Uttarakhand Election 2022 : सध्या संपूर्ण देशात महागाई वाढली असून पेट्रोल डिझेलची किंमत सामान्यांच्या आवाक्याबाहेर चालल्या आहेत. तसेच घरगुती सिलिंडरची किंमत ९०० रुपयांच्या घरात पोहोचली आहे. अशातच आता गॅस सिलिंडर ५०० रुपयांत मिळेल असे वचन छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल यांनी दिले आहे. उत्तराखंडमध्ये निवडणुकीची धामधूम सुरू आहे. उत्तराखंडमध्ये काँग्रेसचे सरकार स्थापन झाल्यास सामान्यांना गॅस सिलिंडर ५०० रुपयांत मिळेल असे वचन त्यांनी दिले आहे. यावर भाजपने टीका केली असून बघेल यांनी स्वतःच्या राज्यात गॅस सिलिंडर स्वस्तात द्यावे असे आवाहन केले आहे.
उत्तराखंडमध्ये काँग्रेसने आपला जोरदार प्रचार सुरू केला आहे. सोमवारी काँग्रेसने आपले उत्तराखंड स्वाभिमान चार धाम, चार काम या प्रचारगीताचे अनावरण केले. तसेच यावेळी झालेल्या पत्रकार परिषदेत बघेल यांनी सत्ताधारी पक्ष भाजवर जोरदार टीका केली. बघेल म्हणाले की देशात महागाई आणि बेरोजगारी वाढली आहे, पण सरकारकडे याबद्दल काहीच आकडेवारी नाही. मोदी सरकारच्या काळात देशात सर्वाधिक बेरोजगारी वाढली आहे. मोदींनी आपल्या उद्योजक मित्रांसाठी देशातील सर्वसामान्यांना वेठीस धरले आहे. ४५० रुपयांना मिळणार्या सिलिंडरची किंमत दुप्पट झाली आहे. जर उत्तराखंडमध्ये काँग्रेसचे सरकार आले तर ग्राहकांना हा सिलिंडर ५०० रुपयांत मिळेल अशी घोषणा बघेल यांनी केली आहे. सिलिंडरची किंमत ५०० रुपयांच्या आतच राहील असेही बघेल यांनी नमूद केले.
५०० रुपयांत गॅस सिलिंडर मिळणार, उत्तराखंडमध्ये काँग्रेसचे वचन#UttarakhandElections2022 #bhupeshbaghel #lpggas pic.twitter.com/q7NkEBucEt
— Timesnowmarathi (@timesnowmarathi) January 25, 2022
तर दुसरीकडे छत्तीसगडचे माजी मुख्यमंत्री आणि भाजप नेते डॉ. रमण सिंह यांनी काँग्रेसवर टीका केली आहे. काँग्रेसने निवडणूक जिंकण्यासाठी अशा प्रकारे घोषणा दिल्या आहेत. मुख्यमंत्री भूपेश बघेल यांनी आधी गृहराज्य छत्तीसगडमध्ये सिलिंडर ५०० रुपयांत द्यावा अशी मागणी डॉ. रमण सिंह यांनी केली आहे. तसेच उत्तराखंडमध्ये काँग्रेस पुन्हा सत्तेवर येणार नाही असेही सिंह म्हणाले आहेत.