Maharashtra Karnataka Border row: महाराष्ट्र आणि कर्नाटक यांच्यातील सीमावादावर निर्माण झालेल्या वादावर दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई उपस्थित होते. या बैठकीत सकारात्मक चर्चा झाली असल्याची माहिती अमित शहा यांनी दिली.
बैठकीनंतर अमित शहा यांनी म्हटलं, महाराष्ट्र - कर्नाटक सीमेच्या संदर्भात वाद निर्माण झाला होता. या संदर्भात मी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि कर्नाटकचे मुख्यमंत्री, गृहमंत्री यांना बैठकीसाठी बोलावले होते. या सर्वांसोबत बैठक झाली. दोन्ही राज्यांच्या मुख्यमंत्र्यांनी सकारात्मकपणे चर्चा केली.
Addressing the media after the meeting on the Maharashtra-Karnataka border issue. Watch live! https://t.co/p9jN0m9ajB — Amit Shah (@AmitShah) December 14, 2022
अमित शहा यांनी पुढे म्हटलं, आजच्या बैठकीत काही निर्णय झाले आहेत जे मी तुम्हाला सांगू इच्छितो. जोपर्यंत सुप्रीम कोर्टाचा याबाबत कोणताही निर्णय येत नाही तोपर्यंत कोणताही राज्य या संदर्भात एकमेकांच्या राज्यावर आपला दावा करणार नाही. दुसरं म्हणजे दोन्ही राज्यांकडून तीन-तीन असे सहा मंत्री एकत्र बसतील आणि त्यावर चर्चा करतील. छोटे-छोटे इतर मुद्दे सुद्धा आहेत जे शेजारील राज्यांत सामान्यत: पाहिले जातात अशा मुद्द्यांचे निवारण सुद्धा हे मंत्री करतील. दोन्ही राज्यांतील कायदा आणि सुव्यवस्थेची परिस्थिती चांगली राहील. सामान्य नागरिक आणि व्यापाऱ्यांना कोणत्याही प्रकारची समस्येचा सामना करावा लागणार नाही यासाठी एका वरिष्ठ आयपीएस अधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली दोन्ही राज्य कमिटी बनवण्यासाठी सहमत आहेत.