पुणे : पंजाबी गायक (punjabi singer) आणि काँग्रेसचे नेते (Congress leaders) सिद्धू मुसेवाला (sidhu moosewala) यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आल्याच्या घटनेला आता जवळपास आठवडा झाला आहे. आता या प्रकरणात नवनवीन खुलासे होत आहेत. गायकाच्या हत्येची कबुली लॉरेन्स बिश्नोईने दिली होती. आता या हत्येचं महाराष्ट्र कनेक्शनही समोर आलं आहे. सिद्धू मुसेवाला यांच्या हत्येप्रकरणी पोलिसांना मोठे यश मिळाले असून हत्ये करण्यासाठी एकूण 8 शूटर बोलावण्यात आल्याची माहिती पोलिसांनी मिळाली आहे. वेगवेगळ्या राज्यांमध्ये हे शूटर मागवण्यात आले असून यातील दोन जण पुण्यातील असल्याचं समोर आलं आहे.
सिद्धू मुसेवालाची हत्या करणाऱ्या आठ शूटर्सची ओळख पटली आहे. यामध्ये पुण्यातील दोन शूटरचाही समावेश असून संतोष जाधव आणि सौरभ महाकाळ अशी त्यांची नावं आहेत. या हल्लेखोरांना पंजाब पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. या दोघा शार्प शूटर्सना अधिक तपासासाठी पंजाबमध्ये नेऊन कोर्टापुढे हजर केले जाणार आहे.
गायक मुसेवाला हत्याप्रकरणी पंजाब पोलिसांनी ही परस्पर कारवाई केली असून, या संदर्भात आम्हाला काहीही माहिती नाही, असे पुणे पोलिसांतर्फे सांगण्यात आले. मात्र, मुसेवाला हत्याकांडाचे कनेक्शन पुण्याशी जोडले जात असल्याने शहरात खळबळ उडाली आहे. सौरभ महाकाळ याला मंचर येथून, तर संतोष जाधव याला पुणे शहरातून उचलल्याची प्राथमिक माहिती आहे.
समोर आलेल्या माहितीनुसार, सिद्धू मुसेवालाची हत्या करण्यासाठी एकूण आठ शूटर पंजाब, राजस्थान आणि महाराष्ट्रातून बोलावण्यात आले होते. यात पंजाब आणि राजस्थानमधील प्रत्येक 3 तर महाराष्ट्रातील दोन शूटरचा समावेश होता. संतोष जाधव आणि सौरभ महाकाळ बाणखेले खून प्रकरणातील मोक्काचे फरार आरोपी आहेत. दोन वर्षापासून दोघंही फरार आहेत. आता ते पंजाबमध्ये राहात असल्याची माहिती ग्रामीण पोलिसांना मिळाली आहे. दरम्यान, पोलिसांकडून दिल्ली, पंजाब, हरियाणा आणि राजस्थानमध्ये जोरदार छापेमारी सुरूच आहे. सिद्धू मूसवालाच्या हत्येतील शूटर्सना पकडण्यासाठी दिल्ली, पंजाब, हरियाणा आणि राजस्थानमध्ये वेगाने छापे टाकण्यात येत आहेत. पंजाब पोलीस, दिल्ली पोलीस, राजस्थान पोलिसांसह अनेक राज्यांचे पोलीस या शूटर्सला अटक करण्यात प्रयत्न करत आहेत.
पंजाबी गायक आणि राजकारणी सिद्धू मुसेवाला यांच्या हत्येमुळे संपूर्ण देशात खळबळ उडाली होती. त्यांच्या हत्येचे कनेक्शन हे कॅनडास्थित गँगशी असल्याचे बोलले जात आहे. त्यांच्या हत्येची जबाबदारी तिहार जेलमध्ये असलेल्या बिष्णोई या कुख्यात गंडाने घेतली होती. मुसेवाला हे त्यांच्या गाडीने जात असताना २९ मे रोजी मानसा जिल्ह्यातील जवाहरके गावात त्यांना दोघांनी गोळ्या घालून ठार मारले होते.
1. मनप्रीत सिंग मन्नू: पंजाबमधील तरनतारन येथील रहिवासी असलेल्या मनप्रीत सिंग मन्नूला पोलिसांनी उत्तराखंडमधून अटक केली. नेमबाजांना रसद पुरवणे आणि वाहने पुरवल्याचा आरोप आहे.
2. जगरूप सिंग रुपा: ते पंजाबमधील तरनतारनचे रहिवासी आहेत.
3. हरकमल उर्फ रानू : मूळची भटिंडा, पंजाब.
4. प्रियव्रत उर्फ फौजी: मूळचा सोनीपत, हरियाणाचा. हरियाणा पोलिसांनी मुसेवाला हत्याकांडावर 25 हजार रुपयांचे बक्षीसही ठेवले आहे.
5. मनजीत उर्फ भोलू : मूळचा सोनीपत, हरियाणाचा.
6. सौरव तथा महाकाल : मूळचा पुणे, महाराष्ट्र.
7. संतोष जाधव : पुणे, महाराष्ट्र येथील रहिवासी.
8. सुभाष बनोडा : राजस्थानमधील सीकर येथील रहिवासी.
पंजाबी गायक आणि काँग्रेसचे नेते सिद्धू मुसेवाला (punjabi singer sidhu moosewala ) यांची गोळी झाडून हत्या करण्यात आली होती. मानसा येथे सिद्धू यांच्यावर गोळ्या झाडण्यात आल्या. या घटनेत सिद्धुचा दुर्दैवी मृत्यू झाला. पंजाबमधील भगवंत मान सरकारने ४२४ महत्त्वाच्या व्यक्तींची सुरक्षा काढून घेण्याचा निर्णय नुकताच घेतला. सुरक्षा काढून घेतलेल्या महत्त्वाच्या व्यक्तींमध्ये सिद्धू मुसेवाला यांचाही सामावेश होता. सुरक्षा काढून घेतल्याचा ठीक एका दिवसानंतर ही घटना घडली होती. मुसेवाला यांच्या एकूण 23 जखमा होत्या असं शवविच्छेदन अहवालातून समोर आलं होतं. 14 ते 15 गोळ्या मुसेवालांच्या शरीरातून आरपार गेल्या होत्या. या हल्ल्यात मुसेवालाच्या शरीरवर तब्बल तीन ते पाच सेंटीमीटर पर्यंतच्या खोल जखमा दिसून आल्या होत्या. सध्या पंजाब पोलीस हा हत्येप्रकरणी अधिक तपास करत आहेत.