गुवाहाटीत चाललंय काय? शिंदेंच्या गटातील दोन आमदार हॉटेलबाहेर

Maharashtra political crisis: महाराष्ट्रात गेल्या तीन दिवसांपासून विविध राजकीय घडामोडी होत असताना दिसत आहेत. या राजकीय घडामोडी सुरू असतानाच आता गुवाहाटी येथून एक मोठी बातमी समोर आली आहे. 

Maharashtra political crisis Shiv sena mla Deepak kesarkar and independent mla ashish jaiswal went outside guwahati hotel
गुवाहाटीच्या हॉटेलमध्ये चाललंय तरी काय? शिंदेंच्या गटातील दोन आमदार हॉटेलबाहेर 
थोडं पण कामाचं
  • एकनाथ शिंदेंच्या बंडामुळे ठाकरे सरकार अडचणीत आले आहे.
  • शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी एकनाथ शिंदे यांना ऑफर दिली असून २४ तासांत पुन्हा मुंबईत परतण्याचं म्हटलं आहे
  • मुंबईत येऊन चर्चा करा, महाविकास आघाडीतून बाहेर पडण्याचा विचार करु - संजय राऊत

गुवाहाटी : महाराष्ट्रातील राजकारणात (Maharashtra Politics) भूकंप आला असून विविध राजकीय घडामोडी घडताना दिसत आहे. शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या बंडानंतर अनेक आमदारांनी शिंदेंना पाठिंबा दर्शवत त्यांच्या गटात समाविष्ट झाले आहेत. एकनाथ शिंदे यांच्या गटात सहभागी होणाऱ्या आमदारांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे आणि त्यामुळे महाविकास आघाडी सरकार (Maha Vikas Aghadi Government) अडचणीत आलं आहे. एकनाथ शिंदे यांच्या गटात आमदारांची संख्या वाढत असातानाच आता गुवाहाटी (Guwahati) येथून एक मोठी बातमी समोर आली आहे.

एकनाथ शिंदे यांच्यासोबत शिवसेनेचे ३५ आमदार आणि इतर अपक्ष सात आमदार आहेत. हे सर्व आमदार गुवाहाटी येथील हॉटेलमध्ये वास्तव्यास आहेत. एकनाथ शिंदेंच्या बंडामुळे ठाकरे सरकार अडचणीत आले आहे. यामुळेच शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपल्या आमदारांना एक भावनिक आवाहन करत परत येण्याची विनंती केली. मात्र, असे असतानाही आज आणखी सहा आमदार हे शिंदे गटात सहभागी झाले. त्यामध्ये शिवसेनेचे आमदार दिपक केसरकर आणि शिवसेना पुरस्कृत आशिष जैसवाल यांचा समावेश होता. मात्र, आता काही वेळापूर्वीच हे आमदार गुवाहाटी येथील हॉटेल (Radisson Blu Hotel in Guwahati) मधून बाहेर पडले आहेत.

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, शिवसेनेचे आमदार दिपक केसरकर आणि शिवसेना पुरस्कृत आमदार आशिष जैसवाल हे गुवाहाट येथील हॉटेलमधून बाहेर पडले आहेत. कारमधून हे दोन्ही आमदार निघून गेले आहेत. मात्र, हे दोन्ही आमदार नेमके कुठे गेले? काही कामासाठी गुवाहाटीतच आहेत की अन्य इतरत्र ठिकाणी गेले आहेत याबाबत अद्याप कुठलीही अधिकृत माहिती समोर आलेली नाहीये.

आणखी दोन आमदार शिंदेंच्या गटात

शिवसेनेचे एकूण ३५ आमदार आणि सात अपक्षांची एकनाथ शिंदेंना साथ असतानाच आता आणखी दोन आमदार हे गुवाहाटीच्या दिशेने निघाले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, मंत्री दादा भूसे आणि माजी वनमंत्री संजय राठोड हे दोन्ही आमदार सुरतहून गुवाहाटीच्या दिशेने निघाले असल्याचं वृत्त समोर आलं आहे. मुंबईहून दोन्ही आमदार आधी सुरतमध्ये पोहोचले आणि त्यानंतर तेथून ते गुवाहाटीत जाणार असल्याचं बोललं जात आहे.

एकनाथ शिंदे यांचं गुवाहाटीत शक्तिप्रदर्शन

तर दुसरीकडे शिवसेनेचे नेते आणि कॅबिनेट मंत्री एकनाथ शिंदे हे आपल्या समर्थक आमदारांसह गुवाहाटीतील हॉटेलमध्ये आहेत. या हॉटेलमध्ये त्यांच्यासोबत असलेल्या आमदारांसोबतचा एक व्हिडिओ पोस्ट करत एकनाथ शिंदे यांनी शक्तिप्रदर्शन केलं आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी