात आहे. डॉक्टर, नर्स, शिक्षक यांनी देश सोडला आहे. इंधनाचे गंभीर संकट निर्माण झाले आहे. शाळा सुरू करण्यासारखी परिस्थिती राहिलेली नाही.

मतभेदांनी पंगू झालेले सरकार

लेबनॉनमध्ये राजकीय संकटदेखील आहे. जवळपास एक वर्षापेक्षा अधिक काळ सरकार नव्हते. त्यानेतर पंतप्रधान नजीब मिकाती यांच्या मंत्रिमंडळाची स्थापना करण्यात आली. मात्र मतभेदांमुळे सरकार कमकुवत झाले आहे. अनेक आठवड्यांपासून कॅबिनेटची बैठक झालेली नाही. देश वेगाने गरीबीकडे ढकलला जातो आहे. सरकारकडे यावर विचार करायला वेळ नाही. कोणत्याही उपाययोजना सरकारकडून राबवल्या गेलेल्या नाहीत. देश परदेशातील मदतीवरच अवलंबून आहे.

लेबनॉन आणि सौदी अरेबियातील वाद

सौदी अरेबियाने लेबनॉनचे माहिती प्रसारण मंत्री जॉर्ज कोर्डाही यांच्या वादग्रस्त विधानानंतर बेरुतहून आपल्या राजदूताला परत बोलावले आहे. तर लेबनॉनच्या राजदूताला सौदी अरेबिया सोडण्यास सांगितले आहे. याचबरोबर बहारीन, युएई आणि कुवेतनेदेखील आपल्या राजदूतांना लेबनॉनमधून परत बोलावले आहे. कोर्डाही यांनी येमेनमध्ये सौदी अरेबियाच्या लढाईला चुकीचे आणि आक्रमणकारी म्हटले होते. येमेनमध्ये सौदी अरेबिया इराणसमर्थक हूती बंडखोरांशी लढते आहे.

अंतर्गत संघर्षात लेबनॉनचे सरकार

लेबनॉन सरकारला संयुक्त राष्ट्रसंघाने काही सुधारणा सांगितल्या आहेत. मात्र सरकारने अद्याप त्याविषयी पावले उचलली नाहीत. लेबनॉन सरकार देशातील संकटाला तोंड देण्याऐवजी आपल्या अंतर्गत संघर्षातच गुंतलेले आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी