गुवाहाटी : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी दोन दिवसांपूर्वी फेसबूक लाईव्ह करत आपल्या बंडखोर आमदारांना पुन्हा परत येण्यासाठी एक भावनिक आवाहन केलं. मात्र, उद्धव ठाकरेंच्या आवाहनानंतरही काल (२३ जून) सहा आमदार गुवाहाटीत (Guwahati) पोहोचले आणि शिंदे गटात सहभागी झाले. त्यानंतर आता उद्धव ठाकरेंना आणखी एक धक्का बसला आहे. कारण, कालपर्यंत उद्धव ठाकरेंसोबत असलेले आमदार आज थेट गुवाहाटीत शिंदे गटात दाखल झाल्याचं पहायला मिळत आहे.
शिवसेनेचे चांदीवलीचे आमदार दिलीप लांडे (MLA Dilip Lande) हे उद्धव ठाकरेंसोबत होते. दोन दिवसांपूर्वी उद्धव ठाकरेंनी फेसबूक लाईव्ह केलं होतं त्यावेळीही आमदार दिलीप लांडे हे वर्षा बंगल्यावर उपस्थित होते. इतकंच नाही तर आपण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबतच आहे आणि त्यांच्यासोबतच राहणार असा दावाही आमदार दिलीप लांडे यांनी माध्यमांना प्रतिक्रिया देताना केला होता. पण आज हेच आमदार दिलीप लांडे हे गुवाहाटीत पोहोचले आहेत.
Assam | Maharashtra Shiv Sena MLA Dilip Lande joins other rebel MLAs at Guwahati hotel pic.twitter.com/QlOCX7wyJS — ANI (@ANI) June 24, 2022
मुंबईतील चांदिवलीचे आमदार दिलीप लांडे शिंदे गटात दाखल, गुवाहाटीच्या रॅडिसन हॉटेलमध्ये दाखल #MaharashtraPoliticalCrisis #MaharashtraCrisis pic.twitter.com/Xa4GvOlM6K — Timesnowmarathi (@timesnowmarathi) June 24, 2022
एकनाथ शिंदे यांच्या गटातील आमदारांची संख्या वाढणार आणि आणखी शिवसेनेचे आमदार गुवाहाटीत येणार असा दावा वारंवार शिंदे गटातून करण्यात येत आहे. आमदार दिलीप लांडे हे सुद्धा शिंदे यांच्या गटात सहभागी होणार असल्याचं बोललं जात होतं. मात्र, या सर्व बातम्या आमदार दिलीप लांडे यांनी फेटाळून लावल्या होत्या. पण आज आमदार दिलीप लांडे हे थेट गुवाहाटीत दाखल झाले आणि एकनाथ शिंदे यांच्या गटात सहभागी झाले.
गुवाहाटीत ज्या हॉटेलमध्ये एकनाथ शिंदे आणि त्यांचे समर्थक आमदार वास्तव्यास आहेत. त्या हॉटेलमध्ये आमदार दिलीप लांडे पोहोचले. यावेळी आमदार दिलीप लांडे हे हॉटेलमध्ये प्रवेश करताच इतर आमदारांसोबत हस्तांदोलन करताना दिसून येत आहेत. दिलीप लांडे हॉटेलमध्ये पोहोचल्यावर तेथे उपस्थित असलेल्या आमदारांसोबतचा एक फोटोही समोर आला आहे. या फोटोत जवळपास २४ आमदार उपस्थित असल्याचं दिसत आहे.
आमदार एकनाथ शिंदे आणि काही आमदार हे हॉटेलमधून बाहेर पडल्याचं वृत्त थोड्यावेळापूर्वी समोर आलं होतं. त्यामुळे एकनाथ शिंदे हे दिल्लीला चालले आहेत की मुंबईला जाणार या वरुन अनेक तर्कवितर्क लावले जात होते. पण एकनाथ शिंदे यांनी माध्यमांना फोनवरुन प्रतिक्रिया देत आपण गुवाहाटीतच असल्याचा दावा केला.