ताशी ६०० किमी वेगाने धावणार चिनी सुपरफास्ट ट्रेन 'मॅग्लेव'

चीनने पूर्वेकडील शॉनडॉन्ग प्रांतातल्या किंगडाओं येथे मंगळवारी ताशी ६०० किमी वेगाने धावणाऱ्या चिनी बनावटीच्या सुपरफास्ट ट्रेनची यशस्वी चाचणी घेतल्याचे जाहीर केले. या ट्रेनला चीनने 'मॅग्लेव' हे नाव दिले आहे.

maglev train : World's first 600 km/h high-speed train rolls off in China
ताशी ६०० किमी वेगाने धावणार चिनी सुपरफास्ट ट्रेन 'मॅग्लेव' 

थोडं पण कामाचं

  • ताशी ६०० किमी वेगाने धावणार चिनी सुपरफास्ट ट्रेन 'मॅग्लेव'
  • 'मॅग्लेव' ही चीनने देशाच्या पायाभूत वाहतूक प्रकल्प योजनेला दिलेली एक नवी कोरी आणि मोठी भेट
  • जमिनीवर कार्यरत वाहनांमधील सर्वात वेगवान वाहन

बीजिंग: कोरोना संकटासाठी जगातील अनेक देश चीनला दोष देत आहेत. जगातील अनेक देशांची अर्थव्यवस्था कोरोना संकटामुळे कोलडमली आहे. या अशा वातावरणात चीनने पूर्वेकडील शॉनडॉन्ग प्रांतातल्या किंगडाओं येथे मंगळवारी ताशी ६०० किमी वेगाने धावणाऱ्या चिनी बनावटीच्या सुपरफास्ट ट्रेनची यशस्वी चाचणी घेतल्याचे जाहीर केले. या ट्रेनला चीनने 'मॅग्लेव' हे नाव दिले आहे. याआधीच चीनने बुलेट ट्रेनच्या तंत्रज्ञानात मोठी प्रगती केली आहे. maglev train : World's first 600 km/h high-speed train rolls off in China

'मॅग्लेव' ही चीनने देशाच्या पायाभूत वाहतूक प्रकल्प योजनेला दिलेली एक नवी कोरी आणि मोठी भेट आहे. चीन सरकारचे मुखपत्र असलेल्या 'ग्लोबल टाइम्स'ने 'मॅग्लेव' संदर्भातले वृत्त दिले. चीनमधील हायस्पीड ट्रेनचा वेग ताशी ३५० किमी आणि विमानाचा वेग ताशी ८०० किमी आहे. या दोन्ही वाहनांमधील वेगाचे अंतर भरुन काढणारी 'मॅग्लेव' ही चिनी बनावटीची सुपरफास्ट ट्रेन ताशी ६०० किमी वेगाने धावणार आहे. चीन सरकारने २०३५ पर्यंत देशात 'मॅग्लेव'चे मोठे नेटवर्क उभारण्याचा निर्णय घेतल्याचे वृत्त 'ग्लोबल टाइम्स'ने दिले आहे. 

जमिनीवर कार्यरत वाहनांमधील सर्वात वेगवान वाहन अशा शब्दात 'ग्लोबल टाइम्स'ने 'मॅग्लेव'ची ओळख करुन दिली आहे. सध्या 'मॅग्लेव' दीड हजार किमी.च्या परिसरात कार्यरत राहणार आहे. चिनी ट्रेन दहा तासांत शेनजेन ते शांघाय हा प्रवास पूर्ण करते. पण 'मॅग्लेव' कार्यरत झाल्यावर शेनजेन ते शांघाय हा प्रवास २ तास ५० मिनिटांत पूर्ण होईल, असे 'ग्लोबल टाइम्स'च्या वृत्तात नमूद आहे. 

पूर्ण वेगात असलेली 'मॅग्लेव' थांबवण्यासाठी दहा किमी. आधी ब्रेक लावावा लागेल. तांत्रिक प्रयोगांच्या वेळी पूर्ण वेगातील 'मॅग्लेव' थांबवण्यासाठी सोळा किमी. आधी ब्रेक लावावा लागत होता. पण आणखी बदल करुन अंतिम स्वरुप देण्याआधी 'मॅग्लेव'च्या ब्रेकच्या कार्यक्षमतेत सुधारणा करण्यात आली.

चीनने ऑक्टोबर २०१६ मध्ये 'मॅग्लेव' प्रकल्प सुरू केला. या प्रकल्पाचा प्रोटोटाइप २०१९ मध्ये तयार झाला. जून २०२० मध्ये पहिली ट्रायल रन झाली. ट्रायलनंतर आणखी बदल करुन 'मॅग्लेव'ला अंतिम स्वरुप देण्यात आले. यानंतर २० जुलै २०२१ रोजी 'मॅग्लेव'ची सेवा सुरू होण्याआधीची अंतिम चाचणी घेण्यात आली. ही चाचणी यशस्वी झाल्याचे वृत्त 'ग्लोबल टाइम्स'ने दिले. आता चीनकडे जगातील सर्वात मोठे हायस्पीड रेल नेटवर्क आहे. या नेटवर्कचा ९५ टक्के भाग चीनमधून जातो तर उर्वरित ५ टक्के भाग शेजारी देशांशी जोडलेला आहे. 

'ग्लोबल टाइम्स'च्या वृत्तानुसार चीनच्या रेल्वे नेटवर्कची एकूण लांबी १४६ हजार ३०० किमी आहे. हे नेटवर्क २०० हजार किमी करण्यासाठी चीन सरकार काम करत असल्याची माहिती 'ग्लोबल टाइम्स'ने दिली आहे.

जपानमध्ये सध्या LO सीरिजच्या ताशी ३७४ मैल वेगाने धावणाऱ्या टोकियो-नागोया मार्गावरील ट्रेनची चाचणी सुरू आहे. ही ट्रेन २०२७ पर्यंत कार्यरत होईल. या व्यतिरिक्त जपान आणि फ्रान्स या दोन्ही देशांमध्ये बुलेट ट्रेन कार्यरत आहेत. इटलीमध्ये २०१२ पासून ताशी ३६९ किमी वेगाने बुलेट ट्रेन कार्यरत आहे. ही बुलेट ट्रेन नापोली, रोमा, फिरेंजे, बोलोग्ना, मिलानो या मार्गावर धावते. स्पेनमध्ये वेलारो ई हाई स्पीड ट्रेन कार्यरत आहे. ही ट्रेन ताशी २५० किमी वेगाने धावते. जून २००७ पासून ही ट्रेन बार्सिलोना-माद्रिद मार्गावर कार्यरत आहे.

भारत वेगवान ट्रेनच्या बाबतीत अद्याप बराच मागे आहे. वंदे भारत एक्सप्रेस ही भारतातील सर्वात वेगवान ट्रेन आहे. ही ट्रेन जास्तीत जास्त ताशी १८० किमी वेगाने धावू शकते. सध्या ही ट्रेन दिल्ली-वाराणसी मार्गावर ताशी १३० किमी वेगाने धावत आहे. नवी दिल्ली-आग्रा मार्गावर धावणारी गतिमान एक्सप्रेस ताशी १६० किमी वेगाने धावू शकते. ही देशातील दुसऱ्या क्रमांकाची वेगवान ट्रेन आहे. नवी दिल्ली-भोपाळ शताब्दी एक्सप्रेस ही ट्रेन ताशी ९१ किमी वेगाने धावते. ही देशातील तिसऱ्या क्रमांकाची वेगवान ट्रेन आहे. गतिमान आणि वंदे भारत यांच्या आगमानाआधी नवी दिल्ली-भोपाळ शताब्दी एक्सप्रेस ही देशातील वेगवान ट्रेन होती. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी