Mahabaleshwar Hill Station : महाबळेश्वर म्हणजे पर्यटन स्थळांचा राजा, सौंदर्य पाहून प्रत्येकजण होतो ताजातवाना, फोटो पाहूनच वाटेल प्रसन्न

महाबळेश्वर हे महाराष्ट्रातील नव्हे तर देशभरातील पर्यटकांचं आवडतं ठिकाण. अशी कुठली ठिकाणं इथं आहेत जी पर्यटकांना आकर्षित करतात... पाहुया.

Mahabaleshwar Hill Station
महाबळेश्वर - पर्यटनस्थळांचा राजा  |  फोटो सौजन्य: Indiatimes
थोडं पण कामाचं
  • महाबळेश्वर एक उत्तम पर्यटनस्थळ
  • घनदाट जंगल, तळी आणि डोंगरांचा परिसर
  • मे महिन्यात भरतो स्ट्रॉबेरी फेस्टिव्हल

Mahabaleshwar Hill Station | महाबळेश्वर (Mahabaleshwar) हे महाराष्ट्रातील एक सुप्रसिद्ध आणि लोकप्रिय पर्यटनस्थळ (Hill Station). सातारा जिल्ह्यात समुद्रसपाटीपासून 1353 मीटरवर महाबळेश्वर वसलं आहे. डोंगर, दऱ्या, पठारं आणि मैदानं यांनी सजलेलं महाबळेश्वर वर्षानुवर्षं पर्यटकांच्या पसंतीचं स्थळ राहिलं आहे. धाडसी ट्रेक आणि निसर्गाचा आनंद लुटायचा असेल, तर महाबळेश्वर हा पर्यटकांसाठी एक उत्तम पर्याय आहे. महाबळेश्वर आणि त्याच्या आसपासच्या परिसरात अनेक अशी ठिकाणं आहेत, जिथं तुम्ही जाऊ शकता आणि पर्यटनाचा चौफेर आनंद लुटू शकता. 

प्रतापगड

महाबळेश्वरपासून प्रतापगड अगदी हाकेच्या अंतरावर आहे. छत्रपती शिवरायांनी अफझलखानाचा वध केला, तो हाच प्रतापगड. 1665 साली हा किल्ला बांधण्यात आला होता. गडावर महादेव मंदिर, भवानी मंदिर आणि अफजलखानाची कबर आहे. एक पूर्ण दिवस प्रतापगड आणि परिसरात फिरता येतं. 

मॅप्रो गार्डन

महाबळेश्वरमध्ये फिरण्यासाठी मॅप्रो गार्डन हे सर्वोत्तम ठिकाण आहे. स्ट्रॉबेरी उत्पादन ही मॅप्रो गार्डनची खासियत. मध, चॉकलेट, गुलकंद यासारखे अनेक पदार्थ इथं तयार होतात आणि त्याचा तुम्ही तिथेच आस्वाद घेऊ शकता. याशिवास स्ट्रॉबेरी सॅलड, स्ट्रॉबेरी आईस्क्रीम आणि स्ट्रॉबेरी शेकचाही इथं मनसोक्त आनंद लुटू शकता. दरवर्षी इथं मे महिन्यात स्ट्रॉबेरी फेस्टिव्हल साजरा करण्यात येतो. 

एलिफंट्स हेड पॉइंट

मित्रमंडळी किंवा कुटुंबीयांसोबत सुट्टी साजरी कऱण्यासाठी हा एक उत्तम पॉइंट आहे. या भागाकडे बारकाईनं पाहिलं तर एखाद्या हत्तीचं डोकं आणि पाठ यांच्यासारख्या हा भाग दिसतो. हिरवागार परिसर, थंडगार वारे आणि डोळ्यांना सुखावणारा निसर्ग यामुळे या भाागाला पर्यटकांची नेहमीच पसंती मिळते. 

वेण्णा लेक

हे 28 एकर परिसरात पसरलेलं मानवनिर्मित तळं आहे. याची निर्मिती ही महाबळेश्वरच्या पाण्याची गरज भागवण्यासाठी झाली होती. वेण्णा लेक चारही बाजूंनी हिरवळीनं नटलेलं आहे. या तळ्यावर मासे पकडणं आणि तिथल्या मिनी ट्रेननं प्रवास करणं याची मजाच काही और असते. या तळ्याकाठी सूर्यास्त पाहण्याचा आनंदही अविस्मरणीय असतो. संध्याकाळच्या वेळी या ठिकाणी जाण्याचा प्लॅन केलात, तर तिथल्या निसर्गाचा अधिक मनसोक्त आनंद लुुटता येईल. 

तपोला

तपोल्याला मिनी काश्मीर असं म्हटलं जातं. जंगल सफारी आणि हिरवागार निसर्ग यासाठी हे ठिकाण प्रसिद्ध आहे. इथला जलाशय पर्यटकांसाठी दिवसभर खुला असतो. या ठिकाणाची खरी रमणीयता अनुभवायची असेल, तर संध्याकाळ ही उत्तम वेळ आहे. 

अधिक वाचा - DGCA New Rules: ‘या’ लोकांना विमान प्रवास करता येणार नाही, DGCA चा निर्णय, विमान प्रवाशांसाठी मोठी बातमी

महाबळेश्वरला जाण्याचा मार्ग

विमानाने - महाबळेश्वरमध्ये विमानतळ नाही. सर्वात जवळचं विमानतळ आहे पुणे. पुण्याहून महाबळेश्वर 131 किलोमीटर आहे. पुण्यातून एसटी बस किंवा खासगी वाहनाने तुम्ही महाबळेश्वरला जाऊ शकता. 

रेल्वे - महाबळेश्वरपासून सर्वात जवळ असणारं रेल्वे स्टेशन म्हणजे वाठार. तिथून बस किंवा खासगी वाहनाने महाबळेश्वरला येता येतं. 

रस्ते - पुणे किंवा मुंबईतून टॅक्सी भाड्याने घेऊन महाबळेश्वरला जाता येतं. मुंबईतून एक्स्पेस वेने पुण्याला आणि तिथून पुणे-बंगळुरू हायवेने साताऱ्यापर्यंत येता येतं. तिथून थेट महाबळेश्वरला जाऊ शकता.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी