मुंबई: महागाईने हैराण झालेल्या जनतेला आणखी एक झटका बसला आहे. गॅस कंपन्यांकडून घरगुती एलपीजी सिलेंडरच्या दरात मोठी वाढ करण्यात आली आहे. तेल विपणन कंपन्यांनी घरगुती गॅस सिलेंडर (LPG price Hike) 50 रुपयांनी वाढ केली आहे. या वाढीनंतर दिल्लीत 14.2 किलोचा सिलेंडर 1053 रुपयांचा झाला आहे. यापूर्वी त्याची किंमत 1003 रुपये होती. नवीन दर आजपासून लागू झाले आहेत. 5 किलोच्या छोट्या सिलेंडरच्या दरातही वाढ झाली आहे, त्यात 18 रुपयांची वाढ करण्यात आली आहे. मात्र दुसरीकडे 19 किलोच्या व्यावसायिक सिलेंडरची किंमत 8.50 रुपयांनी कमी केली आहे.
काही दिवसांपूर्वीच तेल वितरण कंपन्यांनी व्यावसायिक सिलेंडरच्या किंमती वाढवल्या होत्या. आता आज सकाळी घरगुती सिलेंडरच्या दरातही वाढ करण्यात आली आहे. या वाढीनंतर कोलकात्यात 14.2 किलोच्या सिलेंडरची किंमत 1079 रुपयांवर पोहोचली आहे. त्याचवेळी देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईत सिलेंडरची किंमत 1052 रुपयांवर पोहोचली आहे. चेन्नईच्या ग्राहकांना आता घरगुती गॅस सिलेंडरसाठी 1068 रुपये मोजावे लागणार आहेत.
वेगवेगळ्या शहरांमध्ये घरगुती गॅस सिलेंडरची (14.2 किलो) बदललेली किंमत खालीलप्रमाणे
दिल्ली- 1,053 रूपये प्रति सिलेंडर
मुंबई - 1,052 रूपये
कोलकाता - 1,079 रूपये
चेन्नई - 1,068 रूपये
व्यावसायिक सिलेंडरच्या दरात कपात
आज व्यावसायिक सिलेंडरच्या दरात 9 रुपयांची कपात करण्यात आली आहे. दिल्लीत 19 किलोच्या व्यावसायिक सिलेंडरची किंमत आता 2,012 रुपयांवर गेली आहे. 6 जुलै 2022 पासून म्हणजेच आजपासून नवी दिल्लीत गॅस सिलेंडरचे नवे लागू झाले आहेत.
अधिक वाचा- Shiv Sena: मुख्यमंत्री शिंदे विधानसभेत भावूक झाले, राऊत म्हणतात आव आणला.. सामनातून तुफान टीका
याआधी 19 मे रोजी घरगुती गॅस सिलेंडरच्या किंमतीत बदल केला होता. दुसरीकडे लक्षात घेण्यासारखं म्हणजे, व्यावसायिक सिलेंडरच्या (LPG Commercial Cylinder Price) दरात पुन्हा एकदा कपात केली आहे.या महिन्यात आतापर्यंत दुसऱ्यांदा कपात करण्यात आली आहे. 1 जुलैला त्याची किंमत तब्बल 198 रुपयांनी कमी केली होती. आजच्या कपातीनंतर दिल्लीत 19 किलोच्या व्यावसायिक सिलेंडरची किंमत 2012.50 रुपयांवर पोहोचली आहे. व्यावसायिक गॅस सिलेंडर कोलकातामध्ये 2,132 रुपयांना उपलब्ध होईल. दुसरीकडे, मुंबईत त्याची किंमत 1972.50 रुपये आणि चेन्नईमध्ये 2177.50 रुपये असणार आहे.