Maharashtra Chitrarath or Maharashtra Tableau based on the Nari Shakti participated in Republic Day Parade : आज (गुरुवार 26 जानेवारी 2023) भारताचा 74वा प्रजासत्ताक दिन साजरा होत आहे. परंपरेनुसार प्रजासत्ताक दिनी सकाळी दिल्लीत कर्तव्यपथावर परेड झाली. या परेडमध्ये (पथसंचलन) महाराष्ट्राच्या वतीने 'साडेतीन शक्तिपीठे आणि नारी शक्ती' या संकल्पनेवर आधारित चित्ररथ सहभागी झाला.
महाराष्ट्राच्या चित्ररथावर कोल्हापूर, तुळजापूर, माहूर आणि नाशिक या साडेतीन शक्तिपिठांच्या देवींच्या मूर्ती होत्या. तसेच गोंधळी, पोतराज, वारकरी यांचा समावेश दिसत होता. राज्यातील सांस्कृतिक वैविध्य अनुभवण्याची संधी महाराष्ट्राच्या चित्ररथाद्वारे देण्यात आली होती.
विशेष म्हणजे दिल्लीत कर्तव्यपथावर आणि महाराष्ट्रात मुंबई येथे शिवाजी पार्कवर असे 2 ठिकाणी महाराष्ट्राचे चित्ररथ परेडमध्ये सहभागी झाले. दोन्ही चित्ररथांच्या संकल्पनेत फरक होता. पण दोन्ही चित्ररथांसाठी 2 वेगवेगळी गाणी रचण्याची जबाबदारी डोंबिवलीच्या प्राची गडकरी यांना देण्यात आली होती. या 2 गाण्यांसाठी कौशल इनामदार आणि वैशाली सामंत या दोघांनी संगीताची बाजू सांभाळली होती.
महाराष्ट्रात कोल्हापूर, तुळजापूर, माहूर आणि नाशिक या ठिकाणी शक्तिपीठे आहेत. या शक्तिपीठांना महाराष्ट्रातील साडेतीन शक्तिपीठे या नावाने ओळखले जाते. दरवर्षी लाखो भाविक या शक्तिपिठांना भेट देऊन देवीचे दर्शन घेतात.