२६ वर्षांच्या आईची १४ मुले

Letty McMaster adopts 14 orphaned children एक २६ वर्षांची महिला एक दोन नाही तर तब्बल १४ मुलांची आई आहे.

Letty McMaster
लेटी मॅकमास्टर आणि तिची मुले 

थोडं पण कामाचं

  • २६ वर्षांच्या आईची १४ मुले
  • कायदेशीर प्रक्रिया करुन दत्तक घेतली मुले
  • लेटी मॅकमास्टरसोबत राहणे मुलांना आवडते

डोडोमा (Dodoma): एक २६ वर्षांची महिला एक दोन नाही तर तब्बल १४ मुलांची आई आहे. हे वाचल्यावर एकदम गडबडल्यासारखे होईल. पण गोंधळून जाऊ नका. इंग्लंडच्या (England) लेटी मॅकमास्टर (Letty McMaster) हिने टांझानियातील (Tanzania) १४ मुलांना कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करुन दत्तक घेतले आहे. ती १४ मुलांचे व्यवस्थित संगोपन करत आहे. त्यांना उत्तम शिक्षण आणि चांगले संस्कार देत आहे. (Letty McMaster adopts 14 orphaned children)

२६ वर्षांच्या आईची १४ मुले

लेटी मॅकमास्टरने २०१३ मध्ये इंग्लंडमधील विद्यापीठातून अ पातळीचे शिक्षण पूर्ण केले. शिक्षण पूर्ण झाले त्यावेळी ती १८ वर्षांची होती. पुढील शिक्षण घेण्याआधी काही काळ फिरावे या उद्देशाने लेटी टांझानिया येथे गेली. तिथल्या एका अनाथालयात काही दिवस समाजकार्य करण्याच्या उद्देशाने ती थांबली. अल्पावधीतच लेटीला अनाथालयात मुलांसोबत वेळ घालवणे आवडू लागले. तिने अनाथालयातील सेवेसाठी मुक्काम वाढवण्याचा निर्णय घेतला. तब्बल तीन वर्ष लेटी अनाथालयात कार्यरत होती. अनाथालय बंद होणार हे लक्षात आल्यावर तिथे असलेल्या नऊ मुलांचा ताबा लेटीने घेतला. सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करुन लेटीने सात वर्षांनंतर या मुलांचे पालकत्व मिळवले. 

कायदेशीर प्रक्रिया करुन दत्तक घेतली मुले

मुलांचा ताबा मिळवण्यासाठी कायदेशीर प्रक्रिया सुरू असताना टांझानियाच्या रस्त्यांवर भिक मागणाऱ्या पाच गरीब मुलांनाही लेटीने दत्तक घेतले. यामुळे लेटी मॅकमास्टर हिने दत्तक घेतलेल्या मुलांची संख्या १४ झाली.

लेटी मॅकमास्टरसोबत राहणे मुलांना आवडते

लेटीच्या सर्व मुलांना त्यांच्या आईसोबत म्हणजेच लेटी मॅकमास्टर हिच्यासोबत वेळ घालवायला आवडते. आयुष्यातले चांगले वाईट अनुभव लेटीसोबत शेअर करायला आवडतात. लेटी सोबत असल्यास अतिशय आनंदी आणि सुरक्षित वाटते असे मुलांनी कायदेशीर प्रक्रिया सुरू असताना संबंधित अधिकाऱ्यांना सांगितले.

टांझानियात अनाथाचे आयुष्य जगणे खूप कठीण

टांझानिया एक गरीब देश आहे. तिथे सतत हिंसक घटना सुरू असतात. अन्न, पाणी, औषधे, कपडे अशा सर्व पायाभूत सोयीसुविधांची टंचाई असलेल्या टांझानियात अनाथाचे आयुष्य जगणे खूप कठीण आहे. या उलट लेटीसोबत सुरक्षितरित्या जगणे पसंत आहे, असे मुलांनी सांगितले. 

किशोरवयीन मुलांची मोठ्या बहिणीप्रमाणे काळजी घेते लेटी

कायदेशीरदृष्ट्या लेटी दत्तक घेतलेल्या १४ मुलांची आई आहे. पण अगदी लहान असलेल्या मुलांची आई म्हणणे योग्य असले तरी काही मुले मोठी असल्याचे लेटी सांगते. अशा किशोरवयीन मुलांची मोठ्या बहिणीप्रमाणे काळजी घेत असल्याचे लेटीने सांगितले. 

अनाथालयात मुलांना मिळत होती वाईट वागणूक

जी मुले अनाथालयात होती त्यांना अनाथालय प्रशासनाकडून चांगली वागणूक मिळत नव्हती. अनेकदा अनाथालयाचे प्रशासन मुलांच्या संगोपनासाठी मिळालेले पैसे आपापसात वाटून घ्यायचे. सरकारी यंत्रणेची फसवणूक करायचे आणि मुलांवर अन्याय करायचे. मुलांना सतत एकाच पद्धतीचे निकृष्ट अन्न दिले जात होते. कोणी तक्रार करण्याचा प्रयत्न केला तर त्या मुलाला आणखी वाईट, त्रासदायक वागणूक मिळत होती. लेटी आल्यावर अल्पावधीतच प्रशासनाने काही न पटणारी कारणे पुढे करुन अनाथलय बंद करत असल्याचे जाहीर केले. अनाथालय बंद झाल्यामुळे मुले संकटात सापडणार होती. मात्र त्यांना दत्तक घेऊन मी त्या मुलांचे आणि स्वतःचे आयुष्य अतिशय सुखी केल्याचे लेटी सांगते. रस्त्यावर भिक मागताना आढळलेल्या मुलांची अवस्था अतिशय वाईट होती. त्या मुलांना वेळेत दत्तक घेऊन त्यांच्या उज्ज्वल भविष्याची तरतूद करणे शक्य झाल्याचा आनंद वाटतो, असे लेटी म्हणाली.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी