Shivsena: विधानपरिषेदत शिवसेनेला मिळालं पद; 'दुधाची तहान ताकावर'

लोकल ते ग्लोबल
Updated Jun 24, 2019 | 22:46 IST | टाइम्स नाऊ हिंदी

Shivsen: विधानपरिषदेतील उपसभापतीपदाची निवड बिनविरोध केल्यास विधानसभेत विरोधीपक्ष नेत्याचा मार्ग सुकर करू, अशी अट मुख्यमंत्र्यांनी विरोधकांना घातली होती. त्यामुळं उपसभापतीपदी नीलम गोऱ्हेंची बिनविरोध निवड झाली.

udhav thakare shivsena file photo
शिवसेनेला विधानपरिषदेत उपसभापतीपद (फाईल फोटो)  |  फोटो सौजन्य: PTI

थोडं पण कामाचं

  • विधानपरिषदेत नीलम गोऱ्हे उपसभापती
  • विधासभेत विजय वडेट्टीवार विरोधीपक्ष नेते
  • नीलम गोऱ्हे यांची बिनविरोध निवड

मुंबई : लोकसभेत उपसभापतीपदासाठी हट्ट धरलेल्या शिवसेनेची नाराजी भाजपने महाराष्ट्रात दूर केली आहे. भाजपने शिवसेनेच्या नेत्या नीलम गोऱ्हे यांना विधानपरिषदेचं उपसभापतीपद दिलं आहे. त्यामुळं शिवसेनेची नाराजी दूर झाल्याची चर्चा आहे. पण, लोकसभेच्या उपसभापतीपद मिळण्याचा हक्क असणाऱ्या एनडीएतील विश्वासू मित्रपक्षाची विधानपरिषदेचे उपसभापतीपद देऊन बोळवण केल्याचं राजकीय विश्लेषकाचं मत आहे. गोऱ्हे यांची निवड बिनविरोध झाली आहे. उपसभापतीपदासाठी जोगेंद्र कवाडे यांनीदेखील उमेदवारी अर्ज दाखल केला होता. त्यामुळं उपसभापतीपदासाठी मतदान होण्याची शक्यता होती. पण, ऐनवेळी कवाडे यांनी माघार घेतल्यामुळं गोऱ्हे यांची बिनविरोध निवड झाली आहे. विधानपरिषदेचे उपसभापती काँग्रेसचे माणिकराव ठाकरे होते. त्यांची सदस्यपदाची मुदत जुलै २०१८पर्यंतच होती. त्यानंतर उपसभापतीपद रिक्तच होते. विधानसभेतील आणि विधानपरिषदेतील पदाधिकाऱ्यांच्या निवडीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांना कोड्यात पकडले होते. विधानपरिषदेतील उपसभापतीपदाची निवड बिनविरोध केल्यास विधानसभेत विरोधीपक्ष नेत्याच्या निवडीचा मार्ग सुकर करू, अशी अट मुख्यमंत्र्यांनी विरोधकांना घातली होती. त्याला विरोधकांनी संमती दिल्यामुळं गोऱ्हे यांची बिनविरोध निवड झाली.

विधानसभेत वडेट्टीवार विरोधीपक्षनेते

काँग्रेसने गेल्या आठवड्यात विधीमंडळ नेतेपदी बाळासाहेब थोरात यांची निवड केली होती. तर, विधानसभेतील गटनेते म्हणून विजय वडेट्टीवार यांना नियुक्त केले होते. जेष्ठ नेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनी विरोधीपक्षनेते पदाचा राजीनामा देऊन भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर विरोधीपक्ष नेतेपद रिक्त झाले होते. त्याजागी ज्येष्ठ नेते म्हणून थोरात यांची निवड होण्याची शक्यता व्यक्त होत होती. पण, पूर्वाश्रमीचे शिवसेनेचे आणि आक्रमक नेते विजय वडेट्टीवार यांची काँग्रेसने नियुक्ती केली आहे. वडेट्टीवार चंद्रपूरचे आहेत. सभागृहात पहिल्यांदाच मुख्यमंत्री आणि विरोधीपक्ष नेते दोघेही विदर्भातील असल्याचा योग आला आहे.

सभागृहात नेत्यांच्या कोपरखळ्या

विधानसभेत आज, विजय वडेट्टीवार यांच्या विरोधीपक्षनेतेपदाच्या निवडीनंतर नेत्यांची अभिनंदनपर भाषणे झाली. या भाषणांमध्ये नेत्यांनी एकमेकांना कोपरखळ्या मारल्या त्यामुळं सभागृहात हशा पिकला होता. ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी मुख्यमंत्र्यांचे भाषण सुरू असताना, ‘आता वडेट्टीवार यांना तरी, आमच्यासाठी ठेवा’, असा टोला लगावला. त्यावर ‘फोडफोडीचे जनक कोण आहेत हे तुम्हाला सांगायला नको’, असा टोला मुख्यमंत्र्यांनी लागावला. तसचं ‘वडेट्टीवार यांना विरोधीपक्ष नेतेपदाचा चांगला अनुभव यावा, त्यासाठी त्यांनी पुढची चार-पाच वर्षे घ्यावीत,’ असा टोला लगावून मुख्यमंत्री फडणवीस यांनी पुन्हा सेना-भाजपचीच सत्ता येणार, असा अप्रत्यक्ष दावा केला आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

लोकप्रिय वीडियो
पुढची बातमी
Shivsena: विधानपरिषेदत शिवसेनेला मिळालं पद; 'दुधाची तहान ताकावर' Description: Shivsen: विधानपरिषदेतील उपसभापतीपदाची निवड बिनविरोध केल्यास विधानसभेत विरोधीपक्ष नेत्याचा मार्ग सुकर करू, अशी अट मुख्यमंत्र्यांनी विरोधकांना घातली होती. त्यामुळं उपसभापतीपदी नीलम गोऱ्हेंची बिनविरोध निवड झाली.
loadingLoading...
loadingLoading...
loadingLoading...
taboola
Recommended Articles