जम्मूत ७ किलो स्फोटके जप्त, ४ अटकेत

Major terror plot foiled in Jammu, explosives recovered and four arrested जम्मूतील एका बस स्टँडवरुन पोलिसांनी सात किलो स्फोटके जप्त केली. या प्रकरणी चार जणांना अटक करण्यात आली.

Major terror plot foiled in Jammu, explosives recovered and four arrested
जम्मूत ७ किलो स्फोटके जप्त, ४ अटकेत 

थोडं पण कामाचं

  • जम्मूत ७ किलो स्फोटके जप्त, ४ अटकेत
  • कुंजवानी आणि बारी ब्रह्मणामधून दोन दहशतवाद्यांना अटक
  • पुलवामात आजच्याच दिवशी २०१९ मध्ये झालेला मोठा दहशतवादी हल्ला

जम्मू: सुरक्षा पथकाने जम्मूतील एका बस स्टँडवरुन सात किलो स्फोटके जप्त केली. जिथून स्फोटकांची जप्ती झाली तो प्रचंड गर्दीचा बस स्टँड आहे. स्फोट झाला असता तर त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर जीवितहानी झाली असती. मात्र गुप्तचर यंत्रणेने दिलेल्या माहितीआधारे सुरक्षा पथकाने वेळेवर कारवाई करुन स्फोटके जप्त केली आणि मोठा घातपात टळला. या प्रकरणी चार जणांना अटक करण्यात आली आहे. अटक केलेल्यांमध्ये एक कॉलेजमध्ये शिकत असलेला तरुण आहे. जम्मू रेंजचे पोलीस महानिरीक्षक (इन्स्पेक्टर जनरल - आयजी) मुकेश सिंह आणि पोलीस महासंचालक (डायरेक्टर जनरल ऑफ पोलीस - डीजीपी) दिलबाग सिंह यांनी ही माहिती दिली. (Major terror plot foiled in Jammu, explosives recovered and four arrested)

जम्मूतील एखाद्या गजबजलेल्या बस स्टँडवर बॉम्बस्फोट करण्याची योजना असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. ही माहिती मिळाल्यापासून पोलीस 'अलर्ट' होते. जम्मूतल्या बस स्टँडवर एक तरुण मोठ्या बॅगसह उतरला आहे आणि त्याच्या हालचाली संशयास्पद असल्याची माहिती मिळताच पोलीस पथक तातडीने सक्रीय झाले. तरुणाने बॅगमधील स्फोटके सक्रीय करण्याआधीच त्याला अटक करुन बॅग जप्त करण्यात आली. यामुळे घातपात टळला. 

अटक केलेल्या तरुणाचे नाव सुहैल बशीर शाह असे आहे. या तरुणाला जम्मूतील प्रसिद्ध रघुनाथ मंदिर, बसस्टँड, रेल्वे स्टेशन आणि लखदाता बाजार ही चार टार्गेट दिली होती. चंदिगडच्या एका कॉलेजमध्ये नर्सिंग शिकत असलेला सुहैल अल बद्र या दहशतवादी संघटनेच्या सदस्यांच्या संपर्कात होता. काम पूर्ण करुन तो विमानाने श्रीनगरला जाणार होता. सुहैलला श्रीनगर विमानतळावर अल बद्र संघटनेचा आणखी एक सदस्य शकील खान भेटार होता. या शकील खानला अटक केली आहे. शकीलच्या संपर्कात असलेल्या काझी वसीम याला चंदिगडमधूनच अटक करण्यात आली. या सगळ्यांना श्रीनगरमध्ये आबिद नबी नावाची व्यक्ती मदत करत होती. पोलिसांनी आबिद नबीलाही अटक केली. 

जप्त केलेली स्फोटके तपासणी करुन नंतर निकामी करण्यासाठी तज्ज्ञांकडे सोपवली आहेत. जम्मूला असलेला धोका टळला आहे. अटक केलेल्या चौघांची कसून चौकशी सुरू आहे. या चौकशीतून संपूर्ण कटाविषयी आणखी माहिती मिळेल, असा विश्वास पोलिसांनी व्यक्त केला. याआधी १३-१४ फेब्रुवारीच्या रात्री सांबातील रामगडच्या जंग परिसरामध्ये पोलिसांच्या गस्ती पथकाने सहा पिस्तुल, स्फोटकांचा मोठा साठा आणि १५ छोटे आयइडी जप्त केले. 

कुंजवानी आणि बारी ब्रह्मणामधून दोन दहशतवाद्यांना अटक

याआधी जम्मूतील कुंजवानी आणि सांबातील बारी ब्रह्मणा या दोन ठिकाणांवरुन प्रत्येकी एका दहशतवाद्याला अटक करण्यात आली. भाजपच्या तीन कार्यकर्त्यांना अटक केल्याप्रकरणी बारी ब्रह्मणा येथून शनिवारी (१३ फेब्रुवारी) 'द रेझिस्टंस फ्रंट'च्या झहूर अहमद राठेर (Zahoor Ahmad Rather) याला अटक करण्यात आली. तसेच ६ फेब्रुवारी रोजी 'लष्कर-ए-मुस्तफा'च्या हिदायतुल्ला मलिक उर्फ हसनैन (Hidayatullah Malik or Hasnain) याला अटक करण्यात आली. अटक केलेल्या दोन्ही दहशतवाद्यांची चौकशी सुरू असतानाच रविवारी १४ फेब्रुवारी रोजी जम्मूतील बस स्टँडवरुन सुरक्षा पथकाने स्फोटके जप्त केली.

पुलवामात २०१९ मध्ये झालेला मोठा दहशतवादी हल्ला

जम्मू काश्मीरमध्ये पुलवामा येथे १४ फेब्रुवारी २०१९ रोजी सीआरपीएफच्या ताफ्यावर दहशतवादी हल्ला झाला होता. सीआरपीएफच्या ताफ्यातील वाहनांना लक्ष्य करुन आत्मघातकी दहशतवादी एक कार घेऊन वेगाने ताफ्यात घुसला. त्याने सीआरपीएफच्या एका वाहनाला धडक दिली. यावेळी मोठा स्फोट झाला. दहशतवाद्याने कारमध्ये लपवलेल्या स्फोटकांचा स्फोट केला. या स्फोटात आत्मघातकी दहशतवादी ठार झाला तसेच सीआरपीएफच्या ४० जवानांचा मृत्यू झाला. सीआरपीएफच्या एका वाहनाचा चेंदामेंदा झाला.

भारताने केलेला एअर स्ट्राईक

पुलवामातील दहशतवादी हल्ल्यात पाकिस्तानच्या जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेचा हात होता. या प्रकरणी ठोस पुरावे हाती आल्यानंतर भारताने स्व संरक्षणासाठी जैशच्या पाकिस्तानमधील तळावर एअर स्ट्राइक केला होता. भारताच्या लढाऊ विमानांनी जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेचा पाकिस्तानमधील एक मोठा तळ नष्ट केला होता. भारताने २६ फेब्रुवारी रोजी बालाकोट येथे यशस्वी एअर स्ट्राइक केला होता.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी