नवी दिल्ली: Maharashtra Political Crisis: गेल्या दोन महिन्यांपासून राज्यातल्या राजकारणात दररोज वेगवेगळ्या घडामोडी घडत आहेत. त्यातच आज राज्यात नव्यानं स्थापन केलेल्या सरकारसाठी म्हणजेच शिंदे गटासाठी (Shinde group) महत्त्वाचा दिवस आहे. कारण राज्यातल्या सत्तासंघर्षावर (Maharashtra Political Crisis) आज सुप्रीम कोर्टात (Supreme Court) सुनावणी होणार आहे. राज्यात शिंदे गट स्थापन झाल्यानं शिवसेनापक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Shiv Sena chief Uddhav Thackeray) यांना मुख्यमंत्रीपदाचा (chief minister) राजीनामा द्यावा लागला. या दरम्यान बंडखोरी करत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Chief Minister Eknath Shinde) यांच्या गटात सामील झालेल्या आमदारांवर अपात्रतेच्या कारवाईची करण्याची मागणी शिवसेनेकडून करण्यात आली. त्यानंतर शिवसेनेनं आमदारांवर अपात्रता तसंच शिंदे सरकारला आव्हान देत सुप्रीम कोर्टात चार याचिका दाखल केल्या आहेत. या सुनावणीवर आज सुप्रीम कोर्टात सुनावणी होणार आहे. त्यामुळे आज राज्यातल्या राजकीय भवितव्याचा फैसला लागणार आहे.
या प्रकरणाची सरन्यायाधीश रमण्णा (N. V. Ramana) यांच्या अध्यक्षतेखाली त्रिसदस्यीय पीठ सुनावणी करेल. या आधी झालेल्या सुनावणी दरम्यान सुप्रीम कोर्टाकडून दोन्ही बाजूंना या प्रकरणात काय काय घटनात्मक मुद्दे आहेत याचा तपशील देण्यात सांगितलं होतं. दोन्ही बाजूंना 27 जुलैपर्यंत आपापले मुद्दे द्यायचे होते. त्यानुसार हे प्रकरण घटनात्मक पीठाकडे सोपवण्याची गरज आहे की नाही याचा कोर्ट आज विचार करेल.
अधिक वाचा- तिसऱ्या T20 सामन्यामध्ये भारताचा 7 गडी राखून विजय, सूर्यकुमार चमकला 44 चेंडूत ठोकल्या 76 धावा
दुसरीकडे एकनाथ शिंदे यांनी त्यांच्याकडे शिवसेनेच्या दोन तृतियांशपेक्षा जास्त आमदारांचा आणि खासदारांचा पाठिंबा असल्याचा दावा केला आहे. पक्षाचे प्रमुख नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्ते आपल्या पाठिशी आहेत, असेही एकनाथ शिंदे सांगत आहेत. याच कारणामुळे खरी शिवसेना ही आपल्याच नेतृत्वात अस्तित्वात असल्याचा दावा एकनाथ शिंदे यांनी निवडणूक आयोगाला पत्र पाठवून केला आहे. तसंच मूळ शिवसेना कोणाची, या मुद्यावर केंद्रीय निवडणूक आयोगाने पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री शिंदे यांना पुरावे सादर करण्यासाठी 8 ऑगस्टपर्यंत मुदत दिली आहे.
एकनाथ शिंदे,अब्दुल सत्तार, तानाजी सावंत, बालाजी किणीकर, बालाजी कल्याणकर, अनिल बाबर, महेश शिंदे संजय रायमुलकर, रमेश बोरनारे, चिमणराव पाटील, यामिनी जाधव, संदिपान भुमरे, भरत गोगावले, संजय शिरसाट, लता सोनावणे, प्रकाश सुर्वे., या आमदारांवर अपात्रतेची टांगती तलवार आहे. या आमदारांविरोधात अपत्रातेची कारवाई करावी अशी मागणी करणारी याचिका शिवसेनेकडून सुप्रीम कोर्टात दाखल केली आहे. या याचिकेवर कोर्ट निर्णय देण्याची शक्यता आहे. त्यामुळे या 16 आमदारांचा फैसला आज होणार आहे.