पावसाचं थैमान! हॉस्पिटलमध्ये शिरलं पाणी रुग्ण झाले हैराण

लोकल ते ग्लोबल
Updated Sep 13, 2019 | 20:42 IST | टाइम्स नाऊ डिजीटल

यंदाच्या वर्षी पावसाने देशभरातील विविध राज्यांत अतिवृष्टी झाल्याचं पहायला मिळालं. त्याच प्रकारे मध्यप्रदेशातही गेल्या अनेक दिवसांपासून जोरदार पाऊस पडत आहे आणि यामुळे अनेक शहरांत पाणी भरलं आहे.

Rain water in hospital
मुसळधार पावसामुळे रुग्णालयात पाणी  |  फोटो सौजन्य: ANI

थोडं पण कामाचं

  • मध्यप्रदेशात गेल्या चार दिवसांपासुन मुसळधार पाऊस सुरू
  • मुसळधार पावसामुळे हवामान खात्याने दिला रेड अलर्ट
  • इंदूर येथील महाराजा यशवंतराव रुग्णालयात शिरलं पावसाचं पाणी

इंदूर: मध्यप्रदेशात गेल्या अनेक दिवसांपासून जोरदार पाऊस पडत आहे. पावसामुळे उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना दिलासा मिळाला असला तर दुसरीकडे मुसळधार पावसामुळे नागरिकांना मोठ्या समस्यांचा सामना करावा लागत आहे. मध्यप्रदेशातील इंदूर येथे असलेल्या महाराजा यशवंतराव रुग्णालयातच पावसाचं पाणी शिरलं. गुरुवारी इंदूरमध्ये जोरदार पाऊस झाला आणि त्यामुळे अनेक परिसर जलमय झाले.

मुसळधार पावसामुळे नागरिकांच्या घरात पाणी शिरलं. तसेच अनेक ठिकाणी वाहतूक कोंडी सुद्धा निर्माण झाली. गुरुवारी झालेल्या या पावसामुळे इंदूर येथील प्रसिद्ध असलेल्या महाराजा यशवंतराव रुग्णालयात पाणी शिरलं. पावसाचं पाणी रुग्णालयाच्या वॉर्ड आणि कॉरिडोरमध्ये शिरलं. रुग्णालयात पाणी शिरल्यामुळे त्याचा फटका रुग्णांना आणि त्यांच्या नातेवाईकांना बसला. रुग्णालयातील अनेक उपकरण आणि वस्तू चक्क पावसाच्या पाण्यात तरंगत असल्याचं पहायला मिळालं.

फोटोजमध्ये दिसत आहे की, रुग्णांची औषधे मिळवण्यासाठी त्यांच्या नातेवाईकांना गुडघाभर पाण्यातून जावं लागत आहे. मध्यप्रदेशात गेल्या चार ते पाच दिवसांपासून जोरदार पाऊस पडत आहे. सध्याची परिस्थिती पाहता हवामान विभागाने मध्यप्रदेशात रेड अलर्ट सुद्धा जारी केला आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, पुढील ४८ तासांत मुसळधार पावसाचा अंदाज आहे. हवामान विभागाच्या अधिकाऱ्याने सांगितले की, "हवामानानुसार अतिवृष्टी होण्याची दाट शक्यता आहे आणि नागरिकांनी सतर्क राहून काळजी घेण्याची गरज आहे. पोलीस, महानगरपालिका कुठल्याही परिस्थितीचा सामना करण्यास पूर्णपणे सज्ज आहे".

देशभरातील विविध राज्यात गेल्या अनेक दिवसांपासून जोरदार पाऊस पडत असल्याचं पहायला मिळत आहे. मुसळधार पावसामुळे नागरिकांना मोठ्या समस्यांचा सामना करावा लागत आहे. काही दिवसांपूर्वी मुंबई, कोकण, सातारा, नाशिक, कोल्हापूर या भागात जोरदार पाऊस पडला आणि त्यामुळे पूरस्थिती निर्माण झाली होती. कोल्हापूर, सांगली, सातारा जिल्ह्यातील नागरिकांच्या घरात अनेक दिवस पाणी शिरलं होतं त्यामुळे नागरिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी